श्रीमंत लोकांना कशाचा राग येईल आणि त्याचा वचपा म्हणून ते काय करतील याचा काही नेम नाही. एका कोट्याधीशानं बँकेतून ५.८ कोटी रुपये काढले. त्यावेळी त्याला बँक कर्मचाऱ्यांनी मास्क घालायला सांगितला. पण बँक कर्मचाऱ्यानं वाईट पद्धतीने सांगितल्याचा आरोप केला. तसेच याचा राग येऊन या महाशयांनी बँक कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशानं असं काही केलं की बँकेचे कर्मचारी पाहतच राहिले. या कोट्याधीशानं मास्क घालण्यास सांगितल्याच्या रागातून बँकेच्या कर्मचाऱ्यांना ५.८ कोटी रुपये पुन्हा मोजून देण्यास सांगितले. हा सर्व प्रकार चीनमधील एका बँकेत घडला. सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

बँकेत नेमकं काय घडलं?

फेसबुकसारखा चीनमधील सोशल मीडिया विबोवरील (Weibo) सनवेअर (Sunwear) नावाचा कोट्याधीश शांघायमधील बँकेत गेला. तेथे त्याला सुरक्षा रक्षकानं मास्क घालण्यास सांगितलं. याचा या कोट्याधीशाला राग आला आणि त्यानं बँकेला धडा शिकवण्यासाठी थेट ५.८ कोटी रुपये काढले. तसेच हे पैसे बरोबर आहेत की नाही हे बँक कर्मचाऱ्यांना आपल्या समोर मोजून द्यायला सांगितले. एवढी मोठी रक्कम मोजून देणं म्हणजे वेळखाऊ काम, त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ झाली.

“खात्यातील पैसे संपूपर्यंत दररोज पैसे काढणार आणि मोजून घेणार”

या कोट्याधीशाने एकावेळी ५.८ कोटी रुपयेच काढणं शक्य असल्यानं तेवढेच पैसे काढले. मात्र, माझ्या खात्यातील पैसे संपत नाही तोपर्यंत मी दररोज येऊन या बँकेतून एवढे पैसे काढेल आणि बँकेकडून मोजून घेईल, असं या व्यक्तीनं म्हटलंय. त्यामुळे बँकेचे कर्मचारी भांबावून गेलेत.

बँक कर्मचाऱ्यावर वाईट पद्धतीने वागल्याचा आरोप

कोट्याधीशाने बँक कर्मचाऱ्यावर वाईट पद्धतीने वागल्याचा आरोप केलाय. मात्र, नेमकं काय झालं याविषयी काहीही सांगितलेलं नाही. बँकेच्या या सेवेमुळे मी माझे सर्व पैसे या बँकेतून काढून घेईल आणि दुसऱ्या बँकेत टाकेल, असं या व्यक्तीनं म्हटलं आहे.

पैसे मोजून का घेतले?

पैसे कमी भरू नये म्हणून आपण बँक कर्मचाऱ्यांकडून पैसे मोजून घेत असल्याचं या कोट्याधीशानं म्हटलं आहे. एवढे पैसे मोजण्यासाठी या बँकेच्या २ कर्मचाऱ्यांना एका मशिनच्या मदतीने २ तास लागले.

पैशांनी भरलेल्या बॅग आपल्या कारमध्ये भरतानाचे फोटो व्हायरल

शांघायमधील बँकेत हा प्रकार घडल्यानंतर चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पैशांनी भरलेल्या बॅग आपल्या कारमध्ये भरतानाचे कोट्याधीशाचे फोटो व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : NRI चं बँक खातं निष्क्रिय पाहून लुटीचा ‘प्लॅन’, HDFC च्या ३ कर्मचाऱ्यांसह १२ जणांना अटक, वाचा नेमकं काय घडलं?

बँकेकडून कोट्याधीशाच्या आरोपांचं खंडन

कोट्याधीशाने वाईट वर्तणुकीचा आरोप केला असला तरी बँकेने सुरक्षा रक्षकाची पाठराखण केलीय. बँक कर्मचाऱ्यांनी कोणतेही वाईट वर्तन केलेले नाही किंवा मार्गदर्शक नियमांचं उल्लंघन केलेलं नाही, असं स्पष्ट केलंय.