पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या विजयाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा सामना रविवारी दुबईत झाला. पाकिस्तानच्या विजयानंतर भारतात अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या नागरिकांवर मानवतावादी आधारावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली (Unlawful Activities Prevention Act) कारवाई करण्यात येत आहे. देशात जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी याप्रकरणी कारवाई करण्यात आली. दरम्यान या कारवाईला आता विरोध होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील पाकिस्तानी खेळाडूंचे कौतुक केले तर त्याला युएपीए अंतर्गत अटक करणार का?, असा प्रश्न महाराष्ट्र सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.

पीडीपीए प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी देखील जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध यूएपीए अंतर्गत केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. जम्मू-काश्मीर स्टुडंट्स युनियनने लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी देखील आरोप रद्द करण्याची विनंती केली आहे. 

दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूचं कौतुक करणाऱ्या विराट कोहलीला युएपीए खाली अटक करणार का?, असा प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकीय आणि क्रिडा वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानला मिठी मारली. भारताने सामना गमावला असाला तरी पाकिस्तानमध्ये देखील विराटची जोरदार चर्चा रंगली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक फोटो शेअर करून कर्णधार विराट कोहलीची देखील स्तुती केली आहे. आता यावर प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत.

पाकिस्ताननं वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच भारताला पराभूत करत विजयारंभ केला आहे. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराटने किल्ला लढवला. त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तानने भारतानं दिलेलं आव्हान १० गडी राखून पूर्ण केलं. सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी दमदार १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. या दरम्यान विराट कोहलीने मैदानात रिझवान आणि कप्तान बाबर आझमचे कौतुक केले. त्याचे पाकिस्तानी खेळाडूचं कौतुक करणारे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान याला आता राजकीय वळण मिळत आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे.