News Flash

एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग

‘एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग’ या अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणसंस्था आणि करिअर संधींची सविस्तर ओळख-

| May 24, 2014 01:58 am

‘एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग’ या अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणसंस्था आणि  करिअर संधींची सविस्तर ओळख-
गेल्या काही वर्षांत हवाई दळवळण वेगाने वाढत आहे. सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक प्रवासी आणि मालवाहू विमाने जगाच्या विविध भागांत सध्या कार्यरत आहेत.  याशिवाय खासगी आणि छोटय़ा विमानांची संख्याही चार लाखांवर आहे. मंदीच्या काळातही या वाढीवर फारसा परिणाम झालेला नाही. जगभरात नव्या, मोठय़ा, अद्ययावत विमानतळांची उभारणी वेगाने होत आहे. जुन्या विमानतळांचे नूतनीकरण आणि विस्तारीकरणही तितक्याच वेगाने होत आहे. अत्याधुनिक विमानांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग आला आहे. हे क्षेत्र खासगी व्यावसायिकांना खुले केल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई दळणवळण क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी विविध देशांमध्ये सेवा सुरू केल्या आहेत आणि त्यामुळे या क्षेत्रातील करिअरच्या संधींमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे.
एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअर हे विमानांच्या देखभाल, दुरुस्ती, नियंत्रणाचे तज्ज्ञ समजले जातात. विमानाचे उड्डाण होण्याआधी या तज्ज्ञांकडून त्याची तपासणी केली जाते. विमानाच्या इंजिनाचे कामकाज उत्तमरीत्या सुरू राहण्याच्या दृष्टीने या अभियंत्यांना कार्यरत राहावे लागते. या अभियंत्यांना विमानाच्या प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. यामध्ये विमानाच्या विविध भागांचे डिझाइन किंवा इंजिन डिझाइन या बाबींचा समावेश आहे. विमान निर्मिती प्रक्रियेत येणाऱ्या विविध अभियांत्रिकी समस्यांच्या सोडवणुकीचे कामही या अभियंत्यांना करावे लागते.
एअरक्राफ्ट मेन्टेनन्स हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या वतीने परवाना दिला जातो.
एअरक्राफ्ट मेन्टेनन्स या अभ्यासक्रमात मेकॅनिकल आणि एव्हिऑनिक्स या दोन विद्याशाखांचा समावेश होतो. मेकॅनिकल शाखेमध्ये जेट, पिस्टन इंजिन, हलके आणि जड विमानांच्या देखभाल-दुरुस्ती अभ्यासक्रमाचा समावेश असतो. तर एव्हिऑनिक्स या शाखेत रेडिओ नेव्हिगेशन, विद्युत आणि यंत्रप्रणालीची कार्यपद्धती या विषयांचा समावेश असतो.
अर्हता- या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत. हा अभ्यासक्रम मुलांसोबतच मुलींनाही करता येतो.
कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदविका किंवा बीएस्सी पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांनाही हा अभ्यासक्रम करता येतो. अशा विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा अभ्यास केलेला असावा.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘डीजीसीए’मार्फत घेण्यात येणारी एअरक्राफ्ट मेन्टेनन्स लायसेन्सिंग एक्झामिनेशन द्यावी लागते. ही परीक्षा नसून परवाना प्राप्त करण्यासाठीचा विशेष कार्यक्रम आहे. तो पूर्ण केल्यानंतर परवाना दिला जातो. हा परवाना विशिष्ट विमानाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी दिला जातो. उदाहरणार्थ- बोइंग विमानाच्या देखभालीचा परवाना मिळालेल्या अभियंत्याला केवळ याच विमानाचे परीक्षण करता येते. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांला विमान निर्मिती कंपन्या, विमान देखभाल कंपन्या तसेच विमानतळावर करिअरच्या संधी उपलब्ध होऊ  शकतात.
हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार असोसिएट मेंबरशिप ऑफ एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया ही परीक्षा देऊन त्यात अर्हता प्राप्त करू शकतात. ही अर्हता बीई किंवा बी.टेक. इन एरोनॉटिकल इंजिनीअरिंगच्या समकक्ष समजली जाते. ही अर्हता प्राप्त केल्यावर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, एअर इंडिया, बीएचईएल, डीआरडीओ, भारतीय नौदल, तटरक्षक दल तसेच विविध विमान उत्पादक कंपन्यांमध्ये अभियंता म्हणून संधी मिळू शकते. ही प्राप्त केल्यावर उमेदवाराला एम.टेक. प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या GATE प्रवेश परीक्षाला बसता येते.
प्रशिक्षण देणाऱ्या संस्था
* हिंदुस्थान एव्हिएशन अ‍ॅकॅडमी.
पत्ता- हिंदुस्थान एव्हिएशन अ‍ॅकॅडेमी, पोस्ट बॉक्स क्रमांक- ३७७६, चिन्नाप्पनाहल्ली, माराथल्ली पोस्ट, बंगलोर ५६००३७, कर्नाटक. वेबसाइट- www.hindustanacademy.com , ईमेल- contactus@evehans.com
* ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी
पत्ता- ठाकूर कॉम्प्लेक्स, ९० फूट रस्ता, पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१.
वेबसाइट- www.thakureducation.org ,  ईमल- tiat@thakureducation.org
* इंडियन एरोस्पेस अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग
 जेएमडी, डी ५११, एमआयडीसी परिसर, तुर्भे पोलीस स्टेशनजवळ टीटीसी
औद्योगिक परिसर, तुर्भे,  नवी मुंबई- ४००७०५.
वेबसाइट – www.shashibgroup.org
* हिंदुस्थान एरोस्पेस अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग
 प्लॉट नंबर २४७, विद्यांचल इंग्रजी उच्च माध्यमिक शाळेजवळ, बाणेर रोड, पुणे- ४११००७.
ईमेल- hae.shashib@gmail.com
वेबसाइट- www.haepune.com
* राजीव गांधी मेमोरिअल कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स
पत्ता- राजीव गांधी मेमोरिअल कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स, अपोझिट संगानेर एअरपोर्ट, जयपूर- ३०२०११. राजस्थान.
वेबसाइट- www.rgmca.com
ईमेल- rgmca_amemail.com
*  द बॉम्बे फ्लाइंग क्लब

