scorecardresearch

मुंबईतील करोना रुग्णसंख्येत किंचित घट ; ४०७ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

गेल्या २४ तासांत ६,७२९ चाचण्या करण्यात आल्या. नव्याने आढळलेल्या ४०७ रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत.

मुंबईतील करोना रुग्णसंख्येत किंचित घट ; ४०७ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत गेल्या चार-पाच दिवसांपासून मोठी वाढ झाल्याचे चित्र होते. मात्र सोमवारी या संख्येत किंचितशी घट दिसून आली. सोमवारी ४०७ नवीन रुग्णांची नोंद झाली. इतर दिवसांच्या तुलनेत रविवारी चाचण्या कमी होत असल्याने ही घट झाल्याचे सांगण्यात आले.

गेल्या २४ तासांत ६,७२९ चाचण्या करण्यात आल्या. नव्याने आढळलेल्या ४०७ रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. २३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले, तर एका रुग्णाला प्राणवायू द्यावा लागला. सध्या एकूण २६० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. सोमवारी एका ७४ वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला. 

ठाणे जिल्ह्यात १२३ बाधित

ठाणे जिल्ह्यात सोमवारी १२३ करोना रुग्ण आढळून आले, तर  एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. नवी मुंबई ५६, ठाणे ३४, मीरा- भाईंदर १३, कल्याण- डोंबिवली १३, ठाणे ग्रामीण चार आणि बदलापूर दोन आणि उल्हासनगर पालिका क्षेत्रात एक रुग्ण आढळून आला आहे. तर ठाणे ग्रामीण क्षेत्रात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १०९९ इतकी आहे.

आठ दिवसांत स्वाइन फ्लूचे ८० रुग्ण ; हिवताप, लेप्टोबाधितांच्या संख्येतही वाढ

मुंबई : मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात ८० रुग्ण आढळले आहेत. तर हिवतापाचे २१८ रुग्ण आढळले आहेत. 

मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ातच हिवताप, लेप्टो, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळ रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. हिवताप आणि स्वाइन फ्लूची  रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. स्वाइन फ्लूचे आतापर्यंत १८९ रुग्ण आढळले आहेत, तर हिवतापाच्या रुग्णांची संख्या २०२४ झाली आहे.

स्वाइन फ्लूची लक्षणे

तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशात खवखव, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे या आजारात दिसतात. सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसांत हा आजार बहुसंख्य लोकांमध्ये आपोआप बरा होतो. काहीच व्यक्तींमध्ये हा उग्र स्वरूप धारण करतो.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.