नंदाच्या नवऱयाने दगडूला आणि सुमनच्या नवऱयाला समोरासमोर घेतलं. आपणच आता न्यायनिवाडा करणार आहे, अशा अविर्भावात त्याने सुमनच्या नवऱयाला विचारलं. म्हणाला,
‘‘पाव्हणं, अशी परगावची लोकं आमच्या गावात न्याय मागण्यासाठी येणं हे मला कळताच पहिल्यांदाच घडतंय. परगावच्या लोकांनी आमचा गाव गोळा करणं हा आमच्या गावचा अपमान आहे. पण तोही आम्ही सहन करतो. कारण अण्णासाहेबांच्या गावात कोणावरही अन्याय झालेला आम्हालाच खपणार नाय. तेव्हा तुमचं म्हणनं काय आहे ते सांगा गावासमोर.’’
नंदाच्या नवऱयाने सुरुवातीपासूनच सुमनची बाजू दाबण्याचा प्रयत्न केला. देवळाच्या पायरीवर चेअरमनच्या शेजारी बसलेल्या पुढाऱयाने त्याला अजूनच जोड दिली. म्हणाला,
‘‘आणि जो काय खटका असंल तो आजच उडवून टाका पाव्हण. पुन्हा पुन्हा असं जमायला वेळ नाय आम्हाला.’’
दगडूने पुढाऱयाकडे पाहिलं. त्याने आजच्या आजच सगळं जिकडच्या तिकडं करण्याचा विचार केलेला दिसत होता. आपल्या पोरीला इथं न्याय मिळणं अवघड आहे, हे त्याने ओळखलं, पण तरीही दुपारी नंदा येऊन गेलेली असल्याने त्याला थोडी आशा होती.
सुमनचा नवरा सांगायला लागला. म्हणाला,
 ‘‘आता तुमच्याच गावातल्या पोरीने आमच्या घरातले प्रश्न चव्हाटय़ावर आणण्याची वेळ आणली आहे, पण तेवढय़ानेच आमचा वाद मिटणार असेल, तर तेही सांगून टाकतो मी.’’
सुमनने नवऱयाकडे रागाने पाहिलं. राग येण्यासारखंच बोलणं होतं त्याचं. दगडूलाही मग राहावलं नाही. तोही बोलला मध्ये. म्हणाला,
‘‘टाळी एका हाताने वाजत नाही. आणि तुमच्या घराचं गाऱहाणं चव्हाटय़ावर आणायला आम्ही नव्हतो आलो तुमच्याकडं. तुम्हीच आलात आमच्या गावात तुमच्या करण्या लपवायला.’’
दगडूच्या अशा बोलण्याने फणसीचा गडी एकदम लाल झाला. तावातावाने लागला बोलायला. म्हणाला,
‘‘अहो, तुम्ही मुलीचे बाप आहात आणि तुमची मुलीची बाजू आहे एवढे तरी लक्षात घेऊन बोला.’’
तशी कसलीही भीडभाड न बाळगता सुमन जागेवरची उठली. मुलीची बाजू लक्षात घ्यायला लावणाऱयाकडे हात करून बोलायला लागली. म्हणाली,
‘‘केवळ मुलीची बाजू म्हणून आम्ही बुक्क्यांचा मार गप सहन करायचा! आणि तुमची मुलाची बाजू म्हणून आम्हाला वाट्टेल तसं पिरगाळायचं. मुलीची बाजू मुलीची बाजू म्हणून तुम्ही तुमच्या बायकोला दहा वर्षे मुरगाळली. तिनं बिचारीनं सहन केलं. तिच्या सहनशक्तीचं बक्षीस म्हणून तुम्ही तिला काय दिलं? दहा वर्षे ठेवलेली बाई, तिला चाळीशीत सवत म्हणून दिली.’’
सुमनच्या या शेवटच्या वाक्याने सगळेच गप झाले. त्या शांततेत लाल झालेली सुमन सर्वाना ऐकू जाईल अशा आवाजात फणसीच्या त्या गडय़ाच्या नजरेला नजर देत म्हणाली,
‘‘तुम्ही केलं तसंच तुमच्या बायकोने एखाद्या पुरुषाशी केलं असतं, तर तुम्ही तिला जिवंत जाळली असती. का? का तर ती एक स्त्री आहे म्हणून.’’
फणसीच्या त्या गडय़ाची मान खाली गेली. त्याची केविलवाणी अवस्था बघून सुमनच्या नवऱयाने पुढाऱयाकडे पाहिलं. नुसत्या नजरेनेच पुढाऱयाने नंदाच्या नवऱयाला उठायला सांगितलं आणि नंदाचा नवरा जागेवरून उठला. म्हणाला,
‘‘तुला आपल्या गावात आलेल्या पाव्हण्यांचा अपमान करायचा आहे का? गावाच्या अब्रूचा प्रश्न आहे. गाव ते सहन करणार नाही.’’
सुमन नंदाच्या नवऱयाच्या दम भरण्याला घाबरली नाही. तिनंही निर्भिडपणे उत्तर दिलं. म्हणाली,
‘‘गाव म्हणजे कोण? तू? तुला मी ओळखत नाही. गावाचं  भलंबुरं बघण्याचा अधिकार गावाने सरपंचाला दिला आहे. त्यांनी पुढं यावं. मग पाव्हण्यांचा अपमान झालाय, का पाव्हण्यांनीच आपल्या गावात येऊन आपल्याच गावातल्या मुलीचा अपमान केलाय याचा फैसला होईल.’’
