मुंबई : बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मे. उशेर अ‍ॅग्रो लिमिचे व्यवस्थापकीय संचालक विनोद चतुर्वेदी यांना अटक केली आहे. ९१५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीकडून सोमवारी सांगण्यात आले. बँकेची फसवणूक व कर्जाची रक्कम गैरमार्गाने व्यवहारात आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, बँक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मे. उशेर अ‍ॅग्रो लिमिटेड, विनोदकुमार चतुर्वेदी, मनोज पाठक व इतर आरोपींविरोधात २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता. बँकांच्या संघाकडून आरोपींनी कर्ज घेतले होते.  तपासात त्यातील रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले होते.