Olympics 2020: पराभूत झालेल्या भारतीय महिला संघासाठी ‘चक दे..’च्या कबीर सरांचा खास संदेश; म्हणाले, “आम्ही…”

सुवर्णपदक जिंकून या असं शाहरुखने २ ऑगस्ट रोजी भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारल्यानंतर म्हटलं होतं

SRK team India
शाहरुखने ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आलं. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. हा पराभव भारतीय महिला खेळाडूंच्या जिव्हारी लागला आणि त्या सामन्यानंतर मैदानामध्येच रडू लागल्या. भारतीय हॉकी चाहत्यांनाही महिलांच्या या पराभवावर निराशा व्यक्त करतानाच हरकत नाही २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकू असं म्हणत त्यांना सोशल नेटवर्किंगवरुन धीर दिलाय. असं असतानाच दुसरीकडे चक दे इंडिया चित्रपटामध्ये हॉकी प्रशिक्षकाची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खाननेही पराभवानंतर भारतीय महिला संघाला एक खास संदेश दिलाय. शाहरुखने ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.

नक्की पाहा हे फोटो >> Olympics: …अन् त्या मैदानातच रडू लागल्या; या फोटोंचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत

२ ऑगस्ट रोजी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केल्यापासूनच सोशल नेटवर्किंगवर शाहरुखची चर्चा आहे. शाहरुखने ज्याप्रमाणे ‘चक दे इंडिया’ चित्रपटामध्ये महिला संघाला पदक जिंकून दिलं तिच कथा प्रत्यक्षात साकारताना पहायला मिळणार असल्याचं सांगत अनेकांनी भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन यांची तुलना कबीर खान या शाहरुखने साकारलेल्या पात्राशी केली. शाहरुखनेही भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकावं अशी इच्छा या विजयानंतर बोलून दाखवली होती. मात्र आता भारत कांस्यपदकाच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर शाहरुखने भारतीय महिलांना धीर दिलाय.

“हे हार्टब्रेकींग आहे. मात्र तरीही आपण आपली मान गर्वाने उंचवू शकतो. भारतीय महिला हॉकी संघ फार छान खेळला. तुम्ही भारतातील प्रत्येकाला प्रेरणा दिलीय. तुम्ही दिलेली ही प्रेरणा म्हणजेच विजय आहे,” असं शाहरुख ट्विटरवरुन म्हणालाय.

२ ऑगस्ट रोजी भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला धूळ चारल्यानंतर शोर्ड मरिन यांना अश्रू अनावर झाले होते. ते मैदानातच रडू लागले. त्यानंतर त्यांचे अनेक फोटो व्हायरल झालं. मात्र नंतर शोर्ड यांनीच भारतीय महिला संघासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला. त्यांनी या फोटोला एक मजेदार कॅप्शनही दिली होती. “कुटुंबियांनो मला माफ करा, घरी येण्यासाठी मला आणखीन काही कालावधी लागेल,” अशा कॅप्शनसहीत शोर्ड मरिन यांनी भारतीय महिला संघासोबतचा सेल्फी पोस्ट केला होता. म्हणजेच आता भारतीय महिला संघ पुढील फेरीत गेल्याने आपल्याला आणखीन काही काळ संघासोबत थांबावं लागणार असल्याचं शोर्ड यांनी मजेदार पद्धतीने सांगितलं होतं. तसेच त्यांनी कुटुंबियांची माफीही मागितलीय.

या सामन्यानंतर शाहरुखने साकारलेल्या कबीर खान या भूमिकेशी शोर्ड यांची तुलना होत असतानाच शाहरुखनेही या मजेदार कॅप्शनसहीत पोस्ट केलेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली होती. शाहरुखने हे ट्विट कोट करुन रिट्विट केलं होतं. “होय काही हरकत नाही फक्त येताना घरी कोट्यावधी कुटुबियांसाठी थोडं गोल्ड (सुवर्णपदक) घेऊन या… यंदा धनत्रयोदशी २ नोव्हेंबरलाच (माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच) आहे. माजी प्रशिक्षक कबीर खानकडून…” असं शाहरुखने ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्याने धनत्रयोदशीला सोन्याची आणि लक्ष्मीची पुजा केली जाते हा संदर्भही सुवर्णपदकाशी आणि स्वत:च्या वाढदिवसाशीही जोडलेला. म्हणजेच गोल्डच्या स्वरुपात तुम्ही ही लाखमोलाची भेट भारतीयांना द्या आणि मलाही माजी प्रशिक्षक म्हणून सप्राइज द्या, असा संदेशच शाहरुखने भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांना दिला होता.

शाहरुखचं हे ट्विटही बरंच व्हायरल झालं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Olympics 2020 shah rukh khan says well played indian women hockey team you all inspired everyone in india after india lost bronze medal match scsg