World Heart Day Special : शीव रुग्णालयात करोना कळात तबब्ल ३२५९ ह्रदयविकार रुग्णांवर उपचार!

गेल्या दोन वर्षातील करोना काळात शीव रुग्णालयातील ह्रदयरोग उपचार विभागात जवळपास शंभरहून अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

heart surgeries in sion hospital
मुंबईच्या सायन रुग्णायलायत मोठ्या प्रमाणावर झाल्या ह्रदय विकार शस्त्रक्रिया!

संदीप आचार्य
राजाभाऊंना ( नाव बदलून) सकाळपासून अस्वस्थ वाटत होते. छातीत कळ येऊन गेली. ७३ वर्षांच्या राजाभाऊंना मधुमेहासह अनेक व्याधी असल्याने घरच्यांनी तातडीने एका मोठ्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे जागा नसल्याचे कारण देत दाखल करून घेतले नाही… करोनाच्या पहिल्या टप्प्यात असा अनुभव अनेक रुग्णांनी घेतला आहे. दोनचार मोठी रुग्णालये फिरल्यावर घरच्यांनी रुग्णवाहिका सरळ पालिकेच्या शीव रुग्णालयात नेली. तेथे ह्रदयविकार विभागाच्या डॉक्टरांनी तातडीने दाखल तर करून घेतले आणि रात्री यशस्वी अँजिओप्लास्टी देखील केली. गेल्या दोन वर्षातील करोना काळात शीव रुग्णालयातील ह्रदयरोग उपचार विभागात जवळपास शंभरहून अधिक ज्येष्ठ ह्रदरुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या ६७ वर्षाच्या रामभाऊंनाही ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर घरच्यांनी आधी मोठ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न केले. मात्र कोणीच दाखल न केल्याने अखेर त्यांनी शीव रुग्णालय गाठले. तेथे ह्रदयविकार विभागात रामभाऊंना दाखल करून त्यांच्यावरही यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. करोनाच्या गेल्या दोन महिन्यात शीव रुग्णालयातील ह्रदयविकार विभागात अशा जवळपास १९० रुग्णांवर उपचार करण्यात आले असून यात ६० हून अधिक रुग्णांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे या विभागातील प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांनी सांगितले. या १९० रुग्णांमध्ये साठ वर्षांवरील २५ रुग्ण असून उपचारानंतर आता या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे व यातील बहुतेकांना घरी सोडण्यात आल्याचेही डॉ. अजय महाजन यांनी सांगितले.

करोनाच्या लढाईत महापालिकेची शीव, नायर व केईएम रुग्णालये मोठी झुंज देत आहेत. शेकडो करोना रुग्णांवर जीवाची बाजी लावून पालिकेचे डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी उपचारांची शिकस्त करत आहेत. करोनाच्या लढाईत या तिन्ही रुग्णालयातील शेकडो डॉक्टर व परिचारिकांना क्वारंटाईन व्हावे लागले आहे. एकट्या शीव रुग्णालयात शंभरहून अधिक डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आल्याचे येथील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. तथापि आमच्या डॉक्टरांनी रुग्णसेवेचे व्रत अखंड सुरु ठेवल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

आमच्या सर्वच विभागातील डॉक्टरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे सांगून अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, खाजगी रुग्णालये नाकारत असलेल्या ह्रदयविकाराच्या रुग्णांवर शीव रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया केल्या जातात हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे. शीव रुग्णालयाच्या ह्रदयविकार विभागात एकूण २८ खाटा आहेत तर अतिदक्षता विभागात १४ खाटा आहेत. करोनाच्या काळातही बाह्यरुग्ण विभागात रोज २५ ते ३० रुग्ण उपचारासाठी येत असून एरवीच्या तुलनेत हे प्रमाण नक्कीच कमी आहे. गेल्या दोन महिन्यात आमच्या विभागात १९० रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच पेसमेकर बसविण्यापासून विविध ह्रदयोपचार करण्यात आल्याचे डॉ. अजय महाजन म्हणाले.

आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांची करोना चाचणी केली जाते. मात्र प्रथम आम्ही रुग्णावर उपचार करतो. येणारा प्रत्येक रुग्ण हा संशयित करोना रुग्ण म्हणूनच पाहिला जातो. महत्वाचे म्हणजे ह्रदयविकाराच्या सर्व प्रक्रिया आम्ही करोनाचा पोषाख घालूनच करतो, असेही डॉ. महाजन म्हणाले. ह्रदयविकार शस्त्रक्रिया करताना अॅनॅस्थेशियाच्या डॉ. शकुंतला, आमचे विभागप्रमुख डॉ नाथानी, डॉ. नवीन, डॉ. मिलिंद फडके, डॉ. अभय तिडके तसेच ह्रदयशल्यचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयंत खांडेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही डॉ. महाजन म्हणाले. करोनाच्या काळातही २५ हून अधिक ज्येष्ठ नागरिकांवर आम्ही यशस्वी अँजिओप्लास्टी करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे, असेही डॉ. अजय महाजन म्हणाले.

शीव रुग्णालयातील ह्रदयविकार विभागात गेली अनेक वर्षे गुंतागुंतीच्या व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात आहेत. करोनाच्या काळातही येथील सर्व डॉक्टर ह्रदयविकाराच्या शेकडो रुग्णांवर उपचार करत असून खाजगी रुग्णालयात उपचार नाकारले जात असले तरी शीव रुग्णालयात तुम्हाला सर्वोत्तम उपचार मिळतील याची खात्री बाळगा, असे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. रुग्णसेवा हेच आमचे व्रत आहे आणि तेच आमचे ब्रिद असल्याचेही डॉ. भारमल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: World heart day sion hospital in mumbai 3259 heart surgeries during covid pandemic pmw

फोटो गॅलरी