सलग चार दिवस दर स्थिर राहिल्यानंतर तेल कंपन्यांनी आज (मंगळवार) पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत कपात केली आहे. परंतु, डिझेलच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत ८ ते १२ पैसे प्रति लिटर कपात करण्यात आली आहे.

दर कपातीनंतर आता दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.२७ रूपये, कोलकातामध्ये ७८.९४ रूपये, मुंबईत ८४.०६ आणि चेन्नईमध्ये ७९.२७ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. तर डिझेलचे दर दिल्लीत ६७.७८ रूपये, कोलकातामध्ये ७०.३३ रूपये, मुंबईत ७२.१३ रूपये आणि चेन्नईत ७१.५४ रूपये प्रति लिटर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मागील आठवड्यात घसरण झाली होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यास सुरूवात केली होती. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांकडून दरकपात थांबवली जाऊ शकते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन कच्च्या तेलाचे दर ६५ डॉलरच्या वर आणि ब्रेंट क्रूडचे दर ७३ डॉलर प्रति बॅरलवर आहे.

दरम्यान, पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यासाठी उत्पादन शूल्क कमी करण्याची शक्यता अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्टपणे फेटाळली आहे. देशातील लोकांनी प्रामाणिकपणे कर देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर त्याचे उलटे परिणाम होतील, असे त्यांनी म्हटले.