इंग्लंडला नमवून अंतिम फेरीत; मिचेल, नीशामची फटकेबाजी

दोन वर्षांपूर्वी लॉडर्सवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर सरशी साधत इंग्लंडने पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. या पराभवाची परतफेड करण्यात अखेर न्यूझीलंडला यश आले. डॅरेल मिचेल (४७ चेंडूंत नाबाद ७२) आणि जिमी नीशाम (११ चेंडूंत २७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने बुधवारी इंग्लंडचा पाच गडी व एक षटक राखून पराभव करत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

अबू धाबी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १९ षटकांत गाठले. ख्रिस वोक्सने सलामीवीर मार्टिन गप्टिल (४) आणि कर्णधार केन विल्यम्सन (५) यांना माघारी पाठवले. पण मिचेलला डेवॉन कॉन्वेची (४६) उत्तम साथ लाभली. लियम लिव्हिंगस्टोनने कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्स (२) यांना बाद करत न्यूझीलंडला अडचणीत टाकले. मात्र, अखेरच्या चार षटकांत ५७ धावांची गरज असताना नीशामने ख्रिस जॉर्डनच्या एकाच षटकात २३ धावा (२ वाइड आणि २ लेग बाय) फटकावल्या. तसेच न्यूझीलंडने पुढील दोन षटकांत ३४ धावा करत हा सामना जिंकला. मिचेलच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

तत्पूर्वी, इंग्लंडने २० षटकांत ४ बाद १४६ अशी धावसंख्या उभारली होती. जोस बटलर (२४ चेंडूंत २९) आणि जॉनी बेअरस्टो (१७ चेंडूंत १३) चांगल्या सुरुवातीनंतर माघारी परतले. मात्र, मोईन आणि डेविड मलान (३० चेंडूत ४१) यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी रचल्यावर मलानला टीम साऊदीने बाद केले. मोईनने नाबाद अर्धशतकासह इंग्लंडला १६५ धावांचा टप्पा पार करून दिला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : २० षटकांत ४ बाद १६६ (मोईन अली नाबाद ५१, डेविड मलान ४१; जिमी नीशाम १/१८) पराभूत वि. न्यूझीलंड : १९ षटकांत ५ बाद १६७ (डॅरेल मिचेल नाबाद ७२, डेवॉन कॉन्वे ४६, जिमी नीशाम २७; लियम लिव्हिंगस्टोन २/२२)

१ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही न्यूझीलंडची पहिलीच वेळ ठरली. याआधी २००७ आणि २०१६मध्ये त्यांना उपांत्य फेरी गाठण्यात यश आले होते.