हरयाणाच्या सोनीपत येथील धक्कादायक घटना; नामसाधर्म्यामुळे गोंधळ

निशा दहिया नामक विद्यापीठ स्तरावरील महिला कुस्तीपटू आणि तिच्या भावाची हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील कुस्ती अकादमीत बुधवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यात तिच्या आईलाही गंभीर दुखापत झाली असून या धक्कादायक घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी अकादमीला आग लावली.

निशाच्या नावावरून गोंधळही निर्माण झाला. निशा दहिया असेच नाव असलेल्या भारतीय कुस्तीपटूने नुकत्याच बेलग्रेड येथे झालेल्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळे काहींचा नावामुळे गैरसमज झाला. सोनीपतच्या हलालपूर परिसरात असलेल्या या कुस्ती अकादमीचा प्रशिक्षक आणि मालकाने ही घटना घडवून आणल्याचा पोलिसांना संशय आहे.

सोनीपतचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मयांक गुप्ता यांनी निशा (वय २० वर्षे) आणि तिचा भाऊ सूरज (१८) यांची हत्या झाल्याची माहिती देतानाच ती जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती कुस्तीपटू नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. प्रशिक्षक पवन आणि अन्य काही जणांनी गोळ्यांच्या पाच-सहा फैरी झाडल्या. यात निशा आणि तिच्या भावाचा मृत्यू झाला. निशाचा मृतदेह अकादमीच्या प्रवेशद्वाराजवळ आढळला.