बॅचरल ऑफ सायन्स इन एरोनॉटिक्स इन एविओनिक्स अ‍ॅण्ड मेकॅनिकल. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- फिजिक्स, मॅथेमॅटिक्स इंग्रजी विषयांसह बारावी उत्तीर्ण. पत्ता- द बॉम्बे फ्लाइंग क्लब, जुहू विलेपार्ले, मुंबई- ५६.
वेबसाइट- www.bfcaviation.com ,www.thebombayflyingclub.com
* इन्स्टिटय़ूट ऑफ एअरक्राफ्ट मेन्टेनन्स     इंजिनीअरिंग,  औरंगाबाद.
 या संस्थेने सुरू केलेल्या एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग या अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. प्रवेशजागा – ६०. अनुसूचित जाती या संवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते. बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची व्यवस्था उपलब्ध आहे. शैक्षणिक कर्जाची सोयही उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. त्यासाठी संस्थेकडे दोन विमाने उपलब्ध आहेत.
पत्ता- इन्स्टिटय़ूट ऑफ एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग, गव्हर्नमेन्ट पॉलिटेक्निक उस्मानपुरा. औरंगाबाद- ४३१००५. वेबसाइट- www.iameaurangabad.com ,    ईमेल- abad@yahoo..com
* ओरिएन्टल फ्लाइट स्कूल
हिंदुस्थान ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन या संस्थेचे ओरिएन्टल फ्लाइट स्कूल गेल्या १९ वर्षांपासून कार्यरत आहे. १९९४ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेला केंद्र सरकारच्या डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिशनने मान्यता प्रदान केली आहे. या स्कूलमार्फत एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग इन मेकॅनिकल आणि एअरक्राफ्ट मेन्टेनन्स इंजिनीअरिंग इन एविऑनिक्स हे दोन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षांचा आहे.
अर्हता- गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय घेऊन ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमांना केंद्र सरकारच्या डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने मान्यता प्रदान केली आहे.
पत्ता- हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी, नवालूर रोड, वेलारिथंगल व्हिलेज, श्रीपेरांबुदूर तालुका, जिल्हा कांचीपुरम- ६०१३०१.
ईमेल- info@hiet.nic.in  , वेबसाइट- www.orientfligts.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 1:58 am

Web Title: aircraft maintenance engineer
Next Stories
1 ‘डीआरडीओ’तील संशोधन संधी
2 ‘सेस्मॉलॉजी’चा अभ्यास
3 अणू तंत्रज्ञानातील संधी
Just Now!
X