बिशनसिंग बेदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सुनील गावस्कर, ग्रेग चॅपेल आदींपासून तेंडुलकर, कुंबळेंपर्यंतच्या २५ जणांनी लिहिलेल्या लेखांचे हे पुस्तक बेदींचा सडेतोडपणा मांडते…

प्रसंग १ : १९७५मध्ये कर्णधार म्हणून बिशनसिंग बेदी पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळले. त्या वेळी नागपूर सामन्यासाठी खेळाडूंची निवासव्यवस्था आमदार निवासात करण्यात आली होती. परंतु फक्त कर्णधार आणि व्यवस्थापकांच्या खोलीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जेव्हा बेदी यांनी ही समस्या मांडली, तेव्हा स्थानिक संघटनेने हा गंभीर विषय नसल्याचे नमूद करीत त्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा बेदी उद्गारले, ‘‘प्रेक्षक आमचा खेळ पाहायला येणार आहेत. तुम्ही कशा रीतीने सामन्याचे संयोजन करता हे पाहायला नव्हे!’’ मग तेथील अधिकाऱ्याने बेदी यांची तक्रार केली आणि ‘बीसीसीआय’ने समिती स्थापन केली. ‘‘खेळाडूंना गरम पाणी हवे, म्हणून मी केलेल्या निषेधाबाबत चौकशी समितीची बैठक पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. यापेक्षा हास्यास्पद काय असेल?’’ अशी बोचरी टिप्पणी बेदी आजही करतात!

Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
pankaj-udhas
पंकज उधास यांची पत्नी फरीदा यांनी त्यांच्या पहिल्या अल्बमसाठी ‘अशी’ केलेली पैशांची जमवा जमव
What Jitendra Awhad Said?
“…तर अजित पवार शरद पवारांच्या पायाशी येऊन बसतील”, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

प्रसंग २ : १९७७ मध्ये टेलिव्हिजन प्रक्षेपण व्यावसायिक कॅरी पॅकर यांच्या जागतिक मालिकेच्या ‘सर्कशी’ची धामधूम होती. त्या वेळी पॅकर यांच्या समन्वयकाने तीनदा (प्रत्येकदा मोठ्या रकमेसह) बेदी यांच्याशी संपर्क साधला. पण बेदी यांनी त्याला उत्तर दिले नाही. तिसऱ्यांदा त्या समन्वयकाने उद्विग्नतेने बेदी यांच्यापुढे धनादेश पुस्तिका फेकत ‘तुमची किंमत टाका’ असे आवाहन केले. या कृत्याने संतापलेल्या बेदी यांनी तीच धनादेश पुस्तिका समन्वयकाकडे पुन्हा फेकली आणि म्हटले की, ‘कोणताही फालतू माणूस माझ्यावर किमतीचे लेबल लावू शकणार नाही!’

फिरकी गोलंदाज, कर्णधार, प्रशिक्षक अशा क्रिकेटमधील विविधभूमिका निभावताना बिशनसिंग बेदी यांच्या स्वभावातील बंडखोरपणा हा नेहमीच प्रत्ययास आला. त्यामुळे वादही भरपूर ओढवले. परंतु बेदी हे असे क्रिकेटपटू होते, जे स्वत:च्या आणि क्रिकेटपटूंच्या न्याय्य हक्कांसाठी लढले. सामन्याचे मानधन, प्रवास सुविधा, निवास व्यवस्था अशा मुद्द्यांचा यात समावेश होता. दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटना असो किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्यांनी कशाचीही तमा बाळगली नाही. बेदी यांच्या कारकीर्दीतील अनेक प्रसंग ठाशीवपणे ‘द सरदार ऑफ स्पिन’ या गौरवग्रंथवजा पुस्तकातून अधोरेखित होतात.

१९६७ मध्ये बेदी पहिली कसोटी खेळले तेव्हा ७०० रुपये मानधन होते. १९७१ मधील इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यांवरील ऐतिहासिक विजयांनंतर हा आकडा २००० रुपयांपर्यंत उंचावला. १९७५-७६ मध्ये यात मोठी वाढ होऊन, १६ हजार रुपये प्रतिसामना मिळू लागले.

षटकातील सहाही चेंडूंमध्ये विविधता तसेच फिरकी, उंची, दिशा आणि वेग यातही वैविध्य जपणाऱ्या बेदी यांनी ६७ कसोटी सामन्यांत २६६ बळी मिळवले. बेदीसह भागवत चंद्रशेखर, ईरापल्ली प्रसन्ना आणि एस. वेंकटराघवन या फिरकी चौकडीच्या बळावर भारताने कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान अधोरेखित केले. १९६८मध्ये भारताने परदेशातील पहिला विजय न्यूझीलंडविरुद्ध मिळवला. परंतु त्या वेळी न्यूझीलंडची गणना दुबळा संघांच्या गटात केली जायची. त्यामुळे त्याचे कौतुक झाले नाही. बेदी आणि प्रसन्ना यांनी या विजयात मोलाची भूमिका बजावली. मग १९७१मध्ये भारताने वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज आणि इंग्लंड दौऱ्यांवर ऐतिहासिक यश मिळवले. या यशातही बेदी यांची महत्त्वाची भूमिका होती.

