टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील नेदरलँड विरुद्ध आयर्लंड सामन्यात आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने हॅटट्रीक घेतली आहे. त्याच्या या कामगिरीने क्रीडाप्रेमींच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने ४ षटकात २६ धावा देत ४ गडी बाद केले आहेत. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे नेदरलँडला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे. विशेष म्हणजे एका षटकात ४ गडी बाद करण्याचा भीमपराक्रम कार्टिस कॅम्फरनं केला आहे. यासह यंदाच्या टी २० विश्वचषकातील पहिलीवहिली हॅटट्रीक घेण्याचा मान कॅम्फरला मिळाला आहे.

आयर्लंडच्या कर्णधाराने संघाचं नववं षटक कॅम्फरकडे सोपवलं होतं. या षटकातला पहिला चेंडू कॅम्फरनं वाईड टाकला. त्यानंतर टाकलेल्या चेंडूवर धाव आली नाही. मात्र दुसऱ्या चेंडूवर सी एकरमॅन बाद झाला. ११ धावा करून तंबूत परतला. कॅम्फरच्या गोलंदाजीर नेल रॉकनं त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजांची रांगच लागली. तिसऱ्या चेंडूवर रॅन पायचीत झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर स्कॉट एडवर्डलाही पायचीत करत कॅम्फरनं पहिली हॅटट्रीकची नोंद केली. एडवर्डलाही मैदानात तग धरता आला नाही. हॅटट्रीक घेतल्यानंतर पाचव्या चेंडूवर रोलॉफ मर्वेचा त्रिफळा उडवत सलग चार गडी बाद करण्याचा विक्रम केला. त्यानंतर सहाव्या चेंडूवर एक धाव आली.

टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत नेदरलँड विरुद्ध आयर्लंड सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र नेदरलँडची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन कुपर हा खातं न खोलता धावचीत होत माघारी परतला. त्यामुळे संघावरील दडपण वाढलं. त्यानंतर मॅक्स ओडॉउड आणि बॅस दी लीडे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र संघाची धावसंख्या २२ असताना बॅस दी लीडे अवघ्या ७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या गड्यासाठी एकरमॅन आणि मॅक्स ओडॉउड डाव सावरला. मात्र कॅम्फरनं एकरमॅनला बाद केल्यानंतर फलंदाज बाद होण्याची रांग लागली. सलग चार खेळाडू बाद झाले. संघाची धावसंख्या ८८ असताना मॅक्स ओडॉउड ५१ धावा करून बाद झाला. कर्णधार पीटर सीलार आमि लोगन वॅन बीकनं डाव सावरला. मार्क एडरच्या गोलंदाजीवर पीटर सीलार २१ धावा करून बाद झाला.