|| डॉ. अपूर्वा पालकर

देशातील नवउद्यमींच्या क्षेत्रात युनिकॉर्न घडण्यात पुण्याचा वाटा मोठा आहे. पुण्यात संशोधनाची संस्कृती फार पूर्वीच रूजली आहे. आता पुण्यातील नवोपक्रम आणि नवउद्यमींमघ्ये होत असलेली गुंतवणूक पाहता नवोपक्रम आणि  नवसंशोधनाचं केंद्र म्हणून पुण्याची आणखी एक ओळख निर्माण होऊ शकते.

Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
Red orange and yellow alert for rain in many parts of the state
राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट
adani realty msrdc latest marahti news
वांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला, ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयाच्या ठिकाणी लवकरच उत्तुंग इमारत
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

गेल्या दशकभरात भारतात जेवढे युनिकॉर्न (एक बिलियन डॉलर्सचे मूल्य असलेली नवउद्यमी) झाले, जवळपास तेवढेच युनिकॉर्न हे गेल्या एका वर्षांत झाले आहेत. या आकडेवारीवरून भारतात आकार घेत असलेली नवउद्यमी संस्कृती किती वेगाने प्रगती करत आहे याचा प्रत्यय येतो. म्हणूनच सध्या नवउद्यमी आणि नवसंशोधन (इनोव्हेशन) या क्षेत्राला गती मिळाली आहे. नवउद्यमींतून व्यवसाय चांगल्या प्रकारे उभे राहत असल्याने गुंतवणूकदारांचाही याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे. त्यात गुंतवणूकदार, मोठे व्यावसायिकांचा समावेश आहे. जगभरातल्या युनिकॉर्नच्या यादीमध्ये अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत ४८७, तर चीनमध्ये ३०१ युनिकॉर्न आहेत. भारतातील नवउद्यमींमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा तीन पटीने अधिक म्हणजे २४.१ बिलियन डॉलरची गुंतवणूक झाली आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे ४८ टक्के तंत्रज्ञानावर आधारित नवउद्यमी हे भारताच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत. बँकिंग आणि फायनान्शियल सव्‍‌र्हिसमध्ये १३ नवउद्यमी कार्यरत असून २०२१ या वर्षांत २५ टक्के गुंतवणूक यामध्ये झाली आहे. २०२१ या वर्षांत ७५० हून अधिक सक्रिय गुंतवणूकदार या नवउद्यमी परिसंस्थेचा भाग झाले आहेत, तर अधिकाधिक गुंतवणूकदार मेगा राउंडमध्ये म्हणजेच ज्या नवउद्यमीची उलाढाल १०० मिलियन डॉलरच्या पुढे आहे अशा नवउद्यमीमध्ये सहभागी झाले आहेत.

बेंगलोर हे शहर भारताची नवउद्यमीची राजधानी समजली जाते. त्याखालोखाल मुंबई, दिल्लीचे नाव घेतले जाते. मात्र बेंगलोर, मुंबई आणि दिल्ली या तीन शहरापर्यंत मर्यादित असणारी नवउद्यमींमधील गुंतवणूक आता हैदराबाद, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबाद यांसह एकूण आठ शहरांपर्यंत पोहोचली आहे. युनिकॉर्न निर्माण करण्यात पुणे शहराचा मोठा वाटा आहे. पुण्याच्या युनिकॉर्नमध्ये फस्टक्राय, ध्रुव, आयसरटीस, माईंडटिकल्स यांसारख्या नवउद्यमी कंपन्यांची नावे सांगता येतील. भारताला नवउद्यमीमध्ये जगभरात स्थान मिळवायचं असेल आणि मेक इन इंडियाला पुढे न्यायचं असेल तर केवळ तीन शहरांपुरते मर्यादित न राहता याची व्याप्ती वाढवायला हवी. त्यात इतर शहरांचा सहभाग वाढल्यास त्या शहरांची आर्थिक प्रगती होईल, तसेच रोजगार निर्मिती आणि शहरीकरण होण्यास मदत होईल. नव्याने नवउद्यमी संस्कृती रुजत असलेल्या या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात क्षमता आहे, केवळ या शहरांना संधी देत त्यांना पुढे नेण्याची आवश्यकता आहे. पुण्यात २०२० पासून २०२२ पर्यंत करोना महासाथ असतानाही २०२१ च्या दुसऱ्या सहामाहीत मोठय़ा प्रमाणात नवउद्यमीमध्ये गुंतवणूक झाली आहे. सहा महिन्यातील ही गुंतवणूक पाहता भविष्यात पुण्यातील नवउद्यमी मोठी उंची गाठेल यात शंका नाही. पुणे हे माहिती तंत्रज्ञानासह नवउद्यमीचं केंद्र बनण्याची सुरुवात झाली आहे. पुण्यापाठोपाठ ज्या शहरांमध्ये नवउद्यमीची संस्कृती रुजण्यास सुरवात झाली आहे अशा मेट्रो शहरांमध्ये सध्या नवउद्यमींमधील प्राथमिक आणि त्यापुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील गुंतवणुकीला सुरुवात झाली आहे.

