मुंबई: प्रवाशांसाठी बेस्ट बसगाड्यांचा ताफा जलदगतीने वाढत असून यात पर्यावरणस्नेही अशा विजेवर धावणाऱ्या बसचीही भर पडत आहे. २०२३ पर्यंत बेस्टची  ५० टक्के वाहने विजेवर चालतील. तर मुंबईसह राज्यात अधिकाधिक विजेवरील वाहने आणणार असल्याची माहिती यावेळी, पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

रविवारी ६० वातानुकूलित विजेवरील बसगाड्यांचा लोकार्पण सोहळा ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. विजेवरील २०० दुमजली वातानुकू लित बसही दाखल होणार असल्याचे सांगितले.

विजेवरील धावणाऱ्या बसबरोबरच डिसेंबर २०२१ पर्यंत सीएनजीवर धावणाऱ्या विनावातानुकू लित ३७५ बसही प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे बेस्ट महाव्यवस्थापक लोके श चंद्र यांनी यावेळी सांगितले. या एकमजली बस असतील. त्यापाठोपाठ मोठ्या संख्येने बस येणार असून प्रवाशांची गैरसोय टळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  यावेळी  महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्र माचे माजी प्रमुख एरिक सोल्हेम इत्यादी उपस्थित होते.