दिल्ली क्रिकेट संघटनेने माजी अध्यक्ष आणि भाजपनेते अरुण जेटली यांचा पुतळा फिरोझशाह कोटला स्टेडियममध्ये उभारला. परंतु बेदी यांना क्रिकेटेतर व्यक्तीच्या पुतळ्याची कल्पना मान्य नव्हती. क्रीडाक्षेत्राच्या व्यासपीठावर क्रीडात्मक आदर्शांचीच जोपासना व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. या निषेधार्थ त्यांनी संघटनेला पत्र लिहून फिरोझशाह कोटला स्टेडियमवरील स्टँडला दिलेले आपले नाव काढण्याची मागणी केली! बऱ्याच वर्षांपूर्वी स्वर्गीय माधवराव सिंदिया यांनी बेदी यांना ‘पुढील खेपेस तू आमच्या संसदपटूंच्या संघाकडून पत्रकारांविरुद्ध खेळ,’ अशी सूचना केली. परंतु बेदी यांनी बाणेदारपणे सांगितले की, ‘तुमच्या संघात बरेच जण खूप भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे मी तुमच्या संघाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही.’

१९७४च्या इंग्लंड दौऱ्यात बेदी यांना बळीचा बकरा करण्यात आले. कर्णधार वाडेकर यांच्या गोलंदाजीच्या सूचना मान्य न करणे, ‘बीसीसीआय’चा आर्थिक करार झुगारणे आणि परवानगीशिवाय ‘बीबीसी’च्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाला हजेरी लावणे हे ठपके त्यांच्यावर ठेवण्यात आले. जॉन लेव्हर या इंग्लिश वेगवान गोलंदाजाने १९७६मध्ये स्विंग होण्याच्या उद्देशाने चेंडूला व्हॅसलिन लावले. या प्रकरणात लेव्हरवर ठपका ठेवल्यामुळे इंग्लिश क्रिकेट मंडळाने बेदी यांचा नॉर्दम्पटनशायर कौंटी संघाशी करार स्थगित केला. त्याआधीची सहा वर्षे बेदी यांनी कौंटी क्रिकेटमध्ये छाप पाडली होती. या प्रकरणात इंग्लंड क्रिकेट मंडळाशी संबंध बिघडू नयेत, म्हणून ‘बीसीसीआय’ने बेदी यांची पाठराखण केली नव्हती.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी दोन सामने सोडल्याच्या घटना बेदी यांच्या कारकीर्दीत घडल्या. त्या पुस्तकात ठळकपणे आल्या आहेत. १९७६मध्ये किंग्स्टन कसोटीत वेस्ट इंडिज संघाने मालिका वाचवण्यासाठी षटकाला चार उसळणारे चेंडू टाकून भारतीय फलंदाजांना हैराण केले. काही खेळाडू जखमी झाल्यानंतर गोलंदाजांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बेदी यांनी भारताचा डाव घोषित करून टाकला. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘विंडीजचे गोलंदाज ‘बॉडीलाइन’पेक्षा जीवघेणा गोलंदाजीचा मारा करीत होते. तुम्ही जिंकण्याच्या इराद्याने क्रिकेट खेळता. प्रतिस्पध्र्याला ठार करण्यासाठी नव्हे!’’ त्यानंतर, १९७८मध्ये पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामनासुद्धा बेदी यांनी बहाल केला. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जाणीवपूर्वक उसळणारे चेंडू टाकून नकारात्मक खेळाचे प्रदर्शन केले. बेदी यांच्या याच धाडसी निर्णयांमुळे नंतर उसळणाऱ्या चेंडूंना मर्यादा आल्या. कसोटी क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी बंधने आली. परंतु या विरोधात लढणाऱ्या बेदी यांना त्याचे श्रेय मात्र दिले गेले नाही.

१९७८-७९मध्ये पाकिस्तान दौऱ्यावरील कसोटी मालिका ०-२ गमावल्यानंतर बेदीचे कर्णधारपद खालसा करण्यात आले. कारण पाकिस्तानविरुद्धचा पराभव हा भारतीय कर्णधारासाठी गुन्हा ठरतो. १९७९मध्ये वयाच्या ३३व्या वर्षी बेदी यांची कारकीर्द अकाली संपुष्टात आली.

