‘गुलाब’ चक्रीवादळामुळे राज्यभर पावसाचा अंदाज

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘गुलाब’ चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. त्यामुळे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी मुसळधारा कोसळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस होत आहे. आता या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे ‘गुलाब’ चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. चक्रीवादळ रविवारी (२६ सप्टेंबर) उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टी भागात धडकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर सतर्क तेचा इशारा  देण्यात आला आहे. या चक्रीवादळाच्या स्थितीचा परिणाम राज्यावरही काही प्रमाणात होणार आहे. राज्यातील काही भागांत मुसळधारा कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पाऊसभान…

 २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणाच्या उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याचाही अंदाज असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.