नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यांच्या विरोधात २०१९ साली दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान प्रक्षोभक भाषण देऊन हिंसाचार भडकवल्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्यात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) विद्यार्थी शर्जिल इमाम याला दिल्लीच्या एका न्यायालयाने शुक्रवारी जामीन नाकारला.

१३ डिसेंबर २०१९ रोजी इमाम याने कथित प्रक्षोभक भाषण दिले होते. पोलिसांच्या मते, त्यामुळे दोन दिवसांनंतर दंगली भडकल्या आणि सुमारे ३ हजार लोकांच्या एका जमावाने दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात पोलिसांवर हल्ले केले आणि अनेक वाहने पेटवून दिली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनुज अग्रवाल यांनी शर्जिलचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तथापि, शर्जिलच्या भाषणामुळे दंगलखोर भडकले आणि त्यानंतर त्यांनी दंगली घडवून पोलिसांवर हल्ले केले या आरोपांच्या पुष्ट्यर्थ असलेला पुरावा अपुरा असल्याचे त्यांनी सांगितले. हे भाषण वरवर वाचले, तरी ते स्पष्टपणे जातीय रंगाचे असल्याचे दिसून येते, असे न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात सांगितले