अभिनेत्री आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांचा बहुचर्चित ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून या चित्रपटातील आलियाच्या कामाची प्रशंसा केली जात आहे. अशातच आलियाचे वडील आणि बॉलीवूड दिग्दर्शक महेश भट्ट हे गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ चित्रपटात आलियाचे काम पाहून प्रभावित झाले आहेत.

महेश भट्ट म्हणाले की, ‘डिअर जिंदगी’ चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळत आहे ते मला माहित नाही. मी चित्रपट बघितला. गौरीचे काम पाहून मला भोवळच आली. आलियाचे कामाने तर मला थक्क केले. इतकेच नाही तर, मी शाहरुखलाही पडद्यावर अशा रुपात कधीच पाहिले नाही. एका वेगळाच शाहरुख मला यात दिसला. ‘डिअर जिंदगी’ हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट असून तो भारतीय चित्रपटसृष्टीसाठी गौरवाची बाब आहे. विनोद पांडे यांच्या ‘सांवरी’ या पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते.

दरम्यान, समीक्षकांनी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिला असला तरीही प्रेक्षकांच्या मनावर मात्र या चित्रपटाने चांगलीच छाप पाडली आहे. नोटाबंदींचा निर्णय आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या काही चर्चांनंतर देशभरामध्ये जवळपास १२०० चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे प्रदर्शनानंतरच्या आठवड्याअखेर या चित्रपटाच्या कमाईमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

‘डिअर जिंदगी’ या चित्रपटातच्या प्रदर्शनानंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि शाहरुख खानवर प्रशंसांचा पाऊसच पडत आहे. ट्विटरच्या माध्यमातून तर विविध कलाकार आणि चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात या चित्रपटाचे कौतुक केले आहे. पण, ट्विटरवरुन होणाऱ्या या प्रशंसात्मक ट्विटमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधले ते म्हणजे सिद्धार्थ मल्होत्राच्या ट्विटने. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या दोन्ही कलाकारांनी एकत्र चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतरच आलिया आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण, या दोन्ही कलाकारांच्या नात्यामध्ये काही काळानंतर दुरावा आला आणि त्यांच्या नात्याला तडा गेला आहे अशा चर्चाही काही दिवसांपासून होत आहेत. पण, ‘डिअर जिंदगी’च्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये मात्र तसे काहीच दिसत नाहीये. व्हिडिओमध्ये काही प्रश्नांची उत्तरे देत असतानाच आलियाने ‘आय लव्ह यू सिद्धार्थ’ असे म्हटले आहे. त्यामुळे नक्की या दोन कलाकारांच्या नात्यामध्ये नेमके काय सुरु आहे याचा काहीच नेम लागत नाहीये.