नवोपक्रम आणि नवउद्यमी संस्कृतीची सुरुवात  एखादी नवकल्पना एखाद्या शहरात कशी रुजते त्यावरून ती संस्कृती नवउद्यमी परिसंस्था आकार घेत असते. नवकल्पनेला योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळणं हा यातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शैक्षणिक संस्था, उद्योग, संशोधन संस्था आणि धोरण निर्माते यांच्या माध्यमातूनच या नवकल्पनेला दिशा मिळते. शिक्षणाच्या टप्प्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यापन, प्रकल्प आणि शिकण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित करणे. शिक्षण संस्थांमध्ये देण्यात येणाऱ्या विचार कौशल्यावर आधारित शिक्षणातूनच या नवउद्यमी संकल्पनेची पायाभरणी होते आणि त्यातून उद्योगनिर्मितीचे धडे मिळतात. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची विचारकौशल्यं विकसित करत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवथा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पुणे हे उद्योगांचे शहर म्हणूनही उदयास येत आहे. इथे अनेक मोठय़ा कंपन्यांचे स्वत:चे नवोपक्रम केंद्र आहेत. त्यात इटन इंडिया इनोव्हेशन सेंटर, बीएनवाय मेलन इनोव्हेशन सेंटर, इमरसन एक्स्पोर्ट इंजिनिरग सेंटर आणि नव्याने सुरु झालेल्या आयबीएम ऑटोमेशन इनोव्हेशन सेंटरचा समावेश आहे. पुण्यात नवोपक्रमासाठीचे मनुष्यबळ आधीपासूनच असल्याने नवउद्यमीचे बीज रुजण्यास पोषक वातावरण आहे. पुण्यामध्ये बऱ्यांच वर्षांपासून अनेक राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’, ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स’, ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटिंग’, ‘टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ आणि अशा अनेक संस्थांची नावे सांगता येतील. या शहरात संशोधन फार पूर्वीपासून रुजलं असल्यानं नवोपक्रमाची संस्कृती तयार करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञही इथं उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाने नवोपक्रमालाला चालना देण्यासाठी ठरवलेल्या ध्येयधोरणांमध्ये ‘महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी’ अग्रगण्य आहे. पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, वाहनोद्योग असण्यासोबतच उच्च दर्जाच्या शिक्षण देणाऱ्या अनेक शिक्षणसंस्था आहेत. परवडणारी घरं आणि जागा  उपलब्ध आहे, तसेच तंत्रज्ञानातील कुशल मनुष्यबळही येथे उपलब्ध आहे. त्यामुळे नवसंशोधनासाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे पुणे हे नवोपक्रमाचं केंद्र होत आहे.

नवउद्यमीची पायाभरणी  गेल्या काही वर्षांत मूलभूत आणि प्रायोगिक संशोधन असणाऱ्या नवउद्यमीचे व्यवसायात रूपांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी तर ही संख्या सर्वाधिक वाढली आहे. आतापर्यंत पुण्यात जवळपास ३ हजार पाचशे नवउद्यमी नोंदणीकृत झाले आहेत. ही संख्या जवळपास मुंबईतील नवउद्यमी एवढीच आहे. मुंबई आणि पुण्यासोबतच नवउद्यमी संस्कृती रुजणाऱ्या अन्य शहरांमुळेच भारतात महाराष्ट्राची नवउद्यमीमध्ये आघाडी आहे. इज ऑफ लिविंग या निर्देशांकात शाश्वत शहर म्हणून पुणे सर्वात आघाडीवर आहे, तर आर्थिक क्षमता या निकषावर बेंगलोर आणि दिल्लीनंतर पुण्याचा क्रमांक लागतो. गुणवत्तापूर्ण जीवनशैलीसाठी चेन्नईचा पहिला, तर पुण्याचा सहावा क्रमांक आहे. या सर्व कारणांमुळे पुण्यामध्ये अनेक नवउद्यमीने आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. कोणतीही नवकल्पना जेव्हा मांडली जाते, तेव्हा त्या कल्पनेचं प्रत्यक्षात नवउद्यमीमध्ये रूपांतर होण्यासाठी अनेक टप्पे पार करावे लागतात. त्यासाठी नवकल्पनांना वेळीच आकार आणि दिशा देण्याची गरज असते. सुरुवातीच्या टप्प्यातील हे मार्गदर्शन देण्यासाठी पुणे शहरात अनेक दर्जेदार शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्थांची स्वत:ची नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्रही आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या छताखाली ३४० संलग्न महाविद्यालयांमध्ये स्वत:चे नवोपक्रम केंद्र सुरू करण्यात आले आहे. अशा प्रकारे महाविद्यालयांमध्ये नवोपक्रम केंद्र सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव आहे. तसेच ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे व्हेंचर सेंटर’ आहे. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची (सीओईपी) भाऊ इन्स्टिटय़ूट संस्था आदी सर्व संस्था पुण्यातील नवोपक्रम, नवसंकल्पनांना मार्गदर्शन करत त्यांचं व्यवसायात रूपांतर करण्यासाठी मदत करतात. नवउद्यमीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर अनेकदा इन्क्युबेटर्स ना आर्थिक, कायदेशीर बाबींसाठी, उत्पादन निर्मितीत मदत आवश्यक असते. तसेच एकस्व अधिकार (पेटंट) नोंदणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विश्वासार्ह संस्थेची मदत आवश्यक असते. ही मदत या नवोपक्रम केंद्रांच्या माध्यमातून केली जाते. सध्या अनेक तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये अशा प्रकारे नवोपक्रम केंद्र सुरू केली आहेत. अलीकडेच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील नवउद्यमी पुरस्कारांमध्ये पुण्यातील चार नवउद्यमींचा  समावेश आहे. त्यामुळे पुण्याचे नाव भारताच्या नवउद्यमीच्या नकाशावर आले आहे.

