अर्धा जून महिना जवळपास कोरडा झाल्यानंतर मुंबईत पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरात सोमवारपासून अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू झाली. रविवारी रात्रीपासून अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईसह किनारपट्टीच्या भागासाठी हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी शहरात हजेरी लावली. त्यानंतर ढगाळ वातावरण असले तरी पावसाने दडी मारली. मात्र, मुंबईत रविवारी मोसमी पहिला जोरदार पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत २४ तासांत सांताक्रूझ केंद्राने १२.५ मि. मी. तर, कुलाबा केंद्राने ६७ मि. मी.पावसाची नोंद केली आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेने या हंगामात एकूण अनुक्रमे २१९ मि.मी. आणि १२७.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे मुंबईतील तापमान कमी झाले आहे. त्यामुळे उकाडयापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सांताक्रूझ केंद्राने कमाल तापमान ३१.३ अंश सेल्सिअस तर, किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. कुलाबा केंद्राने कमाल तापमान २९.४ अंश सेल्सिअस तर, किमान २३.५ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० ते २३ जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून त्यानंतर हलका ते मध्यम पाऊस पडेल.