आईचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं. आई आणि मुलाचं नातं हे जगातील सर्वात आपुलकीचं आणि पवित्र नातं समजलं जातं. आई आपल्या मुलांसाठी सतत राबत असते. आपल्या मुलांवर एखादं संकट आल्यासं आई त्याला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. आई आणि मुलाच्या नात्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या अनेक घटनाही वारंवार समोर येतात. अशीच एक घटना समोर आली आहे. आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काय करू शकते, हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या चिमुकल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी या आईने आपला जीव धोक्यात टाकला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या महिलेवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “या जगाला आईची गरज आहे.” १६ सेकंदांच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये एक महिला एका लहान मुलासह भिंतीजवळ बसली असल्याचं तुम्ही पाहू शकता. अचानक तिला वाटते की भिंत कोसळणार आहे आणि मुलाला वाचवण्यासाठी ती भिंत पडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते. पण, भिंत जोराने कोसळू लागते. तर ती महिला वाकून आपल्या मुलाला झाकते. आणि वरून पडणाऱ्या सर्व विटा त्या महिलेच्या पाठीवरून जमिनीवर पडतात. अशाप्रकारे ती मुलाला लहानगी जखमही होऊ देत नाही. भिंत कोसळल्यानंतर थोड्या वेळाने एक माणून तिथे येतो. तो बाळाला उचलतो त्यानंतर ती महिला जागेवरून उठते. काही वेळाने ते सर्वजण निघून जातात.  

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तो १० लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. तसेच नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ शेअर करत महिलेचं कौतुक केलंय. या जगाला तिच्यासारख्या मातांची गरज आहे, असं एक युजर म्हणतोय. काहींनी ती सुपरह्युमन असल्याचं म्हटलंय.