अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामान करणाऱ्या भारताला अमेरिका शक्य ती सर्व मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. हॅरिस यांनी “भारताने करोना साथीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आमची मदत केली होती आणि आता आम्ही भारताची मदत करण्यासाठी दृढ निश्चयाने उभे आहोत”, असं म्हटलं आहे. भारतामध्ये करोना संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढणं हे हृदय पिळवटून टाकणारं असल्याचं देखील त्या म्हणाल्या आहेत. तुमच्यापैकी ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या सद्भावना आहेत, अशा शब्दांमध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी भारतीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील परिस्थिती चिंताजनक होत असल्याचं लक्षात येताच आम्ही भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं हॅरिस यांनी म्हटलं.

२६ एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताला मदत करण्यासंदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती कमला हॅरिस यांनी दिली. ३० एप्रिलपर्यंत अमेरिकेच्या लष्कराने आणि नागरिकांनी भारतासाठी मदतीची पहिली खेप पाठवली होती. आम्ही रिफिल करता येतील असे ऑक्सिजन सिलेंडर्स, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, एन ९५ मास्क दिले आहेत. आम्ही अजून मास्क पाठवण्यासाठी तयार आहोत. रेमेडिसविर औषधांचा साठाही आम्ही भारतामध्ये पाठवला आहे, असं कमला हॅरिस यांनी सांगितलं.

कमला हॅरिस यांनी भारत आणि अन्य देशांमधील लोकांचे अधिक वेगाने लसीकरण करण्यासाठी मदत करणार असल्याचंही सांगितलं. आम्ही करोना लसींवर असणारा स्वामित्व हक्क संपवण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्या म्हणाल्या.

आम्ही भारताला पूर्ण पाठिंबा देत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, असंही कमला हॅरिस यांनी म्हटलं आहे.

We have announced our full support for suspending patents on #COVID19 vaccines – to help India and other nations vaccinate their people more quickly. India and the United States have the greatest number of COVID-19 cases in the world: US Vice President Kamala Harris pic.twitter.com/NcoTGleClL

— ANI (@ANI) May 7, 2021

आम्ही भारताचे मित्र म्हणून आणि आशियामधील क्वाड देशांचे सदस्य म्हणून तसेच जागतिक समुहाचा महत्वाचा भाग म्हणून भारताला मदत करण्याचा निर्णय घेतलाय असं कमला हॅरिस यांनी स्पष्ट केलं आहे. भारताला मदत करण्यासाठी आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत असा शब्दही कमला हॅरिस यांनी यावेळी बोलताना दिला.