आज महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र यात ग्रामीण व शहरी भागाची दरी स्पष्टपणे दिसते. एम.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, मुंबई या शहरांमध्ये अभ्यासिकांची संख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढलेली आहे. खरेतर या परीक्षेचे स्वरूप अभ्यासासाठी लागणारे अभ्याससाहित्य व योग्य नियोजन केल्यास आपण आहे तेथून देखील या परीक्षेची तयारी करू शकतो.
दरवर्षी एम.पी.एस.सी.द्वारे नागरी प्रशासनाचा गट अ व गट ब या श्रेणीच्या पदांसाठी एक साधारण परीक्षा घेतली जाते. विक्रीकर निरीक्षक सहायक, पोलीस निरीक्षक या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शिक्षण क्षेत्रातील विशेष पदांसाठी एम.पी.एस.सी. वेगवेगळय़ा परीक्षांचे आयोजन करते. राज्यसेवा परीक्षांद्वारे उपजिल्हाधिकारी गट अ तसेच पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त गट अ, याबरोबरच प्रशासनातील जवळजवळ १६ ते १७ पदांसाठी परीक्षा घेत असतात.
एम.पी.एस.सी.द्वारा भरली जाणारी पदे – १) उपजिल्हाधिकारी, गट अ  २) पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त – गट अ, ३) सहायक विक्रीकर आयुक्त- गट अ, ४) उपनिबंधक सहकारी संस्था- गट अ,  ५) उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी)- गट अ , ६) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ (कनिष्ठ), ७) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, ८) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट अ, ९) तहसीलदार-गट अ, १०) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी- गट ब,  ११) महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा-गट ब, १२) कक्ष अधिकारी- गट ब, १३) गटविकास अधिकारी- गट ब १४) मुख्याधिकारी नगरपालिका, १५) सहायक निबंधक सहकारी संस्था- गट ब, १६) उपअधीक्षक, भूमिअभिलेख- गट ब, १७) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- गट ब, १८) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क- गट ब  १९) नायब तहसीलदार- गट ब.
एम.पी.एस.सी. परीक्षा ही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्प्यांत होते हे आपणास माहीत आहेच. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वेळोवेळी जाहीर केला जातो. दरवर्षी ३ ते ४ लाख विद्यार्थी प्रशासनात येण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात, मात्र यांपकी काहींनाच यात यश प्राप्त होते मग ही परीक्षा अवघड असते का? उत्तर हे नकारार्थी आहे. या परीक्षेबद्दल योग्य माहिती करून घेतली व अभ्यासाचे नियोजन करून घेतले तर या परीक्षेत आपण नक्कीच यश प्राप्त करू शकतो.
परीक्षेच्या तयारीला सुरुवात कधी करावी- शक्यतो पदवी परीक्षेच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांपासून तयारी सुरुवात केल्यास जास्त चांगले असते, कारण अभ्यासक्रमात नमूद केलेल्या सर्व घटकांची सखोल तयारी करायला मोठा वेळ मिळतो. मात्र ग्रामीण व शहरी भागातील काही विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल माहिती उशिरा मिळते, मिळाली तरी ती योग्यप्रकारे मिळत नाही त्यामुळे वेगवेगळय़ा गरसमजुती पसरवल्या जातात. जर आपण पदवीधारक असणार व पदवी धारण करून काही वर्षे झाली असली तरी निराश होण्याचे काही कारण नाही. एक योग्य नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केल्यास आपण या परीक्षेची तयारी उत्तमपणे करू शकते. सर्वात आवश्यक अशी बाब म्हणजे सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतची महाराष्ट्र शासनाची शालेय पाठय़क्रमातील पुस्तके वाचून काढावीत. कारण या पुस्तकांच्या वाचनाने पुढचा अभ्यासक्रम समजणे सोपे होते.
गेल्या काही वर्षांपासून खूप सारे प्रश्न या पुस्तकातून विचारले जातात. विशेषत: इतिहास, भूगोल व विज्ञान ही पुस्तके वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
वयोमर्यादा – साधारण प्रवर्गासाठी किमान १९ वष्रे व कमाल ३३ वष्रे वयोमर्यादा निर्धारित केली आहे. कमाल वयोमर्यादा खालील बाबतींत शिथिलक्षम करण्यात आली आहे.
