सातारा महाबळेश्वर येथे मुसळधार पाऊस सुरूच आहे. सततच्या पावसाने कोयना,धोम धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कोयना धरणातून ५० हजार क्युसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. धोम धरणातूनही कृष्णा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजता कोयना धरणाच्या दरवाजातून ३५,१७१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले असून ओढेनाले दुथडी भरून वहत आहेत. शेती, घरे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक रस्त्यावरील साकव, छोटे पूल वाहून गेल्याने काही भागांचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वर येथे मागील २४ तासात ५८१मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. कोयना, कन्हेर धोम, बलकवडी, उरमोडी, तारळी धरणे व खोडशी बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने कोयना व धोम धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

कोयना धरणामधून आज सकाळी ८ वाजता सांडव्यावरुन ९५६७ क्युसेक्स विसर्ग ( २ फुट) व पायथा विद्युत गृहातून २१०० क्युसेक्स असा एकूण ११६६७ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी दहा नंतर विसर्ग वाढवून ५० क्युसेक्स (५ फुट) इतका करण्यात आला आहे. आज पहाटे चार वाजता धोम धरणाचे वक्र दरवाजातून ३४१० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. विसर्गामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली कराड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. कराड शहरातील पाटण कॉलनी व दत्त चौकातील साईबाबा मंदिरात पाणी शिरले आहे.

देवरूखकरवाडी येथील २० घरांच्या वस्तीवर दरड कोसळली-

महाबळेश्वर येथे मागील चोवीस तासात ५८१ मिमी पाऊस झाला. तर, महाबळेश्वर शहरात ५९४, मिमी, पाचगणी ४९८ मिमी,तापोळा ६११ मिमी, लामज ६२० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे मागील दोन दिवसात १०६१ मिमी, शहरात ३५४३.७० तर तालुक्यात ३५३५.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. देवरूखकरवाडी (वाई) येथील २० घरांच्या वस्तीवर गुरुवारी रात्री दरड कोसळली. यामध्ये पाच घरे व त्यातील कुटुंबं बाधित झाली. अंदाजे २० लोक अडकले होती. १५ लोकांना बाहेर काढले असून, पाच लोक आत अडकले आहेत.

आमदार मकरंद पाटील स्वतः अनेक कार्यकर्त्यावर शहर मदत कार्यात सहभागी झाले असून, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले तहसीलदार रणजित भोसले पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी रुग्णवाहिका सह रात्रभर बचावकार्य सुरु आहे. जखमींना वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने साताऱ्याची संगम माऊली येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने अनेक भागात अंधाराचे साम्राज्य आहे जिल्हाधिकारी शेखरसिंग सर्व परिस्थितीचा सतत आढावा घेत आहे . उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या माध्यमातून सर्वांच्या संपर्कात आहेत. वेळोवेळी परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. एकूणच साताऱ्याचे जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे.