* सेवांच्या प्राधान्यक्रमाची माहिती : आपण सेवांचा जो पसंतीक्रम नोंदवला असेल त्या सेवांची माहिती, पसंतीक्रमावर असलेल्या किमान पहिल्या पाच सेवांची माहिती, त्या खात्याची रचना या सगळ्याची माहिती  करून घ्या.
*    केस स्टडी संदर्भात प्रश्न : अनेकदा मुलाखतीदरम्यान,  परिस्थितीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. िहदू, मुस्लिम दंगल उसळली तर? एखाद्या प्रदेशात प्रचंड गारपीट झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर काय कराल? शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय प्रयत्न कराल, अशा अनेक बाबतीत प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा संभाव्य प्रश्नांची यादी तयार करून सकारात्मक उत्तरे तयार करावीत.
*    छंदांविषयी प्रश्न : तुमचा छंद, तुमची आवड यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्ही वाचन हा छंद नमूद केला असेल तर अलीकडेच वाचलेली पुस्तके, त्यांचे लेखक, साहित्याचा प्रकार, साहित्य संमेलने, पुरस्कार प्राप्त पुस्तके इ.  माहिती तयार करावी.
*    महिला उमेदवारांसाठी.. : महिलांच्या  समस्या, महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला अधिकारी म्हणून कुठल्या योजना राबवाल? घरापासून दूर बदली झाली तर? असे काही  प्रश्न विचारण्याची शक्यता असते. या प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर द्यावे.
*    चालू घडामोडींविषयी प्रश्न :  राजकीय, सामाजिक  चालू घडामोडींची माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या दिवशी वृत्तपत्रांतील ठळक मथळे वाचा.
*    मुलाखतीची तयारी कशी कराल?
    मिळालेल्या वेळात आपण सर्वोच्च कामगिरी करणार आहोत, असा सकारात्मक विचार करूनच मुलाखतीला सामोरे जा.
*    मुलाखतीच्या आधी..
= तीन-चार मित्रांचा ग्रुप तयार करून, त्यांना पॅनल समजून त्यांच्यापुढे प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी करा. सध्या मोबाइलमध्येच व्हिडीओ चित्रण करण्याची सुविधा आहे. त्याचा वापर करून बोलण्याची योग्य तयारी करा.
= जर आपण अभिरूप मुलाखती (Mock Interview) देणार असाल तर मार्गदर्शकांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करा. स्वत:ची उत्तरे स्वत: तयार करा.
*    मुलाखतीला जाताना खालील बाबींचे पालन करा :
=    वेळेच्या अगोदर पोहोचा.
=    प्रश्नाचे उत्तर देताना चेहऱ्यावर स्मित असणे आवश्यक आहे.
=    मुलाखत सुरू असताना स्वत:च्या हालचालींकडे लक्ष असू द्या. उदा. पाय हलवणे, प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहता शून्यात बघणे, खूप आरामशीर बसणे या गोष्टी टाळा.
=    जाणूनबुजून विनोदी बोलणे अथवा तसे कृत्य टाळा.
=    प्रश्न काय विचारला आहे ते नीट समजून घ्या.  
=    मुलाखती दरम्यान स्वत:शी ठाम असणे फार महत्त्वाचे आहे. कधीतरी मुलाखत मोकळ्या वातावरणात होते तर कधी काहीही कारण नसताना एकदम तणाव उत्पन्न होतो. प्रश्नांचे सूर बदलतात, पण तुम्ही मात्र कायम स्वत:बरोबर राहा. यातून तुम्हाला स्वत:चा ठामपणा सिद्ध करता येतो.
*    महत्त्वाचे मुद्दे : संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवावे की, या परीक्षेसाठीची तयारी हा एक आनंददायक अनुभव आहे. या स्पध्रेत प्रत्येकालाच यश मिळेल असे नाही. त्याचे कारण अगदी गणिती भाषेत सांगायचे झाल्यास असे सांगता येईल, की दरवर्षी सुमारे १३ ते १४ लाख विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज करतात. ही स्पर्धापरीक्षा आहे. या स्पध्रेत आपण कितीही उत्तम धावलो व आपल्या बरोबरचे काही स्पर्धक आपल्याहून थोडे जास्त वेगाने धावले तर अत्यंत किरकोळ कारणांवरून आपण अपयशी ठरण्याची शक्यता आहे, हे सत्य विद्यार्थ्यांनी समजून घ्यावे. मात्र, संघ लोकसेवा आयोगाची तयारी करताना जी मानसिक सक्षमता आपल्यात येते ती आपल्या आयुष्याच्या पुढील प्रवासासाठी मार्गदर्शक ठरते. त्यामुळे या परीक्षेतील एखाद्दोन अपयशाने निराश न होता शेवटपर्यंत किल्ला लढवत राहणे हाच यशाचा मार्ग आहे. संघ लोकसेवा आयोगाची तयारी करताना देशातील इतर सर्व स्पर्धापरीक्षांची तयारी आपोआप होत असते. असे अनेक सकारात्मक पैलू लक्षात घेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धपणे या परीक्षेसाठी तयारीला सुरुवात करायला हवी. परीक्षेसाठी आणि परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा! प्रशासनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटावा, हीच अपेक्षा!
    (समाप्त)
डॉ. जी. आर. पाटील – grpatil2020@gmail.com