विराज जगताप  खून प्रकरण ; जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल केल्यास कठोर कारवाई

पोलिसांचा कडक इशारा; सायबर सेल सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून

पिंपरी-चिंचवडमध्ये  विराज विलास जगताप  या वीस वर्षीय तरुणाची सहा जणांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी सर्व आरोपी जेरबंद आहेत. परंतु, समाजात तेढ निर्माण करणारे काही मेसेज, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित केले जात असल्याचे निदर्शास येत आहे.  या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण होईल असे मेसेज, व्हिडिओ हे टिकटॉक, फेसबूक, इंन्स्टग्राम, टेलिग्राम, ट्विटरवर प्रसारित करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. असे केल्याचं आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून सायबर सेल सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे म्हणाले की, ८ जून रोजी विराजचा खून झाला. तांत्रिक आधारे गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. तपासात कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही. तरी सर्व नागरिकांना आवाहन आहे की, पोलीस यंत्रणेवर विश्वास ठेवावा. घटनेचा जो तपास होईल तो पुराव्याच्या आधारावर होईल.

संबंधित घटनेप्रकरणी काहीजण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून सायबर सेल हे सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. जातीय तेढ निर्माण होईल असं काही कृत्य करू नका. सोशल मीडियावर कमेंट किंवा इतर गोष्टी प्रसारित करू नयेत. तसं कोणी केल्याचं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viraj jagtap murder case strict action if the post goes viral which will create social rift msr 87 kjp