तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या गोवा दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी, शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसमुळेच नरेंद्र मोदी हे अधिक प्रबळ बनतील. काँग्रेसमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव असून त्यामुळे देशाने आणखी किती काळ नुकसान करून घ्यावे, असा सवाल त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, काँग्रेसला आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्यासाठी पुरेशी संधी मिळाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपविरोधात लढण्याऐवजी काँग्रेस तृणमूलविरुद्ध लढला. ते आमच्या विरुद्ध लढल्यानंतर आता अशी अपेक्षा कशी ठेवतात की, आम्ही त्यांच्याकडे फुले-मिठाई घेऊन भेटीस जावे? माझे म्हणणे आहे की, प्रादेशिक पक्षांनी मजबूत झाले पाहिजे. राज्ये मजबूत झाली की केंद्र मजबूत होणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही जर गोवा जिंकू शकलो, तर मग भारतही जिंकू शकू. ज्या प्रादेशिक पक्षांनी भाजपविरोधात लढण्याचे ठरविले आहे, त्यांनी तृणमूल काँग्रेसबरोबर काम करावे.

बॅनर्जी यांनी भाजपपासून दुरावलेले गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. ‘‘आम्हाला संघराज्य पद्धती मजबूत करायची आहे.  कोणत्याही राज्यांत बाहेरच्यांची दादागिरी चालू द्यायची नाही. भाजपचा मुकाबला करू इच्छिणाऱ्या प्रादेशिक पक्षांनी तृणमूलसोबत यावे,’’ असे आवाहन बॅनर्जी यांनी दोना पावला येथे केले.