पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठात एका प्राध्यापकांनी एका दलित विद्यार्थाला अपवित्र म्हणत त्याच्याशी संवाद साधण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी विद्यार्थ्यानं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार विद्यार्थी हा अर्थशात्र विभागात शिकतोय. २१ व्या शतकात विद्यापीठांमध्येही विद्यार्थांना जातीवाचक शिवीगाळ आणि भेदभावाची प्रकरणं समोर येणं दुर्दैवी आहे.

विद्यार्थ्यानं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “आज मी अचानक बोलपूरच्या श्यामबाटी भागातील एका चहाच्या दुकानात प्राध्यापक सुमित बासूंना भेटलो. सुमीत बसूंनी माझ्याविरोधात जातीवाचक अपशब्द वापरले. आणि त्यांना माझ्याशी बोलायचे नाही असं म्हटलं. अनुसूचित जातीच्या (एससी) समाजातील व्यक्तीशी बोलल्यास ते आपला सन्मान गमावतील, असं म्हटलं. तसेच त्यांनी मला मारण्याची धमकी दिली आणि मला दलित आणि अपवित्र म्हटले. मी त्याच्याविरोधात शांतिनिकेतन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे,” असंही प्राध्यापक बासूंनी म्हटल्याचं या विद्यार्थ्यानं तक्रारीत म्हटलंय.

दरम्यान, संगीत भवनातील मणिपुरी नृत्याचे शिक्षक सुमित बसू यांनीही या विद्यार्थाने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, कुलगुरूंच्या विरोधात विद्यार्थ्यांना भडकवल्याच्या आरोपाखाली व्हीबीयूने अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापक सुदिप्ता भट्टाचार्य यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. सुदिप्ता यांना काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले आहे.