बिहारमधील चंपारण जिल्ह्यात नक्षलवादी संघटनेत सामील होण्यास नकार देणाऱ्या महिलेवर संघटनेतील नक्षलवाद्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नक्षलवादी पसार झाले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

चंपारण जिल्ह्यातील कंगली ठाण्याच्या हद्दीतील परशुराम नोकाटोला गावातील एका ३० वर्षांच्या महिलेला काही नक्षलवाद्यांनी संघटनेत सामील होण्यास सांगितले. तिला धमकावण्यातही आले. मात्र, तिने त्यास ठाम नकार दिला. त्यानंतर चिडलेल्या नक्षलवाद्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री काही नक्षलवाद्यांनी महिलेच्या घराचा दरवाजा तोडला आणि जबरदस्ती आतमध्ये घुसले. नक्षलवादी संघटनेत सामील होण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला, अशी तक्रार पीडित महिलेने टाकला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित महिलेने नक्षलवादी संघटनेत सहभागी होण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या शस्त्रधारी नक्षलवाद्यांनी तिचे घरातून अपहरण केले. जवळच्याच शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर नक्षलवादी पसार झाले. या घटनेने घाबरलेल्या महिलेने पोलीस ठाणे गाठले. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंग पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.