इंग्रजी विषयाशी संबंधित पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम आणि करिअर संधींची सविस्तर ओळख-

आजच्या स्पर्धात्मक काळात इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे उत्तम करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरते. इंग्रजीच्या सखोल अभ्यासाने देशात-परदेशात करिअरच्या विविध संधी खुल्या
होऊ शकतात. बारावीनंतर इंग्रजी भाषा अथवा इंग्रजी साहित्य या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करून पुढे त्यात पदवी, पदव्युत्तर तसेच एम.फिल/ पीएचडी असे अभ्यासक्रम करता येतात. हे अभ्यासक्रम करण्याचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत-
=    इंग्रजीवर प्रभुत्व मिळवल्यास इंग्रजी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. स्वत:ची वेगळी लेखनशैली विकसित करता येते.
=    इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तींना मराठीतून इंग्रजीत अथवा इतर भाषांमधून इंग्रजीत अनुवाद करण्याची कामे मोठय़ा प्रमाणावर मिळू शकतात. त्याचा उत्तम मोबदलाही मिळतो.
=    अनेक राजकीय नेत्यांना/ कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठांना वेळोवेळी विविध विषयांवर इंग्रजीतून भाषणे लिहून हवी असतात. इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तींना ‘स्पीच रायटर’ म्हणून काम करता येऊ शकते.
=    राजकीय नेते, उद्योगपती, इतर क्षेत्रातील मान्यवर यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तींची गरज भासते.
=    इंग्रजी संवादकौशल्य आणि लेखनकौशल्य प्राप्त केल्यास दुभाष्या म्हणून संधी मिळू शकते.
=    वेगवेगळ्या बँका, गुंतवणूक कंपन्या, रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण कंपन्या आदींमध्ये इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर यासारख्या पदांवर नियुक्ती मिळू शकते.
=    इंग्रजीवर प्रभुत्व आणि सोबतीला कायद्याची पदवी असल्यास उत्तम वकील म्हणून वरिष्ठ न्यायालयांमध्ये करिअर घडवता येईल.
=    यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये इंग्रजी निबंध हा स्वतंत्र विषय असतो. त्या घटकात उत्तम गुण मिळवणे शक्य होते.
=    नागरी सेवा परीक्षेचे दर्जेदार अभ्याससाहित्य मुख्यत्वे इंग्रजीतून असल्याने विविध संदर्भाचे आकलन आणि त्याचा प्रभावी वापर शक्य होतो.
=    नागरी सेवा परीक्षांमध्ये सर्व भाषांना समान्य न्याय असला तरी इंग्रजीवर प्रभुत्व असल्यास त्या उमेदवाराला त्याचा अधिक लाभ होऊ शकतो.
=    राज्य सरकारी सेवेत इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या कर्मचाऱ्यांना/ अधिकाऱ्यांना विविध स्वरूपाची कामे करणे आणि प्रगती साधणे शक्य होते.
=    दर्जेदार इंग्रजी अध्यापकांची- प्राध्यापकांची वानवा असल्याने शाळा-महाविद्यालयांमध्ये अध्यापन, शिकवणी वर्ग, व्यक्तिगत शिकवणी या ठिकाणी उत्तम संधी मिळू शकतात.
=    जाहिरात कंपन्यांमध्ये कॉपी रायटिंग अथवा भाषांतरविषयक काम मिळू शकते.
=    इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशन संस्थेत संपादकीय विभागातील विविध जबाबदाऱ्या स्वीकारता येतील.
=    लिखाणाची आवड असल्यास लेखक म्हणूनही करिअर घडवता येते. इंग्रजी लेखकांना उत्तम मानधन मिळते. जागतिक स्तरावरचे विविध मानसन्मान मिळू शकतात.
=    इंग्रजी जाणकारांची संख्या तुलनेने अल्प असल्याने विविध प्रकारच्या लेखनविषयक सेवा देता येतील. उदा. प्रबंध लिहून देणे, प्रबंध तपासून देणे, ड्राफ्ट तयार करणे इत्यादी.
