एसटी प्रवासही महागला ; दिवाळीच्या तोंडावर १७.१७ टक्के भाडेवाढ

महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सेवांना भाडेवाढ लागू होईल. ही वाढ किमान ५ रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहे.

मुंबई : इंधनदरात झालेली भरमसाट वाढ, टायरसह गाडय़ांच्या सुटय़ा भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे एसटीच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या सोमवारच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महामंडळाने सोमवारी मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली.

महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सेवांना भाडेवाढ लागू होईल. ही वाढ किमान ५ रुपयांपासून १८५ रुपयांपर्यंत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना जादा भाडे मोजावे लागणार आहे. नव्या भाडेवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच सहा किलोमीटरनंतरच्या तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयांच्या पटीत आहे. भाडेवाढीमुळे दादर ते स्वारगेट शिवनेरीचे तिकीट दर ४५० रुपयांवरून ५२५ रुपये झाले आहे. मुंबई ते दापोली साध्या बसचे दर २९० रुपयांवरून ३४० रुपये, मुंबई ते विजयदुर्गपर्यंत साध्या बसच्या दरात १०५ रुपयांनी वाढ असून, आता ७३० रुपये मोजावे लागतील. मुंबई ते औरंगाबाद साध्या बसचा प्रवासही १२० रुपयांनी महागला असून ७४० रुपयांवरून तिकीट ८६० रुपये झाले आहे.

गेल्या तीन वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळाने कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती. वाढत्या इंधनदराचा बोजा सहन करत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहे. मात्र, महामंडळाच्या तिजोरीवर त्याचा परिणाम जाणवू लागल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.

आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही फटका

आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही सुधारित तिकिटाची रक्कम द्यावी लागणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. रातराणी सेवा प्रकारांतर्गत धावणाऱ्या साध्या बसचे तिकीट दर हे दिवसा धावणाऱ्या साध्या बसच्या तिकीट दराच्या तुलनेत १८ टक्के  जास्त होते. आता अतिरिक्त दर रद्द करण्यात आले असून दिवसा व रात्री धावणाऱ्या बसचा तिकीट दर समान असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाला आहे. रातराणी गाडय़ांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करत महामंडळाने रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा दिला आहे.

साध्या बसचे नवीन तिकीट दर

मार्ग                    सध्याचे तिकीट दर     नवीन तिकीट दर

मुंबई ते अलिबाग          १३५ रु.                  १६० रु.        

मुंबई ते कोल्हापूर          ४८५ रु.                  ५६५ रु.

मुंबई ते जळगाव           ५४५ रु.                  ६३५ रु.

मुंबई ते नाशिक            ३४५ रु.                  ४०० रु.

पुणे ते औरंगाबाद           २९० रु.                  ३४० रु.

पुणे ते नाशिक             २७० रु.                   ३१५ रु.

पुणे ते पंढरपूर             २७० रु.                   ३१५ रु.

नाशिक ते कोल्हापूर        ५७५ रु.                   ६७० रु.

नाशिक ते पंढरपूर          ४७० रु.                   ५५० रु.

औरंगाबाद ते लातूर         ३६० रु.                   ४२० रु.

भाडेवाढ अशी..

मुंबई- पुणे शिवनेरी तिकीट दरात ७५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई-औरंगाबाद साध्या बसचे भाडे १२० रुपयांनी वाढले आहे. मुंबई-विजयदुर्गपर्यंत बसच्या भाडय़ात १०५ रुपयांनी वाढ झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Msrtc hike bus fare over 17 percent due to rising diesel costs zws

Next Story
‘नो एन्ट्री पुढे- धोका आहे’
ताज्या बातम्या