पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’च्या माध्यमातून दर महिन्याला देशवासियांशी संवाद साधतात. पुढील आठवड्यात येणाऱ्या गांधी जयंतीनिमित्ताने नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे. या दिवशी देशवासीयांनी आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढून नवा विक्रम प्रस्थापित करावा, असं आवाहन मोदींनी केलं आहे. हा विक्रम खादीसंदर्भातला आहे. यासाठी आगामी दिवाळीच्या मुहूर्ताचा देखील पंतप्रधानांनी आपल्या संवादात उल्लेख केला.

२ ऑक्टोबरला विक्रम करण्याचं आवाहन!

२ ऑक्टोबर हा दिवस देशभरात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. मात्र, या दिवशी देशवासीयांनी एक अनोखा विक्रम प्रस्थापित करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. “गेल्या काही वर्षांत देशात खादी आणि हँडलूमचं उत्पादन अनेक पटींनी वाढलं आहे. दिल्लीच्या खादी शोरूममध्ये अनेकदा एका दिवसात १ कोटीहून जास्त रुपयांचा व्यवहार झालाय. आता येत्या २ ऑक्टोबरला बापूजींच्या जयंतीच्या दिवशी आपण पुन्हा एकदा नवा विक्रम करुयात. तुम्ही तुमच्या शहरांमध्ये जिथे कुठे खादी, हँडलूम, हँडिक्राफ्टची विक्री होत असेल, तिथून तुमची खरेदी करा. दिवाळीचा उत्सव देखील येऊ घातला आहे. त्यामुळे आपली सर्व खरेदी अशा ठिकाणाहून करून व्होकल फॉर लोकल या अभियानाचे आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड आपण मोडुयात”, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

जागतिक नदी दिनाचा संदेश

दरम्यान, जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी यावेळी देशवासीयांना जल प्रदूषणाविषयी संदेश दिला. “कुणीही विचारेल, की तुम्ही नद्यांची एवढी गाणी गाता, नदीला आई म्हणता, तर ही नदी प्रदूषित का होत आहे. आपल्या शास्त्रांमध्ये नद्यांमध्ये थोडं जरी प्रदूषण झालं, तरी ते चुकीचं सांगितलं आहे. आपली परंपरा देखील तीच राहिली आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

“मला वेळोवेळी लोकांनी भेट म्हणून दिलेल्या वस्तूंचा ई-लिलाव होत आहे. त्यातला पैसा नमामि गंगेसाठी दिला जातो. देशभरात नद्यांना पुनर्जिवीत करण्यासाठी, पाण्याच्या स्वच्छतेसाठी अनेक स्वयंसेवी संघटना, सरकार निरंतर काहीतरी करत असतात. हीच परंपरा, आस्था आपल्या नद्यांना वाचवून ठेवतेय. अशा लोकांबद्दल माझ्या मनात आदराची भावना असते”, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं.