काँग्रेसचे मूक आंदोलन, पुरस्कार परत घेण्याची शिवसेना महिला आघाडीची मागणी

नाशिक, मालेगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य लढय़ातील स्वातंत्र्यसैनिक, हुतात्मा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगनाविरोधात आता राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. नाशिक शहर काँग्रेस सेवादलातर्फे गुरुवारी गोदापात्रातील ‘गांधीज्योत’ येथे मूक आंदोलन करून कंगनाचा जाहीर निषेध करण्यात आला. मालेगाव शिवसेना महिला आघाडीने कंगनाला दिलेला ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत घेण्याची मागणी केली आहे.

या आंदोलनात काँग्रेसकडून ‘हे राम..कंगनाला सुबुद्धी दे’ अशी प्रार्थना करण्यात आली. आंदोलनात शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर, मनपा गटनेते शाहू खैरे, प्रभागाच्या सभापती वत्सला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात अनेकांनी हौतात्म्य पत्करले. जाज्वल्य त्याग आणि बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असताना त्याला स्वातंत्र्याची भीक असे संबोधन करणारी व्यक्ती केवळ माथेफिरूच असू शकते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणारे हुतात्मा भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अनंत कान्हेरे यांच्यासारखे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांसारख्या असंख्य महापुरुषांचा हा घोर अपमान आहे. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांनी भिकेसाठी आपले प्राण अर्पण केले का, असा प्रश्न या निवेदनातून कंगनाला विचारण्यात आला आहे.

मालेगाव शिवसेना महिला आघाडीने कंगनाला दिलेला ‘पद्मभूषण’ पुरस्कार केंद्र शासनाने परत घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी सेनेच्या जिल्हा संघटक संगीता चव्हाण, शहर संघटक छायाताई शेवाळे, नगरसेविका आशा अहिरे, अरुणाताई चौधरी, मनीषा अहिरे आदी उपस्थित होत्या.