मी कुठेच एका ठिकाणी फार काळ रुजलो नाही. त्यामुळे खरा नाना कोणता हा प्रश्नच मला पडला नाही आणि कुठे तरी स्थिर झालो, तर मला असं वाटेल की मी चुकलो आहे. वडासारखं असलं पाहिजे. कुठे रुजलं आहे तेच कळत नाही, पारंबीचाही वृक्ष होतो तसं माझं झालं. म्हणजे जे.जे.मधून बाहेर पडलो. मग बाबा आमटे आल्यानंतर वेगळं झालं किंवा ‘प्रहार’ चित्रपटाची गोष्ट डोक्यात असताना आर्मीत प्रवेश करावासा वाटला.. मग तीन र्वष तिथे होतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला काय पाहिजे आहे, ते समजलं.
मला असं नेहमी वाटायचं की, माझ्या वडिलांचं माझ्यावर कमी लक्ष आहे. माझी भावंडं दिसायला सुंदर होती. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष आहे असं मला वाटायचं. एकदा चौथीत असताना मुरुड-जंजिऱ्याला मी शाळेत नाटकात काम केलं होतं. ते पाहायला मुंबईहून वडील आले होते. तेव्हा मला वाटलं की, नाही, त्यांचं माझ्याकडेही लक्ष आहे. फक्त त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी होती. पण, त्यांच्यासाठी म्हणून मी नाटकात काम करायला लागलो आणि जेव्हा जेव्हा मी नाटक करायचो, तेव्हा ते बघायला वडील यायचे.
सुलभाताई आणि अरविंद देशपांडेंनी मला नाटकात आणलं. टेनिसी विल्यम्सचा एक सिनेमा आला होता, ‘रोझ टॅटु’ नावाचा. त्याचं व्यंकटेश माडगूळकरांनी ‘गौराई’ म्हणून अ‍ॅडॉप्टेशन केलं होतं. त्यातल्या ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेसाठी मला घेतलं. त्याचं झालं असं की, मी ‘चांगुणा’ नाटकाची सतीश पुळेकरची तालीम बघायला गेलो होतो. तेव्हा सुलभा म्हणाली, ‘अरविंद, तो मुलगा आहे ना. तो चांगला आहे या भूमिकेसाठी.’ अशा तऱ्हेने मी नाटकात आलो. आणि पहिल्याच फटक्यात मला उत्तम अभिनयाचं पारितोषिक मिळालं, फायनललाही पारितोषिक मिळालं. मग मला आपण नट असल्याचा साक्षात्कार झाला. मग नोकरी करायची की पूर्णवेळ नाटक, या प्रश्नात मी नोकरी सोडून दिली. ‘पाहिजे जातीचे’ करत असताना मला २५ रुपये मिळायचे. ‘गौराई’ करताना मला प्रयोगाला १०० रुपये मिळायचे. त्यावेळी १०० रुपये मोठे होते. त्याला काहीएक किंमत होती. मोहन गोखलेकडे रहायचो. त्यामुळे राहण्याचा खर्च नव्हता. मला नाटकात काम करण्याचं एक कारण होतं, ते म्हणजे कळकळ. पैसा आणि नावलौकिक हे नव्हतं. मी नशीबवान होतो, मला कुठेही गोठवून राहावं लागलं नाही. गोठायला लागायच्या आधीच माझ्या बाजूला दुसरा कुठला तरी माणूस येऊन उभा राहायचा. मी तिथे वितळायचो.मग दुसरीकडे, तिसरीकडे..

लोकांना तेही आवडेल
आयटम साँग वाईटच आहे. माझ्या चित्रपटात आयटम साँग पाहिलंत का? माझ्या चित्रपटातलं आयटम साँग म्हणजे मलाच नाचायला लागेल. त्याचंही कौतुक होईल, कारण नाना नाचला. कतरिना कैफ सगळीकडेच नाचते, नाना नाही नाचत. माझा ‘२६/११’सारखा चित्रपट असेल तर त्यात आयटम साँग नसणार. ‘अब तक छप्पन’सारख्या चित्रपटातही नसेल. ‘अब तक छप्पन २’ करताना त्यात एक गाणं टाकायचं असं दिग्दर्शकानं निर्मात्याला कबूल केलं असल्याची बातमी मला मिळाली. तेव्हा मी म्हटलं, ‘ठीक आहे.  ते गाणं लागायच्या आधी मधेच मी प्रेक्षकांना सांगेन, ‘माफ करा, या गाण्याचा या सिनेमाशी काही संबंध नाही. कोणाला बाथरूमला जायचं असेल तर जाऊन या. आमच्या निर्मात्यांनी हा व्यवहार कबूल केला होता. मी नाना एक नट म्हणून तुम्हाला ही विनंती करतो.’ ..आणि खरोखरच मी असं करेन. कदाचित लोकांना तेही आवडेल.

