आजकाल लहान मुलांना कोणत्या कारणावरून राग येईल आणि ते काय पाऊल उचलतील हे सांगता येत नाही. अभ्यासासाठी रागावल्यामुळे, मोबाईल न खेळू दिल्यामुळे किंवा पैसे न दिल्यामुळे अल्पवयीन मुलांनी घरं सोडल्याच्या किंवा आत्महत्या केल्याच्या घटना आपण ऐकत असतो. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली. रागाच्या भरात घरातून पळून गेलेल्या एका सहा वर्षाच्या मुलाला रेल्वे पोलीस दलाने मंगळवारी त्याच्या कुटुंबीयांना सोपवलं. खाऊसाठी पैसे मागितल्यानंतर आईने थापड मारल्याच्या रागातून हा मुलगा घरातून निघून गेला होता.

पोलीस उपनिरीक्षक विजय वाघ यांनी सांगितलं की, “या मुलाने आईकडे पैसे मागितले. मात्र, आईने पैसे न देता थापड मारली. त्यानंतर रागात तो मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळील घरातून पळून गेला. मी रेल्वेमध्ये माझ्या कर्तव्यावर होतो. तेव्हा लासूर रेल्वे स्थानकाजवळ या मुलाला एकटं प्रवास करताना पाहिलं. मी त्याला कुटुंबाबद्दल माहिती विचारली असता तो रडू लागला. त्यानंतर त्याने रागातून घर सोडल्याचं सांगितलं. हा चिमुकला सकाळी पावणेदहा वाजता मुकुंदवाडी स्थानकातून मराठवाडा एक्सप्रेसमध्ये चढला. त्यानंतर काही तासांनी लासूरजवळ असताना त्याने रागातून घर सोडल्याचं कळलं. तो सापडल्यानंतर त्याच्या पालकांना याबद्दल सांगून बोलावण्यात आलं आणि त्यांना सोपवलं.”

१५ वर्षाच्या मुलानं रागात ओलांडली भारत-पाकिस्तान सीमा..

नुकतंच एका घटनेत घरात भांडण झाल्यानंतर एक १५ वर्षीय पाकिस्तानी मुलगा सीमा ओलांडून भारतात पोहोचला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या मुलाला गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खावडा येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरुन ताब्यात घेतलंय. या मुलाला रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास १०९९ क्रमांकाच्या खांबाजवळून कुंपण ओलांडण्यानंतर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा अल्पवयीन मुलगा पाकिस्तानच्या थारपारकर जिल्ह्यातील सिंध साहिचोकचा रहिवासी आहे. घरातील एका सदस्याशी भांडण झाल्यानंतर तो घरातून पळून आला, असे त्याने बीएसएफ अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सांगितले.