करोना विषाणूमुळे सध्या जगभरातील लोक त्रस्त आहेत. ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या व्हायरसमुळे हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान सेलिब्रिटीदेखील करोनाच्या रडारवर आहेत. अलिकडेच अभिनेता टॉम हँक्स, क्रिस्तोफर हिव्ह्यू, अभिनेत्री रीटा विल्सन, ओल्गा कुरिलेन्कोने, फूटबॉलपटू कॅलम हडसन-ओडोई, स्पेन संसदेतील खासदार आयरेन माँटेरो यांना करोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता या यादीत आणखी एका सेलिब्रिटी नावाची भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेता एद्रिस एल्बा याला देखील करोना विषाणूची लागण झाली आहे.

एद्रिसने एक ट्विट केलं आहे. या टविटमध्ये त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्याने म्हटलं आहे. “आज सकाळी मला करोना विषाणूची लागण झाल्याचं समजलं. खरं तर मला करोनाचं कुठलंही लक्षण झाल्याचं जाणवलं नाही. परंतु तरीही माझी चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे माझी विनंती आहे कृपया दुर्लक्ष करु नका. सुरक्षित घरीच थांबा.” असं ट्विट एद्रिसने केलं आहे.

एद्रिस एल्बा हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. थॉर राग्नारॉक आणि अॅव्हेंजर्स इन्फिनीटी वॉर या सुपरहिरो चित्रपटांमुळे तो भारतातही लोकप्रिय झाला होता. जेम्स बॉण्ड या व्यक्तिरेखेसाठी सध्या त्याचं नाव आघाडिवर आहे.