मी शिवसेनेचा पुरस्कर्ता नाही
मी बाळासाहेबांचा समर्थक होतो, शिवसेनेचा पुरस्कर्ता कधीही नव्हतो. माझा मी एकटा, मी कुठल्याच पक्षाचा नाही. मला बाळासाहेब व्यक्ती म्हणून आवडायचे. त्यांनी संचय कधी केला नाही. मला तो माणूस त्यासाठी आवडायचा. बाळासाहेबांनी मला थोरल्या मुलासारखं वागवलं. अगदी निरपेक्ष प्रेमानं वागवलं. मनोहर जोशी आमचे गुरुजी होते, पण ते मला कधीच काही शिकवू शकले नाहीत.
बाळासाहेबांची एखादी गोष्ट नाही पटली तर मी बोलायचो. त्यांची आत-बाहेर काही नाही, अशी जी वृत्ती होती ती मला आवडायची. राज ठाकरे मला आवडतात. अजितदादा पवार मला आवडतात. मला अजितदादांचा सडेतोडपणा, निर्णय घेण्याची हातोटी आवडते. मी कलाकार आहे, त्यामुळे प्रत्येकातलं चांगलं तेवढंच मी घेतो. वाईट सगळं घेत गेलो तर अडचण होईल. मला सगळ्या खलनायकाच्याच भूमिका कराव्या लागतील.

गोंधळ होतोय माझा
भूमिकेत शिरणं आणि भूमिकेत असणं हे चक्रव्यूहासारखं आहे. तुम्हाला बाहेर पडायचा मार्ग माहिती पाहिजे. ते जे जाणं-येणं आहे ते सतत सुरू राहिलं पाहिजे. मी जगलो, मी रडलो आणि मग बाहेरच आलो नाही, असं म्हणणारी माणसं अतिशय वाईट अभिनेता आणि अभिनेत्री असतात, असं माझं मत आहे. सरतेशेवटी हा परफॉर्मन्स आहे. प्रेक्षकामधली आणि आपल्यातली जी अदृश्य भिंत असते, ती थोडा वेळ पाडायची, पुन्हा बांधायची, पुन्हा पाडायची.. तर त्यात गंमत आहे. काही काही वेळा गोंधळ होतो. माणूस म्हणून जगणं आणि अभिनेता म्हणून जगणं याची सरमिसळ व्हायला लागलेली आहे आणि त्यामुळे आता माझा गोंधळ उडायला लागला आहे.

ते माझं जिवंत मरण असेल!
सबकॉन्शस लेव्हलला मी वेगवेगळ्या गोष्टी करत राहतो. मी विमानात बसल्यावर शक्यतो कॉकपीटमध्ये बसतो. तिथे पायलट काय करतात ते बघत राहतो. सबकॉन्शस लेव्हलला ते झिरपवत ठेवतो. म्हणजे कधी मला पायलटची भूमिका करावी लागली तर ती सहज होऊन जाईल. हे मी सतत करत राहतो. ‘मोकळा वेळ आहे ना झोपू या’ असं माझ्या मनात अजिबात येत नाही. रात्री पडल्या पडल्या एका क्षणात मला झोप लागते. त्यासाठी दारू प्यावी लागत नाही. सिगारेटने मला त्रास व्हायला लागला. दिली एके दिवशी फेकून. त्याला आज पाच र्वष झाली. एकेकाळी मी दिवसाला साठ सिगारेट ओढायचो. व्यायाम मी रोज दोन तास करतोच करतो. अजून एकावेळी दोन-तीन माणसं आली, तर मी अंगावर घेऊ शकतो. तेवढी ताकद आहे. रस्त्यात एखादी घटना घडली तर गाडी थांबवून तिथे जायची शामत आहे माझी. कारण तिथे जरी मी पडलो, धडलो, लागलं, हात तुटला, डोळा फु टला तर मला त्याची पत्रास नाही. कारण ती माझी गरज आहे. त्यांची आहे की नाही माहीत नाही, पण माझी आहे आणि जोपर्यंत ही गरज आहे तोपर्यंत मी नट म्हणून जिवंत आहे, ज्या दिवसापासून ती संपेल तेव्हापासून माझं जिवंत मरण सुरू होईल.

नाटक आज चैन झालीय
नाटक करणं ही आज चैन झाली आहे. आमच्या वेळी नाटक करत असताना तारखा ठरलेल्या असायच्या. मग आमच्यातल्या कुणाला त्या वेळी दुसरं काही मिळत असेल तरी ते घेतलं जायचं नाही. म्हणजे बदली कलाकार हा प्रकार नसायचा. त्या वेळी प्रॉम्प्टिंग नव्हतं, रिकामं होणं माहीत नव्हतं. भूमिकेप्रतीची निष्ठा म्हणून जी काही आहे, ती आता कमी झाली आहे.

मी आजपर्यंत जे केलं ते माझ्यासाठी केलं. माझ्या स्वार्थासाठी केलं. मी नाटक केलं, माझ्यासाठी केलं. बाबा आमटेंकडे गेलो ते माझ्यासाठी गेलो. मला आर्मीत जावंसं वाटलं म्हणून मी गेलो. कोणाला दोन दीडक्या दिल्या असतील तर त्या मी माझ्यासाठी दिल्या. कारण त्यातून मिळणारा आनंद माझा होता. आयुष्याला चौकट आली ना की त्याची फ्रेम बनते. मला असं वाटतं आहे की, आयुष्य सोपं आहे आणि सुंदर आहे. आपली जबाबदारी आहे की, ते अजून सुंदर करावं आणि ते खूप सोपं आहे. चौकट नाही आखायची आयुष्याला. चौकट आखली की, फिर वो फ्रेम बन जाती हैं. उसमें मजा नहीं.