१९७०मध्ये बेदी दिल्लीचे कर्णधार झाले, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, ‘गुणवत्तेनुसार संघनिवड होईल. आम्ही क्रिकेटचा संघ निवडतो, संसदेतील सदस्य नव्हे.’ मुंबईचे म्हणजेच पश्चिम विभागाचे देशांतर्गत क्रिकेटवर त्या काळात अधिराज्य होते. या सत्तेला हादरे देऊन दिल्लीची म्हणजेच उत्तरेची सत्ता स्थापन करण्याचे धारिष्ट्य बेदी यांच्या नेतृत्व कालखंडात साध्य झाले. दिल्ली-मुंबईच्या क्रिकेटमय वैराची बीजे त्या वेळी पेरली गेली. अजित वाडेकर, सुनील गावस्कर, बेदी, मोहिंदर अमरनाथ, कपिल देव, मदनलाल असे सत्तरीच्या दशकातील असंख्य तारांकित क्रिकेटपटू या संघांकडून खेळायचे.

१९९०मध्ये गावस्कर यांनी मेरिलीबोन क्रिकेट क्लबने देऊ केलेले आजीवन सदस्यत्व नाकारले. हे न आवडलेल्या बेदी यांनी गावस्कर यांना पत्र लिहून त्यांचा निषेध केला होता.

‘आयपीएल’मधील खेळाडूंच्या लिलावप्रक्रियेला बेदी यांचा विरोध होता. सर्वाधिक बोलीदाराला विकल्या जाणाऱ्या घोड्यांप्रमाणे खेळाडूंना वागणूक देऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. २०१०च्या दिलीप सरदेसाई व्याख्यानमालेत बेदी यांनी मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमावर आक्षेप घेताना म्हटले की, ‘तो गोलंदाज ‘चकर’ (चेंडू फेकणारा) आहे. त्याच्या नावावर ८०० धावचीत आहेत, बळी नव्हेत!’

बेदी ‘मॅच का मुजरिम’ या एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात सहभागी व्हायचे. प्रत्येक सामन्यानंतर भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या किंवा खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ते मुद्द्यांसह गुन्हेगार ठरवायचे. २०१६मध्ये न्यायमूर्ती लोढा समितीतर्फे ‘बीसीसीआय’ला शिफारशी करताना बेदी यांच्या अनेक सूचना स्वीकारल्या गेल्या. त्यांचा घटनेतसुद्धा अंतर्भाव करण्यात आला.

पाकिस्तान दौऱ्यावर असताना दुर्मीळ रक्तगटाचे वृत्तपत्रातील आवाहन वाचून बेदी हे त्वरित रुग्णालयात जाऊन रक्तदान करून आले. या दायित्वाबद्दल बेनझीर भुट्टो यांनी त्यांना दोन कार्पेट्स आणि चहाचा संच भेट म्हणून पाठवला होता. ‘अच्छा इन्सान बनना सीखो, क्रिकेट तो बाद में भी आ जाएगी,’ ही शिकवण त्यांनी दिल्याचे कन्या नेहा बेदी (माजी पत्रकार) यांनी या पुस्तकातील लेखात म्हटले आहे.

बेदी म्हणजे क्रिकेटचे विद्यापीठ आहे, असे माजी फिरकीपटू, प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणतात. १९८३च्या भारतीय संघाचे निवड समिती सदस्य बेदी यांच्याकडून आम्ही क्रिकेट शिकलो, असे कपिल देव मान्य करतात.

या अमृतमहोत्सवी गौरवग्रंथात त्यांच्या कामगिरीचा आणि वादांचा ऊहापोह समकालिनांकडून किंवा नंतरच्या क्रिकेटपटू व जाणकारांकडून होतो. गावस्कर, सचिन तेंडुलकर, फारूख इंजिनीयर, ग्रेग चॅपेल, गुंडप्पा विश्वनाथ, कीर्ती आझाद, रामचंद्र गुहा, अयाझ मेमन अशा २५हून नामांकित क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि क्रीडा पत्रकारांच्या लेखनातून सडेतोड विचारसरणीचे बेदी अवतरले आहेत. मात्र इतक्या जणांनी लिहिल्यामुळे बरेच प्रसंग पुन:पुन्हा येतात. याऐवजी बेदी यांचे आत्मचरित्र किंवा चरित्रलेखन झाले असते, तर ते टळले असते. प्रत्येक ठिकाणी या अन्य मंडळींच्या नजरेतून अवतरलेल्या बेदी यांच्याऐवजी व्यक्तिश: बेदी यांचा दृष्टिकोन प्रकट होऊ शकला असता. लेखकांचा परिचय पुस्तकाअखेरीस दिला आहे, त्याऐवजी तो प्रत्येक लेखासोबत दिला असता तर उत्तम झाला असता. सांख्यिकीतज्ज्ञ एच. आर. गोपाळकृष्णा यांनी बेदी यांच्या कारकीर्दीची आकडेवारी सखोलतेने मांडली आहे.

prashant.keni@expressindia.com