१९५९मध्ये तिबेटमधून भारतात स्थलांतर केलेले धर्मगुरू दलाई लामा यांनी चीन सरकार, तिबेटमधील परिस्थिती आणि तैवानमध्ये चीनी आक्रमणामुळे निर्माण झालेला तणाव याविषयी भूमिका मांडली आहे. टोक्योमध्ये आयोजित केलेल्या एका ऑनलाईन न्यूज कॉन्फरन्समध्ये दलाई लामा सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी चीनमधील सांस्कृतिक परिस्थितीविषयी भाष्य केलं. तसेच, आपण भारतातच राहण्याला प्राधान्य देतो, असं देखील लामा म्हणाले आहेत. यावेळी भारतातील सांस्कृतिक वातावरणाचं त्यांनी कौतुक देखील केलं आहे.

बुधवारी झालेल्या या न्यूज कॉन्फरन्समध्ये बोलताना दलाई लामा म्हणाले, “चीनमधील नेत्यांना, राजकारण्यांना तेथील सांस्कृतिक वैविध्य कळत नाही. तिथल्या प्रमुख हान समाजाचं प्रमाणाबाहेर वर्चस्व आहे”. मात्र, असं सांगतानाच चीनमधील सामान्य नागरिकांविरोधात कोणताही राग किंवा भूमिका नाही. आपण कम्युनिजम आणि मार्क्सवाद यांना व्यापक प्रमाणावर पाठिंबा दिला आहे, असं देखील लामा यांनी नमूद केलं आहे.

सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने बिजिंग ऑलिम्पिकवर बहिष्कार घालावा का? असा प्रश्न त्यांना विचारला असता दलाई लामा यांनी चीनमधील कम्युनिस्ट पक्षावर निशाणा साधला. “मी माओ झिदॉंग यांचया काळापासून कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना ओळखतो. त्यांच्या कल्पना चांगल्या असतात. पण कधीकधी ते फार जास्त करतात. खूप जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण नव्या पिढीच्या नेतृत्वात चीनमधील परिस्थिती बदलेल”, असा विश्वा देखील त्यांनी व्यक्त केला.