BLOG : भाजपातील अंतर्गत कलहाचे अंतरंग

ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही आपण पक्ष सोडू शकतो असा सूचक इशारा दिला आहे

धवल कुलकर्णी 

यशाचे बाप अनेक असतात, तर पराभव मात्र बेवारस असतो. सत्तानाट्यात भाजपाला बसलेल्या धक्क्यानंतर आता पक्षातला देवेंद्र फडणवीस विरोध जोरात उफाळून आला आहे. गेल्या पाच वर्षांतील पक्ष व सरकारमधील कथित “एकाधिकारशाही” आणि पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न याविरोधात आता भाजपामधील फडणवीस विरोधी गट सक्रिय झाला आहे.

गुरुवारी आपले वडील व महाराष्ट्र भाजपाचे खरे शिल्पकार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या गोपीनाथ गडावर झालेल्या भव्य सभेत त्यांच्या कन्या व पूर्वीच्या फडणवीस सरकारमधील मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातल्या पक्ष नेतृत्वाविरोधात तोफ डागली.

आपण पक्ष सोडणार नाही आपल्यावर जी काय कारवाई करायची आहे ती पक्षानेच करावी, असे म्हणून पंकजा यांनी कुठेतरी पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिलं. आपण भाजपच्या कोअर कमिटी चा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सभेत जाहीर केलं. तसंच यापुढे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाच्या वतीने राज्यभर दौरा करून आपली राज्यव्यापी प्रतिमा बनवणार असल्याचेही ही संकेत त्यांनी दिले. याच सभेमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही आपण पक्ष सोडू शकतो असा सूचक इशारा दिला.

लक्षणीय बाब अशी, की पंकजा यांचा पराभव त्याचेच दुरावलेले चुलत बंधू व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांच्या परंपरागत परळी मतदारसंघातून केला. धनंजय भाजपामध्ये होते तेव्हा त्यांची व फडणवीसांची जवळीक होती. औट घटकेच्या नाट्यामध्ये त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासोबत आपला शपथविधी करून घेतला त्या वेळेला अजित दादांसोबत धनंजय सुद्धा असल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते हे विशेष.

तसेच फडणवीस सरकारमध्ये नंबर दोनचे मंत्री असून सुद्धा आपल्याला नंबर एक ची अभिलाषा कुठेही लपून न ठेवणारे खडसे यांना २०१६ मध्ये अचानक आरोपांची राळ उडाल्यावर मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. नाथाभाऊ आज ना उद्या पुन्हा मानाने मंत्रिमंडळात प्रवेश करतील असा त्यांचा समर्थकांचा दावा कालांतराने फोल ठरला. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये खडसेंना त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात उमेदवारी नाकारण्यात आली व माळ पडली ती त्यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्या गळ्यात. परंतु १९९० पासून आपल्या वडिलांनी सतत प्रतिनिधित्व केलेल्या मतदार संघात रोहिणी खडसेंना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले ते सुद्धा अगदी निसटत्या मार्जिनने. एका शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराच्या विरोधात. पंकजा व खडसे दोघांचे समर्थक असा आरोप करतात की त्यांच्या नेत्यांचा पराभव हा पक्षांतर्गत षडयंत्राचा एक भाग आहे.

महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेल्यानंतर (व अजित पवार यांच्यासोबत सरकार बनवण्याचा फडणवीसांचा इरादा धुळीत मिळाल्या नंतर) भाजपामधल्या म्यान झालेल्या तलवारी आता बाहेर येऊ लागले आहेत. प्रथम राष्ट्र, मग पक्ष व अंतिम स्वतः, असा नारा असलेल्या भाजपा मध्ये कथित एकाधिकारशाही विरोधात असलेला राग हा भविष्यात येऊ घातलेल्या या सवाच सुभ्यांतून बाहेर पडेल.

एक महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्रात जवळजवळ ५३ टक्के असलेला इतर मागासवर्गीय समाज हा भाजपचा महाराष्ट्रातले विस्ताराचा कणा आहे. एकेकाळी शेटजी भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा भाजप खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात विस्तारला त्याला दिवंगत भाजप नेते वसंतराव भागवत यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन धरमचंद चोरडिया हे सगळे वसंतरावांचे find. मुंडे यांनी खऱ्या अर्थाने भाजपला लोकांपर्यंत नेले. मुंडे (वंजारी), अण्णा डांगे (धनगर) यांच्यासारख्यांनी त्यामुळे पक्षाला माळी धनगर वंजारी व मराठा (मधवम) हे समीकरण जन्माला घालता आले.

पूर्वापार इतिहास तपासला तर  भाजपाचा राजकीय व सामाजिक पाया हा काँग्रेस व नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेपेक्षा तुलनेने कमी आहे.  तरीसुद्धा पक्षाला खऱ्या अर्थाने मासेसपर्यंत याच मंडळी नेले हेही तितकेच खरे. त्यामुळे इतर मागासवर्गीयांमध्ये एक मोठा बेस असलेले खडसे (त्यांच्या युवा पाटीदार समाजाची लोकसंख्या उत्तर महाराष्ट्रात विशेषकरून जळगाव जिल्ह्यात लक्षणीय आहे), व पंकजा मुंडे यांच्यासारखे नेते भाजपाकडून दुरावले तर याचा परिणाम भाजपच्या भवितव्यावर होऊ शकतो हे वेगळं सांगायला नको…

आपण पक्षात राहून संघर्ष करू हा पंकजा यांचा इशारा खूप सूचक आहे. याचा अर्थ असा की भाजप मधला फडणवीस विरोधी गट हा मोठ्याप्रमाणावर सक्रिय होऊ शकतो. यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे समर्थक व भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने निष्ठावंत जाऊन मिळाले तर नवल वाटायला नको. याची कारणं तशी उघडच आहेत. गडकरींचे समर्थक चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या कामठी मतदार संघातून नाकारलेली उमेदवारी व त्याचा भाजपला विदर्भात त्यांच्या तेली समाजाकडून बसलेला फटका, व गडकरीं सारख्या एका राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला संकोच, निवडणुकांच्या काळात नितीनभाऊंना विदर्भाच्या बाहेर प्रचाराला फारसे फिरू न देणे, इतर पक्षामधून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलेल्या मंडळींना भाजपामध्ये मिळालेले उच्च स्थान, म्हणजे आमदारक्या वगैरे, त्याच्यावरची नाराजी या सर्व कारणांमुळे हे सर्व असंतुष्ट एकत्र येऊ शकतात…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Special blog on devendra fadanvis vs bjp leaders in maharashtra dhk

Next Story
BLOG : वॉटसनच्या शोधात किम जोंग
ताज्या बातम्या