आज पर्यंत तुम्ही किती महागडे मासे पाहिलेत ? तर मग आम्ही तुम्हाला एवढा महागडा मासा दाखवणार आहोत जो याआधी तुम्ही कधीच पाहिला नसेल. या माशाची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हजार, लाख रुपये या माशाची किंमत नाहीये तर तब्बल १२.८ कोटी रुपये इतकी किंमत या माशाची आहे. इंग्लंडमध्ये काही दिवसांपूर्वीच हा मासा दिसून आलाय. या माशाची प्रजाती लुप्त पावत चालली असून दुसऱ्यांदा या माश्याने दर्शन घडवलंय.

इंग्लंडमधल्या एका प्रादेशिक जल सीमा भागात जगातला सर्वात महागडा मासा आढळून आलाय. अटलांटिक ब्लूफिन टूना प्रजातीचा हा मासा असून देशाच्या समुद्र किनाऱ्यापासून ३ ते १२ मैल अंतरापर्यंत हे आढळतात. या क्षेत्रात संबंधित देशाच्या परवानगीशिवाय इतर देशांचे जहाज प्रवेश करू शकत नाही. ‘ब्लूफिन ट्यूना’ला त्याच्या चव आणि गुणवत्तेसाठी ‘जगातील सर्वात महाग मासा’ म्हणून संबोधलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत माशांची मागणी खूप जास्त आहे. कारण प्रमुख कंपन्या आणि रेस्टॉरंट्स त्यांच्या मेनूसाठी हा मासा मिळविण्याचा प्रयत्न करत असतात.

या माशाची इतकी मागणी आहे की जेव्हा जेव्हा हा मासा पकडला जातो त्या त्या वेळी या माश्याच्या खरेदीसाठी अक्षरशः रांग लागते. इतकंच काय तर हा मासा खरेदी करण्यासाठी बोली देखील लावण्यात येते. अलीकडेच, हा जगातील सर्वात महाग मासा यूकेमध्ये कॉर्नवॉलमधील सेंट इव्हसच्या किनाऱ्याजवळ एका स्वयंसेवकाने पाहिला होता. सेंट इव्हस नॅशनल कोस्टवॉच संस्थेचे पीटर नॅसनने हा जगातील सर्वात महागडा मासा पाहिला आणि त्याच्या कॅमेर्‍यात याचे काही फोटोज आणि क्लिप रेकॉर्ड केले. या क्लिपमध्ये मासा पाण्यातून बाहेर पडताना आणि हवेत झेपावतानाही दिसून येत आहे.

अटलांटिक ब्लूफिन टूना माशाची लांबी तीन मीटर इतकी लांब असू शकते. त्याशिवाय, माशाचे वजन २५० किलोपर्यंत असू शकते. या माशाचा समावेश लुप्त होणाऱ्या प्रजातीत आहे. टूना माशापासून माणसांना धोका नाही. या माशाची प्रजाती दुर्मिळ लुप्त पावत असल्यान ब्रिटनमध्ये मासे पकडण्यावर बंदी आहे. इतर देशातील मच्छिमारांकडून अटलांटिक ब्लूफिन टूना मासा पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असतात.