=    आपल्या देशातील नागरी सेवा परीक्षांशिवाय इतर परीक्षांमध्ये इंग्रजी विषयाचा पेपर असतो. मुलाखती बहुधा इंग्रजीतून घेतल्या जातात. इंग्रजी उत्तम येणाऱ्या विद्यार्थ्यांना या चाचण्या इतरांपेक्षा तुलनेने सोप्या जातात.
वरील यादी नमुन्यादाखल दिली आहे. यात आणखीही अनेक बाबींचा समावेश करता येईल. यावरून इंग्रजी भाषेचा अभ्यास करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरतो, ही बाब लक्षात आली असेलच. इंग्रजीचा अभ्यासक्रम देशातील बहुतेक सर्व  विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे. पदवी स्तरावर बीए आणि बीए ऑनर्स या पदव्या प्रदान केल्या जातात. बारावीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो.
द इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सटिी
या संस्थेची स्थापना सेंट्रल युनिव्हर्सटिी म्हणून करण्यात आली आहे. या संस्थेचे  हैदराबाद, लखनौ आणि शिलाँग येथे कॅम्पस आहेत. त्यात इंग्रजीविषयक पुढील अभ्यासक्रम
शिकता येतात-
हैदराबाद कॅम्पस  
=    पदवी अभ्यासक्रम-
   *   बीए (ऑनर्स) इन इंग्लिश. प्रवेश जागा- ४०.
अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी परीक्षेत ५० टक्के गुण.
   *    बीएड इन इंग्लिश. प्रवेश जागा- ५०. अर्हता- ५० टक्के गुणांसह बीए (ऑनर्स) इंग्लिश.
=    पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम-
   *   एमए इन इंग्लिश. प्रवेश जागा- ९०. अर्हता- ५५ टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी.
    *    एम.ए. इन जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन. प्रवेश जागा- २०. अर्हता- ५५ टक्के गुणांसह कोणत्याही
विषयातील पदवी.
    *    एम.एड प्रवेश जागा- २५. अर्हता- ५५ टक्के गुणांसह बीएड- इंग्लिश.
    *    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंग्लिश टीचिंग. प्रवेश जागा- ४०. अर्हता- ५५ टक्के गुणांसह एमए इन इंग्लिश.
=    संशोधनात्मक अभ्यासक्रम- पीएच.डी इन इंग्लिश इंग्लिश लँग्वेज एज्युकेशन, पीएच.डी इन इंग्लिश लिटरेचर, पीएच.डी इन िलग्विस्टिक्स अ‍ॅण्ड फोनेटिक्स. कालावधी- प्रत्येकी ३ वष्रे. अर्हता- ५५ टक्के गुणांसह एमए इन इंग्लिश.
शिलाँग कॅम्पस
=    बीए (ऑनर्स) इन इंग्लिश. प्रवेश जागा- ४०
=    बीए-जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन.
    प्रवेश जागा- ३०
=    एमए इन इंग्लिश. प्रवेश जागा- २०
=    एमए-इंग्लिश लिटरेचर. प्रवेश जागा- २०
=    एम.ए इन जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन. जागा- २०
=    एमएड.- प्रवेश जागा- २५
=    पीएच.डी इन िलग्विस्टिक्स
लखनौ कॅम्पस-
=    बीए (ऑनर्स) इन इंग्लिश. प्रवेश जागा- ४०
=    एमए इन इंग्लिश. प्रवेश जागा- ३०
=    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंग्लिश टीचिंग- जागा- २०.
    या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा साधारणत: दर वर्षी मार्च महिन्यात घेण्यात येते. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्र- मुंबई. पत्ता- द इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सटिी. हैदराबाद- ५००००७.
वेबसाइट- http://www.efluniversity.ac.in
ईमेल- admissions@efluniversity.ac.in

नया है यह!
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चिरग मॅनेजमेंट- हा अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअिरग या संस्थेने सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष.
अर्हता- ६० टक्के गुणांसह बीई/ बीटेक आणि ॅअळए परीक्षा उत्तीर्ण. पत्ता- एनआयटीआयई, मुंबई- ४०००८७.
वेबसाइट- http://www.nitie.edu