काय वर्णावा सोहळ्याचा थाट, माउलीच्या संगतीने धरली पंढरीची वाट.. सर्वोच्च भक्तीची अनुभूती नक्की काय असते अन् सोहळ्याचा दिमाखही काय असतो, याची ‘याचि देही याचि डोळा’ प्रचिती अलंकापुरीत मिळाली.. ऊन, वारा, पाऊस, कशाचीही तमा न बाळगता पंढरीच्या वाटेवरती निघालेल्या लाखो वैष्णवांचा भक्तिकल्लोळ.. ‘माउली -माउली’ असा अखंड घोष.. गुलाब पाकळ्यांची उधळण व रांगोळ्यांच्या पायघडय़ा, अशा दिमाखदार व भक्तिपूर्ण वातावरणात शुक्रवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्याने गुरुवारपासूनच अलंकापुरीत वारकऱ्यांची रीघ लागली होती. टाळ- मृदंगांचा गजर, अभंगांच्या सूरावटीने नगरीत भक्तिचैतन्य साकारले होते. इंद्रायणीचा घाट, समाधी मंदिर, महाद्वार, केळगाव, गोपाळपुरा व अलंकापुरीत येणारे सर्व रस्ते वारकऱ्यांनी फुलून गेले होते. पालखी प्रस्थानाच्या सोहळ्याची सुरुवात भल्या पहाटे झाली. पहाटे दोनच्या सुमारास घंटानाद करण्यात आला. त्यानंतर काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती करण्यात आली. दुपारी साडेबारा वाजता श्रींना महानेवैद्य झाला. त्यानंतर समाधी मंदिरातील गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी खुला करण्यात आला. दुपारी अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यासाठी पहिली िदडी मंदिरात प्रवेशली.  गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षांव व रांगोळ्याच्या पायघडय़ांवरून श्रींच्या अश्वांचे मंदिरात आगमन झाले.
संस्थानच्या वतीने मानकऱ्यांना मानाच्या पागोटय़ांचे वाटप झाल्यानंतर श्रीगुरू हैबतबाबांच्या वतीने मानकरी व दिंडी प्रमुखांना माउलींच्या चोपदारांच्या नियोजनाखाली नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आले. या दरम्यान मंदिर परिसरामध्ये वैष्णवांचा भक्तिकल्लोळ टिपेला पोहोचला होता. वारकऱ्यांचे विविध खेळ रंगले होते. वीणा मंडपामध्ये ‘माउली माऊली’ असा अखंड जयघोष करीत आळंदीकरांनी पालखी खांद्यावर घेतली. वीणा मंडपातून संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पालखीचे प्रस्थान झाले.
ऊर्जितसिंह शितोळे सरकार, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे प्रमुख विश्वस्त श्यामसुंदर मुळे, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख डॉ. शिवाजी मोहिते, प्रशांत सुरू, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे, आळंदीचे नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गिलबिले, यात्रा समिती सभापती सुशीला कु ऱ्हाडे, माजी विश्वस्त सुरेश गरसोळे, सु. वा. जोशी, सुधीर पिंपळे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पुणे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, प्रांताधिकारी हिंमत खराडे, तहसीलदार प्रशांत आवटे, मुख्याधिकारी विनायक औंधकर आदींची प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती होती.
प्रस्थानानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली. महाद्वारातून पालखी बाहेर पडल्यानंतर समाजआरती झाली व पालखी पहिल्या मुक्कामासाठी आजोळघरी दाखल झाली. शनिवारी सकाळी पालखी पुणे मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.