पदनिर्मिती वाढवण्याची गरज असताना पदे कमी केली

नागपूर : वनखात्याचा डोलारा ज्या मधल्या फळीवर आधारलेला आहे, ती फळीच नवीन सुधारित आकृतीबंधानुसार कमकु वत झाली आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या सुधारित आकृ तीबंधात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फळीत नवीन पदनिर्मिती करण्यात आली.  आता दहा वर्षानंतरच्या सुधारित आकृ तीबंधात खात्यातील संरक्षणाचा आधार असणाऱ्या या मधल्या फळीतील पदे २० ते ३० टक्क्यांनी वाढवण्याची गरज असताना ती पदेच कमी करण्यात आली.

वनखात्यात दीड दशकांपासून मानव-वन्यजीव संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे. अवैध वृक्षतोड, शिकार, लोकसंख्या वाढीमुळे जंगलावरचे अवलंबन यात वाढ झाली आहे. त्यामुळे संरक्षणाचा भार असणाऱ्या विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक या पदांच्या भरतीत वाढ होणे अपेक्षित होते. परंतु, सुधारित आकृ तीबंधामुळे या पदांमध्ये कपात करण्यात आली.  प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करणारा हाच वर्ग आहे. दहा वर्षांपूर्वीचा सुधारित आकृ तीबंध आणि आताचा सुधारित आकृ तीबंध यात याच पदांची भरती २० ते ३० टक्क्यांनी वाढवणे अपेक्षित होते. मात्र, सुधारित आकृ तीबंधासाठी नेमलेली समितीच वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील असल्याने याच पदावर त्यांनी कात्री चालवली. दहा वर्षांपूर्वीच्या सुधारित आकृ तीबंधातही अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अशी नवी पदनिर्मिती करण्यात आली. राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढला असताना आणि जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणांचे आव्हान मोठे असताना खात्यातील मधली तसेच खालची फळी वाढवण्याची मागणी होत होती. मात्र, खात्याला आता हा संघर्ष आणि संरक्षण याविषयी काहीही सोयरसुतक नाही, असेच या नव्या आकृ तीबंधात दिसून येत आहे. राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विभागीय वनाधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे खात्याचा आधारस्तंभच नाही तर कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील दुवा आहेत.  मधल्या फळीतील या एकाएका अधिकाऱ्यांवर दोन, तीन, चार अशा ठिकाणची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचा परिणाम कामावर दिसून येत आहे. तरीही वरिष्ठ पदांवर कात्री न चालवता खात्याचा आधारस्तंभ कमकु वत केला जात असल्याचे समोर आले आहे.

विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे १२१ वरून १०९ वर

राज्याच्या वनखात्यात यापूर्वी विभागीय वनाधिकाऱ्यांची १२१ पदे मंजूर होती, आता ती १०९ वर आली असून १२ पदे कमी करण्यात आली आहेत. सहाय्यक वनसंरक्षकांची ३७६ पदे मंजूर होती, आता ती २८९ वर आली असून ८७ पदे कमी करण्यात आली आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी पदांमध्ये थोडी वाढ असून वनपाल पदे जशीच्या तशी आहेत.  वनरक्षकांच्या पदांमध्ये थोडी वाढ झाली आहे.