पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ३० ऑक्टोबरला घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा (टीईटी) तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे टीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय परिषदेने घेतला असून, आता २१ नोव्हेंबरला टीईटी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात येते. यंदाच्या परीक्षेसाठी ३ लाख ३० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परिषदेकडून १० ऑक्टोबरला टीईटी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा असल्याने टीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलून २४ ऑक्टोबर आणि ३१ऑक्टोबरला घेण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. त्यामुळे पुन्हा टीईटीची तारीख बदलून ३० ऑक्टोबर करण्यात आली. त्यानंतर ३० ऑक्टोबरला होणारी टीईटीही पुढे ढकलण्यात आली आहे. देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक असल्याचे नमूद करून टीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला. आता २१ नोव्हेंबरला टीईटी घेण्यात येणार असल्याचे परिषदेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. नांदेड जिल्ह्यातील ९६५ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २६ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारांना प्रवेशपत्राची प्रत काढून घेता येईल. २१ नोव्हेंबरला परीक्षेतील पेपर एक सकाळी साडेदहा ते साडेतीन या वेळेत, तर पेपर दोन दुपारी दोन ते सायंकाळी चार या वेळेत घेतला जाईल.