मुंबई : वीज प्रकल्पांच्या कोळसापुरवठ्यात आता हळूहळू सुधारणा होऊ लागल्याने देशातील विजेच्या बाजारात १४ रुपयांवर पोहोचलेले वीजदर आता पुन्हा पूर्वपदावर येत असून ते सरासरी साडेपाच रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

कोळसाटंचाईमुळे महाराष्ट्राच्या महानिर्मिती या सरकारी वीज कं पनीसह देशभरातील वीज कंपन्यांच्या वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याने खुल्या बाजारातील विजेच्या दरात तिप्पट वाढ झाली होती. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात देशातील वीज बाजारातील सरासरी वीजदर ४ रुपये प्रतियुनिट होते. नंतरच्या टप्प्यात ते ६ रुपयांवर पोहोचले. मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या काही दिवसांत खुल्या बाजारातील वीजदर कमाल १४ रुपयांपर्यंत पोहोचले होते. महाराष्ट्राचा विचार करता महानिर्मिती या सरकारी वीजनिर्मितीच्या कोळशावर आधारित वीज प्रकल्पांची क्षमता १० हजार १७० मेगावॉट आहे. पण कोळसाटंचाईमुळे महानिर्मितीच्या औष्णिक वीज प्रकल्पांमधून ४ हजार ते ४५०० मेगावॉट म्हणजेच ४० ते ४५ टक्के च वीजनिर्मिती होत होती. महानिर्मितीप्रमाणेच अनेक राज्यांनी खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरू के ल्याने मागणी वाढून दरवाढ झाली होती.

आता कोळसापुरवठ्यात हळूहळू सुधारणा होत असल्याने महानिर्मितीच्या वीज प्रकल्पांतील वीजनिर्मितीही एक हजार मेगावॉटने वाढून ५५६१ मेगावॉट झाली आहे. इतर राज्यांच्याही वीजनिर्मितीत वाढ झाल्याने खुल्या बाजारातील विजेचे दर १४ ते २० रुपयांवरून आता सरासरी ५.६० ते ५.८० रुपयांवर आले आहेत.