१) शासनाने मान्यता दिलेल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षांपर्यंत म्हणजे कमाल वयोमर्यादा ३८ वष्रे.
२) अपंग उमेदवारांच्या बाबतीत १० वष्रे शिथिलक्षम म्हणजे ४५ वर्षांपर्यंत.
३) पात्र खेळाडूंच्या बाबतीत ५ वर्षांपर्यंत (कमाल ३८ वष्रे).
४) माजी सनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा ५ वर्षांपर्यंत. (३८ वष्रे).
परीक्षेचा अर्ज भरण्याची पद्धत- परीक्षेचा अर्ज भरताना शांत डोक्याने व योग्य सव्‍‌र्हरचा वापर करून अर्ज भरण्याची सुरुवात करावी.
१) प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतात. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत.
२) उमेदवाराला अर्ज http://www.mahaonline.gov.in  या वेबसाईटद्वारे आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीत सादर करणे आवश्यक असते.
३) विहित पद्धतीने आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षाशुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जात नाही.
४) अर्जाचे शुल्क हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे तसेच ऑनलाइन डेबिट कार्डद्वारे देखील जमा करता येते. परीक्षाशुल्क जमा झाल्यानंतर दोन दिवसांनी परीक्षा केंद्राची निवड करणे देखील गरजेचे असते.
५) परीक्षेपूर्वी ७ दिवसांअगोदर उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र त्याच्या प्रोफाइलद्वारे उपलब्ध करून देण्यात येते. ती प्रत डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.१

यूपीएससी परीक्षेचे स्वरूप
संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आय.ए.एस.,आय.पी.एस.,आय.एफ.एस. यांसारख्या किमान १६ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रीय तरुण मागे पडतात. याबाबत बऱ्याच वेळा चर्चा होताना दिसते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे, की गेल्या काही वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. २०११ मध्ये संघ लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षाप्रणालीत मोठा बदल केला. २०११ पूर्वी परीक्षार्थीला सामान्य अध्ययन पेपरबरोबर एक ऐच्छिक विषयाचा पेपर द्यावा लागत असे. २०११ मध्ये हा पूर्वपरीक्षांचे ऐच्छिक पेपर काढून टाकण्यात आला व त्यासाठी सी सॅटचा पेपर ठेवण्यात आला म्हणजे आता पूर्वपरीक्षेत पेपर १ (२०० गुण) आणि पेपर २ (२०० गुण) हे दोन वेगवेगळे पेपर असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा व संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम तंतोतंत सारखा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन परीक्षांसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागत नाही. एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षांची तयारी बरोबरच सुरू केली तर या परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे होते.
१) अभ्यासाची सुरुवात :  पदवी परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच   या परीक्षेची तयारी सुरू केल्यास फायदेशीर ठरते. मात्र काही कारणांमुळे या काळात अभ्यास करणे शक्य झाले नसल्यास  निराश होण्याचे कारण नाही. पदवीनंतर किमान एक वर्ष काही न करता फक्त या परीक्षेची तयारी करावी.
२) तयारी करताना सर्वप्रथम इ. ५ वी ते १० वी पर्यंत एन.सी.आर.टी.ची पुस्तके व्यवस्थित दोन ते तीन वेळेला वाचून टाकावीत. हा तयारीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
३) अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत – बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल – माजिद हुसन,  जिऑग्री थ्रु मॅप – के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान – विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशात्रासाठी सर्वप्रथम अर्थशात्राच्या संकल्पना समजून दत्ता आणि सुंदरम किंवा रमेशसिंग यांची पुस्तके वाचावीत. मूलभूत पुस्तकांचेच वाचन तीन ते चार वेळा केल्यास जास्त फायदा होतो.
