नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. मनसेने लावलेल्या अनधिकृत होर्डिंगप्रकरणी त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती मिळतीये. तर ही सदिच्छा भेट असल्याचं दीपक पांडे यांनी सांगितलंय. तसेच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमांसदर्भात राज ठाकरेंना माहिती दिल्याचं पांडे म्हणाले. नाशिकमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष, अथवा सामाजिक संघटनांना होर्डिंग्स लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. जे लोक नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई होईलच, असं पांडेंनी सांगितलं. तर अनधिकृत होर्डिंग्सबाबत मनसे जिल्हाध्यक्षांना भेटून कार्यकर्त्यांना समज देण्याबद्दल सांगण्यात येईल. तसेच ८ ऑक्टोबर नंतर शहरातील जुन्या होर्डिंग्सवरील मजकूर तपासणी करण्यात येईल, असं पांडे यांनी संगितलं.

राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत, त्या हॉटेलसमोर मनसे पदाधिकाऱ्यांनी फलक लावले होते. ते फलक काढण्यासाठी एक पथक पोहोचलं. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पथकातील अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी गर्दी करणे, घोषणाबाजी करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस स्थानकात पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये नाशिकचे मनसे जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, अधिकाऱ्यांनी होर्डिंग्स हटवल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी पुन्हा त्याठिकाणी होर्डिंग लावले होते.

नाशिक पोलिसांच्या नवीन नियमांनुसार, नाशिकमध्ये होर्डिंग लावण्यासाठी महापालिका प्रशासनासह पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक आहे. होर्डिंग अनधिकृत आहे की अधिकृत हे ओळखण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतल्यानंतर एक नंबर देण्यात येईल. नाशिकमध्ये होर्डिंग लावण्यासंदर्भात नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच चार महिन्यांचा तुरुंगवासाची तरतूद देखील करण्यात आली आहे.