नवउद्यमी आणि अर्थचक्र  कोणत्याही नवउद्यमीचे व्यवसायात रूपांतर होत असताना सर्वात महत्त्वाचा घटक हा गुंतवणूक असतो. सुरुवातीच्या टप्प्यात एन्जल फंडिंग म्हणजेच गुंतवणूकदार नवउद्यमीवर विश्वास ठेवून गुंतवणूक करतात. मात्र त्याच्या पुढील टप्प्यात सातत्यानं उत्पादनाची किंवा सेवा व्यवसाय वाढ होणे गरजेचे असते. त्यातूनच मग अ, ब, क, ड टप्प्यावरील गुंतवणूक हळूहळू गुंतवणूकदारांकडून होते. एकदा ड टप्प्यावरील गुंतवणूक झाली, की पुढचा फ गटाचा टप्पा हा ‘युनिकॉर्न’ कडे घेऊन जाणारा असतो. सध्या पुण्यातील सहा कंपन्यांनी भारतातील ‘युनिकॉर्न’मध्ये स्थान मिळवले आहे. याचं विश्लेषण करत असताना एक बाब महत्त्वाची आहे,की आपल्या शहरात होणाऱ्या गुंतवणुकीत कोणत्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक होते त्यावरून त्या क्षेत्राच्या आणि शहराच्या विकासाची दिशा ठरते. सध्या २०२०-२१ मध्ये पुण्यात २६ प्रकारच्या क्षेत्रातील नवउद्यमीमध्ये प्राथमिक स्तरावरील गुंतवणूक झाली आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक तेरा  व्यवहार आर्थिक तंत्रज्ञान आणि आर्थिक सेवा या क्षेत्रात झाले आहेत. त्यात साधारणपणे २९४.३३ मिलियन डॉलर गुंतवणूक झाली आहे. करोना महासाथीनंतर आरोग्य हा अतिशय संवेदनशील विषय झाला आहे. या क्षेत्रातही आठ मोठे व्यवहार झाले आहेत. त्यात  ३२.९२ मिलियन डॉलरची उलाढाल झाली आहे. भविष्यातही आरोग्य क्षेत्रात याहूनही अधिक गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. या सर्व गुंतवणुकीचा आणि व्यवहारांचा अभ्यास करता असं लक्षात येतं, की पुण्यात तंत्रज्ञानाशी निगडित सर्वाधिक नवउद्यमीमध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखवला आहे. ज्यात डीपटेक, एचआरटेक , अ‍ॅग्रीटेक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायोटेक सास आदींचा समावेश आहे.

नवउद्यमीचे भविष्य

पुण्यात युनिकॉर्न वगळता गेल्यावर्षभरात ५६१. ७१ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. मुख्य म्हणजे त्यातील सर्वाधिक गुंतवणूकदार हे पुण्याबाहेरचे आणि भारताबाहेर आहेत. ही गुंतवणूक करोना प्रतिबंधक दोन्ही लशी मिळाल्यानंतर, म्हणजे साधारण गेल्या सहा महिन्यात झाली आहे. त्यामुळे गेल्या काळात शहरात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होऊन पुण्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. पुणे शहर जसं विद्येचं माहेरघर आहे, तसंच आता ते नवोपक्रम आणि नवउद्यमीची राजधानी होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करू लागले आहे. येत्या काळात नवोपक्रम आणि नवउद्यमींचं शहर म्हणून पुण्याची आणखी एक ओळख नक्कीच तयार होईल.

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका आहेत.)