एखादी घटना घडल्यावर अथवा ट्रेंड झाल्यावर त्यावरून मुलांचं नाव ठेवण्याचं प्रमाण हल्ली वाढत आहे. दीड वर्षांपूर्वी भारतात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर एका महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिला. त्या मुलांचं नाव तिने करोना आणि कोविड-१९ ठेवलं होतं. तर, सीएए कायद्यामुळे भारताचं नागरिकत्व मिळालेल्या एका महिलेनं तिच्या मुलीचं नाव चक्क ‘नागरिकत्व’ ठेवलं होतं. आणखी अशीच एक घटना घडली आहे. २ डिसेंबर २०२१ रोजी भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर एका पाकिस्तानी महिलेनं बाळाला जन्म दिला. हे पाकिस्तानी जोडपं गेल्या ७१ दिवसांपासून इतर ९७ पाकिस्तानी नागरिकांसह अटारी सीमेवर अडकून पडले आहे.

या पाकिस्तानी जोडप्याने आपल्या नवजात मुलाचे नाव ‘बॉर्डर’ ठेवले आहे. बाळाचा जन्म भारत-पाक सीमेवर झाल्यामुळे असे नाव ठेवण्यात आले आहे, असे बाळाचे आई-वडील निंबूबाई आणि बालम राम यांनी सांगितले. हे जोडपे पंजाब प्रांतातील राजनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, निंबूबाई गरोदर होत्या आणि २ डिसेंबरला त्यांची प्रसूती झाली. शेजारच्या पंजाबच्या राज्यातील गावातील काही स्त्रिया निंबूबाईंना बाळंतपणात मदत करण्यासाठी आल्या. स्थानिकांनी इतर मदत देण्याबरोबरच प्रसूतीसाठी वैद्यकीय सुविधांचीही व्यवस्था केली.

लॉकडाऊनपूर्वी आपल्या नातेवाईकांना भेटण्याव्यतिरिक्त तीर्थयात्रेवर भारतात आलेल्या इतर ९८ नागरिकांसह ते अटारी बॉर्डरवर अडकून पडले आहेत. पाकिस्तानात परत जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे ते घरी परत जाऊ शकत नाहीये, अशी माहिती बालम राम यांनी दिली. दरम्यान, अडकून पडलेल्या या लोकांमध्ये ४७ मुलांचा समावेश आहे. त्यापैकी सहा मुलांचा जन्म भारतात झालाय आणि ते एक वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत.

ही कुटुंबे अटारी आंतरराष्ट्रीय चेकपोस्टजवळील पार्किंगमध्ये तंबू ठोकून राहत आहेत. स्थानिक लोक त्यांना दिवसातून तीन वेळचे जेवण, औषधे आणि कपडे पुरवत आहेत. पाकिस्तानने त्यांना त्यांच्या घरी जाऊ द्यावं, अशी मागणी हे नागरिक करत आहेत.