प्रशांत केणी, लोकसत्ता

मुंबई : विश्रांतीनंतर परतलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीपुढे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे पावसाची चिंता आहे, तर दुसरीकडे संघरचनेचा गुंता सोडवावा लागणार आहे.

कानपूरमध्ये फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर न्यूझीलंडने पहिली कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. पण दुसऱ्या कसोटीला सामोरे जाण्यापूर्वी मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले आहे. म्हणजेच भारताला अनुकूल निकालासह मालिका खिशात घालण्यासाठी फक्त चार दिवस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या खेळासाठी वरुणराजाने कृपादृष्टी दाखवावी, अशी दोन्ही संघांना आशा आहे. याचप्रमाणे नियमित संघनायक कोहली परतल्याने कुणाला वगळावे, हा पेच संघ व्यवस्थापनापुढे आहे. संघरचना निश्चित करताना बदललेले वातावरणसुद्धा निर्णायक असेल, असे कोहलीने सांगितले.

रहाणेला अर्धचंद्र, की..?

कानपूरला १०५ आणि ६५ धावांच्या खेळींसह स्वप्नवत पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरला मुंबईत घरच्या मैदानावर खेळण्याची खात्री देता येत नाही. परंतु श्रेयसला वगळण्याची चूक न करता धावांसाठी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेला अर्धचंद्र मिळण्याची दाट शक्यता आहे. कानपूरला संघाचे नेतृत्व करणारा रहाणे गेल्या सलग १२ डावांत अपयशी ठरला आहे. त्यामुळे २०१३ मध्ये कसोटी पदार्पण करून ७९ सामन्यांचा अनुभव असणाऱ्या रहाणेचे वानखेडेवर पहिली कसोटी खेळण्याचे स्वप्न अधुरे राहू शकते. संघाबाहेर जाण्यासाठीचा दुसरा पर्याय हा चेतेश्वर पुजाराचा आहे. इंग्लंडमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा पुजारा मायदेशात परतल्यावर मात्र अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. याशिवाय तिसरा पर्याय सलामीवीर मयांक अगरवालला डच्चू दिला जाऊ शकतो. तंत्र योग्य नसले तरी कानपूरचे अर्धशतक शुभमन गिलला तारू शकेल. परंतु मयांकला वगळल्यास सलामीला कोण उतरणार, हा नवा प्रश्न निर्माण होईल. यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाच्या तंदुरुस्तीबाबत कोहलीने ग्वाही दिली आहे. परंतु साहाला विश्रांती दिल्यास के. एस. भरत यष्टीरक्षणासह सलामीची भूमिकाही पार पाडू शकेल.

इशांतऐवजी सिराज?

कानपूर कसोटीत एकही बळी मिळवू न शकलेल्या वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकेल. परंतु खेळपट्टीच्या स्वरूपानुसार रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटाऐवजी तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांचे समीकरण अवलंबले जाऊ शकेल.

लॅथमवर मदार

कानपूरच्या दोन डावांत अनुक्रमे ९५ आणि ५२ धावांच्या खेळी उभारणाऱ्या सलामीवीर टॉम लॅथमवर न्यूझीलंडच्या फलंदाजीची मदार आहे. याशिवाय सलामीवीर विल यंग, विल्यम्सन, अनुभवी रॉस टेलर असे मातब्बर फलंदाज त्यांच्याकडे आहेत. रचिन आणि एजाझ यांच्या झुंजार फलंदाजीमुळे न्यूझीलंडने पहिली कसोटी अनिर्णित राखली.

वॅगनर खेळण्याची शक्यता

केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला कानपूरमध्ये वेगवान गोलंदाज नील वॅगनरची उणीव तीव्रतेने भासली. परंतु मुंबईत वॅगनरला खेळवण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे कानपूरमध्ये टिच्चून गोलंदाजी करणाऱ्या कायले जेमिसन, साऊदी आणि वॅगनर या तीन वेगवान गोलंदाजांसह एजाझ पटेल आणि रचिन रवींद्र या दोन फिरकी गोलंदाजांचा न्यूझीलंड संघात समावेश होऊ शकेल. त्यामुळे विल्यम समरविलेला वगळले जाऊ शकते.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, के. एस. भरत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, कायले जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाझ पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल्यम समरविले, टिम साऊदी, रॉस टेलर, नील वॅगनर, विल यंग.

वेळ : सकाळी ९.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी