ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाची घोषणा करताना व्यासपीठावर झालेल्या गोंधळाबद्दल ‘अमेरिकन अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्स’ या संस्थेने माफी मागितली आहे. हॉलीवूड, बॉलिवूड आणि इतर सर्व चित्रपटसृष्टींमध्ये मानाचा असा ऑस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेत रविवार (भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी) दिमाखात पार पडला. मियामीतील गुन्हेगारी जगतात एका व्यक्तिच्या जन्मापासून ते विशिष्ट टप्प्यापर्यंतचा प्रवास दाखविणाऱ्या ‘मूनलाइट’ चित्रपटाने या स्पर्धेत बाजी मारली आहे. मात्र जोरदार तयारीत आणि उत्साहात सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाची घोषणा करताना आयोजकांमध्ये गोंधळाचे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये या कार्यक्रमाचे प्रक्षेपण सुरु असताना व्यासपीठावरुन चुकीच्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपट म्हणून निवडण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. ऑस्करच्या स्पर्धेत सर्वाधिक १४ नामांकने प्राप्त ‘ला ला लॅण्ड’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याची घोषणा सर्वप्रथम करण्यात आली होती. मात्र त्यानंतर चूक लक्षात येताच आयोजकांनी गरीब कृष्णवर्णीय मुलाच्या आयुष्यावर आधारित ‘मूनलाइट’ चित्रपट हा यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे जाहीर करण्यात आले. या घटनेमुळे कार्यक्रमाच्या नियोजनावरच शंका निर्माण झाली होती.  एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये अशी चूक कशी होऊ शकते? असे प्रश्न देखील नेटीझन्सकडून विचारण्यात आले.

हा प्रकार आयोजकांनी ठरवून केला असल्याच्या चर्चाही रंगताना दिसल्या. मात्र या घटनेसंदर्भात आयोजकांनी खुलासा दिला आहे.  व्यासपीठावर झालेली चूक मान्य करत त्यांनी एका परिपत्रकाद्वारे माफी मागितली आहे.  चुकीच्या विभागातील लिफाफा हातात आल्यामुळे ‘मूनलाइट’ चित्रपटाची घोषणा करण्याऐवजी ‘ला ला लॅण्ड’ची घोषणा केल्याचे आयोजकांनी मान्य केले आहे.  आणि घोळ निर्माण झाल्याचे सांगत संस्थेने यासंदर्भात सखोल चौकशी करणार असल्याचे देखील म्हटले आहे. दरम्यान शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमध्ये कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करणाऱ्या जिमी किमेलचेही संस्थेने आभार मानले आहेत.  ऑस्कर सोहळ्यात ‘ला ला लॅण्ड’ या चित्रपटाचे वर्चस्व पाहायला मिळाले. मात्र तब्बल १४ नामांकन मिळालेल्या या चित्रपटाला केवळ पाच पुरस्कार पटकाविण्यात यश आले.  जेमी किमेलच्या सूत्रसंचालनात रंगलेल्या या सोहळ्याची सुरुवात जस्टिन टिम्बरलेकच्या गाण्याने झाली. ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटातील ‘सिटी ऑफ स्टार्स’वरील जॉन लेजेण्डच्या सादरीकरणाने सोहळ्याला चारचाँद लावले होते.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इराणी दिग्दर्शक असगर फरहादी यांच्या ‘द सेल्समॅन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. पण ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध दर्शवत असगर फरहादी यांनी सोहळ्यात जाऊन पुरस्कार घेण्यास नापसंती दर्शवली होती

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oscars 2017 oscars auditors release statement apologize for best picture mixup
First published on: 27-02-2017 at 18:11 IST