रसिका मुळय़े, एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता

मुंबई, सोलापूर : जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले यांनी विद्यार्थी प्रशिक्षणाचा दावा केलेल्या विज्ञान केंद्रातील उपक्रम प्रत्यक्षात अवघ्या नऊ महिन्यांतच गुंडाळावा लागल्याचे समोर आले आहे. डिसले यांच्याकडून कराराचे उल्लंघन झाल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेला विज्ञान केंद्राबरोबर असलेला करार मोडीत काढावा लागला.

सोलापूर जिल्हा परिषदेने सोलापूर येथील विज्ञान केंद्राबरोबर करार केला होता. यात केवळ जिल्हा परिषद शाळांतील मुलांनाच या उपक्रमाचा लाभ मिळावा, असे करारात ठरले होते. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी ३० रूपये प्रमाणे एकूण सुमारे ५३०० विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगांची माहिती देण्याचे नियोजन होते. त्यासाठी जि. प. प्रशासनाने विज्ञान केंद्राला एक लाख ६० हजार रूपयांची रक्कम मंजूर केली होती. मात्र प्रत्यक्षात जि. प. शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा परदेशातील विद्यार्थ्यांनाच वैज्ञानिक प्रयोगांची माहिती देण्यात येऊ लागली. परदेशातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेणे करारात कोठेही नमूद नव्हते. रणजितसिंह डिसले यांच्याकडून परदेशी शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणे हा कराराचे थेट उल्लंघन होते. या उपक्रमाची दैनंदिन न माहितीही विज्ञान केंद्राला दिली जात नव्हती. सारे काही परस्पर चालले होते. शेवटी १२ ऑगस्ट २०१८ रोजी करार मोडीत निघाला आणि हा उपक्रमही गुंडाळला गेला, असे सोलापूर सायन्स सेंटरचे प्रमुख राहुल दास यांनी सांगितले. 

डिसलेंच्या आडून वर्की फाऊंडेशनचा प्रस्ताव

रणजीत सिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार देणारी वर्की फाऊंडेशन ही संस्था जीईएमएस या एका खासगी कंपनीशी संलग्न आहे. शिक्षकांना जगभरात नोकरी मिळवून देत असल्याचा दावा जीईएमएस एज्युकेशन या कंपनीचा आहे. डिसले यांना पुरस्कार दिल्यानंतर जून २०२० मध्ये वर्की फाऊंडेशनने राज्याच्या शिक्षण विभागाकडे शाळा डिजिटल करण्याच्या प्रकल्पाबाबत प्रस्ताव दिला होता. डिसले यांना संस्थेने पुरस्कार दिला असून ते आता संस्थेच्या सदस्यांपैकी असल्याचे या संस्थेने विभागासमोर केलेल्या सादरीकरणात नमूद करून पुढे शेकडो कोटी रुपयांच्या तंत्रज्ञान खरेदीचा प्रस्ताव विभागासमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झाली नाही. दरम्यान एखादी आंतरराष्ट्रीय संस्था पुरस्कार देते तर त्यासाठी देशातून अधिकृतपणे अर्ज का पाठवले जात नाहीत असाही प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. 

प्रतिनियुक्ती कालावधीबाबतही संभ्रम

शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीने घेतलेल्या अनेक शिक्षकांचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आला. मात्र, डिसले त्यांच्या शाळेत नोव्हेंबर २०२० मध्ये रुजू झाले. दरम्यानच्या कालावधीत त्यांच्या अनुपस्थितीबाबत विभागाने पाठवलेल्या नोटीसांना प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याचे उत्तर डिसले यांनी दिले होते. त्यामुळे त्यांच्या एकूण कालावधीबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. त्याचबरोबर शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभाराही उघड झाला आहे

कर्मचारी ग्रामविकासचा, रजा मंजुरी शिक्षणमंत्र्यांकडून?

जिल्हा परिषदेचे शिक्षक हे ग्रामविकास विभागातील कर्मचारी असतात. असे असताना शिक्षणमंत्री त्यांची रजा मंजूर कशी करू शकतात असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर डिसलेंसारखी आगळीक इतर शिक्षक कर्मचाऱ्यांनी केली असती किंवा इतर शिक्षक सातत्याने अनुपस्थित राहिले असते तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली असती असे असताना डिसलेंबाबतच्या तक्रारी शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभागानेही नजरेआड केल्याचे दिसत आह़े

अधिकाऱ्यांचा वरदहस्त

जागतिक पुरस्कार मिळवून गेली दीडेक वर्षे राज्यभर प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या रणजीतसिंह डिसले यांच्या ज्ञानदानाच्या कामगिरीवर त्यांच्या नावाभोवती वलय निर्माण होण्याआधीपासूनच प्रश्नचिन्ह आहे. माध्यमांमधून अमर्याद झळकलेले डिसले हे शिक्षकांना आपल्या ज्ञानाचा लाभ देण्याच्या कोणत्याही उपक्रमांत एकदाही दिसले नसल्याचे उघड झाले आहे. कायम अनुपस्थिती, कामाच्या मूल्यमापनाचा तपशील देण्याची टाळाटाळ आणि वारंवार नोटिसा देऊनही गैरहजर राहण्याच्या डिसलेंच्या या वर्तनामुळे शिक्षण परिषदेतील अधिकारी वर्ग त्रस्त असून, माध्यमांमधील सहानुभूतीच्या आणि कौतुकांच्या लाटेवर असलेल्या डिसलेंबाबत हतबल झाला आहे. डिसले यांच्याबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाही विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिसले यांना पाठीशी घातल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने त्यांचा एका वर्षांचा प्रतिनियुक्ती कालावधी संपल्यानंतर प्रतिनियुक्ती कालावधी रद्द केला होता. या कालावधीत त्यांची उपस्थिती नियमित नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र विभागातील आणि मंत्रालयातील काही माजी वरिष्ठ अधिकारी डिसले यांना पुन्हा जिल्हा प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर घेण्यास आग्रही होते.

दरम्यान, डिसले यांनी सोलापूर येथील विज्ञान केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. माझी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत २०१७-१८ या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर काम करण्यासाठी निवड झाली. त्यानंतर माझे काम समाधानकारक वाटल्यानेच माझा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला. या कालावधीत मी १५५३ शिक्षक आणि ४२ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे, असा दावा रणजीतसिंह डिसले यांनी केला. (उत्तरार्ध)