४) यूपीएससी  व एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षेसाठी सी सॅट पेपर २ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे किंबहुना आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार किंवा नाही, हे ठरविणारा हा पेपर आहे. या पेपरच्या बाबतीत मोठा विरोधाभास दिसून येतो. तो म्हणजे जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील, इंजिनीअरिंग शाखेतील आहेत, त्यांना या पेपरची तयारी करणे सोपे जाते. या पेपरमध्ये हे विद्यार्थी सहजतेने पास होताना दिसतात. मात्र जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहे, त्यांना या पेपरची तयारी करणे अवघड जाते. या पेपरच्या संदर्भात त्यांच्या मनात मोठा न्यूनगंड दिसतो म्हणून अशा विद्यार्थ्यांनी वर्षांच्या सुरुवातीपासूनच दिवसांतील काही वेळ या पेपरच्या तयारीस दिल्यास हा पेपर त्यांच्यासाठी देखील सोपा होऊ शकतो. ज्यांच्या मनात गणिताबद्दल भीती बसलेली आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे, की सी-सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर नव्हे. मात्र गणित, बुद्धिमत्ता यांचे योग्य नियोजन व तयारी केल्यास ती तयारी या पेपरसाठी उपयोगी ठरते.
६) २०१३ च्या मुख्य परीक्षेत जे विद्यार्थी नियमित वृत्तपत्रांचे वाचन करत होते; तसेच ज्यांना आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या घटनांबद्दल योग्य ज्ञान होते, त्यांनाच मुख्य परीक्षेचे पेपर सोपे गेले.(२०१३ मध्ये मुख्य परीक्षेसाठी संघ लोकसेवा आयोगाने बदल केला होता तो आपण पुढील भागात पाहणार आहोत.), या परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर मध्ये (मुख्य) अडीचशे गुणांसाठी २५ प्रश्न विचारलेले होते. प्रत्येक प्रश्न १० गुणांसाठी होता व १० गुणांसाठी २०० शब्दांची शब्दमर्यादा दिलेली होती म्हणजेच थोडक्यात तीन तासांत ५ हजार शब्द लिहावयाचे होते. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव मोठय़ा प्रमाणात करावा. हस्ताक्षर मात्र वाचनीय असावे.
७) परीक्षा मराठी माध्यमातून की इंग्रजी माध्यमातून द्यावी: मुख्य परीक्षा व मुलाखत आपण मराठी माध्यमात देऊ शकतो. फक्त एक इंग्रजीचा अनिवार्य ३०० गुणांचा पेपर इंग्रजीत लिहायचा असतो. या पेपरचे गुण अंतिम गुणांमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र हा पेपर पास होणे आवश्यक असते. मुख्य परीक्षा ही मराठी माध्यामातून द्यावी की इंग्रजी माध्यमातून द्यावी हा एक नेहमीचा प्रश्न आहे. जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील आहेत व ज्यांना इंग्रजी बोलताना थोडी अडचण येते, ते मात्र शेवटपर्यंत गोंधळात असतात की पेपर मराठी माध्यमातून लिहावा की इंग्रजी माध्यमातून. जर मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असेल, तर अभ्यास साहित्य मराठीतून वाचावे की इंग्रजीतून वाचावे येथून प्रश्नांना सुरुवात होते. खरंतर माध्यमाचा प्रश्न पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर येणार असतो.   जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहेत व ज्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असाल, तर मुख्य परीक्षेतील विज्ञान संदर्भात घटकांची तयारी करताना तो घटक मराठीत सांगणे अवघड जाते.  आता मराठी भाषेतून चांगली पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. थोडक्यात पेपर मराठीतून किंवा इंग्रजीतून लिहावा याबाबत जास्त खल न करता सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून त्यातील प्रत्येक उपघटकांवर आपली व्यवस्थित पकड निर्माण करावी. एकदा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे ठरविणे जास्त सोपे होते की माध्यम कोणते निवडावे.

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
solapur, 1139 crores turnover, onion business in Solapur, during adverse times, onion profit solapur, solapur Agricultural Produce Market Committee, onion in solapur, farmer, marathi news,
प्रतिकूल काळातही सोलापुरात वर्षात कांदा व्यवहारातून ११३९ कोटींची उलाढाल
10 th Exam
दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?