सुमनने क्षणातच नंदाच्या नवऱयाला त्याची जागा दाखवून दिली. त्याचे डोळे रागाने एकदम लाल झाले. त्याची अवस्था सुमनला खाऊ की गिळू अशी झाली.
इथं त्याच्या स्वाभिमानाला, अधिकाराला तडा गेला होता. सगळ्या गावाची नजर त्याच्याकडे होती. काही जण तर हेच पाहाण्यासाठी तिथं बसले होते.
पुढाऱयाला मात्र ते सहन झालं नाही. शरमेने लोकांच्या नजरा चुकविण्याचा प्रयत्न करणाऱया नंदाच्या नवऱयाकडे पाहात त्याने जागेवरूनच आवाज दिला. म्हणाला,
‘‘हिला सरपंचाकडून न्याय पायजे. बोलवा. सरपंचीण बाईला बोलवा.’’
पुढाऱयाच्या बोलण्याने क्षणभर नंदाचा नवराही गोंधळला. आपण असताना आपल्या बायकोने गावासमोर बोलणं त्याला कमीपणाचं वाटत होतं. अधिकार गाजवण्याची इतक्या वर्षांची सवय मोडणं त्याला अवघड जात होतं. गावासमोर बायकोचं महत्त्व वाढत होतं. त्याची किंमत कमी होत होती.
पण ज्याच्या कृपेने इतकी वर्षे ऐश्वर्य भोगलं, त्या पुढाऱयाचा मान राखनंही गरजेचं होतं. नाईलाज होऊन त्याने नंदा बसली होती त्या कोपऱयाकडे नजर फिरवली.
नंदा पार कावरीबावरी झाली होती. आजपर्यंत तिचा नवरा तिला अशा गोष्टींपासून दूरच ठेवत होता. ते तिला थोडं अपमानाचं वाटत असलं तरी अशा गोष्टींना सामोरं जावं लागत नसल्यामुळे मनातल्या मनात संकटातून सुटल्याचं समाधानही वाटत होतं.
पण इतक्या दिवस टळलेलं संकट आज उभं होतं.
नंदाच्या नवऱयाने तिला खुणेनंच बोलावलं.
आजूबाजूला बघत थरथरत्या पावलांनीच ती उठून पुढे आली.
लगेच पुढाऱयाने पुन्हा आवाज दिला.
‘‘हां. आता बोल. इथं परगावच्या आणि आपल्याही गावच्या अब्रूचा प्रश्न आहे. तुला त्यांना काय विचारायचं असंल तर विचार.’’
एखादा आरोपी उभा असावा तशी नंदा सर्वांसमोर उभी होती. तिची अवस्थाही एखाद्या गुन्हेगारासारखी केविलवाणी वाटत होती. आणि पुढारी तिच्याकडून जे हवं ते वदवून घ्यायला लागला होता.
नंदाला काय बोलावं तेच सुचेना. गोंधळलेल्या अवस्थेत तिनं नवऱयाकडे पाहिलं. आज तिला त्याचं तोंड शिवल्यासारखं वाटलं. आणि हिला तर तोंड उघडायची सवय नव्हती! म्हणून तशीच उभी राहिली. ती काही बोलत नाही असं वाटताच पुढाऱयाने सांगितलं. म्हणाला,
‘‘दगडूच्या बोलण्याने पाव्हण्यांचं बोलणं अर्धवट राह्यलंय. त्यांना त्यांचं म्हणनं मांडून दिलं पायजे.’’
तिनं सुमनच्या नवऱयाकडे पाहिलं.
सुमनच्या नवऱयाने मग पुन्हा पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली.
‘‘आता सगळ सांगायची वेळ आली म्हणून सांगतो, आमचं घर आहे खटल्याचं. पडत्या काळात त्याला थोरल्या भावानी सावरलंय. तेव्हा त्याच्या शब्दापुढं जाणं मला जमत नाही. आणि ही वेगळं राहाण्याकरता हाटून बसली. मी म्हणतोय आईवडील आहेत तोपर्यंत राहू एकत्र, नंतर बघू. पण हिनी ऐकलं नाही आणि घर सोडून आली.’’
सुमनला हा आरोप सहन झाला नाही. ती खरी परिस्थिती सांगायला लागली. म्हणाली,
‘‘मी माहेरी निघून येण्याचं खरं कारण हे लपवतात. खरी परिस्थिती म्हणजे मी पंचायतीच्या निवडणुकीला उभं राहायचं ठरवलंय, म्हणून यांनी मला छळायला सुरुवात केली आहे. यांना मला निवडणुकीला उभं राहून द्यायचं नाही. कारण…’’
‘‘कारण तू घरातल्या लोकांशीच गद्दारी केली आहेस.’’
सुमनचा नवरा तावातावाने म्हणाला.
आता नको तो विषय गावासमोर नको म्हणून पुढारी मध्येच बोलला. म्हणाला,
‘‘आपल्या विरोधात आपल्याच घरातली व्यक्ती जाती हे कोण सहन करीन? आणि पाव्हण्यांच्या घराचं चार गावात नाव आहे. त्यांच्या घरातली फूट त्यांच्या नावाला काळीमा फासणारी आहे.’’
‘‘घराण्याच्या नावाखाली कोणाचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं?’’
सुमनने उलट प्रश्न केला. तसे तुच्छतेनं पुढाऱयाच्या तोंडून शब्द गेले,
‘‘कसलं स्वातंत्र्य?’’
आता मात्र चारचौघीत बसलेल्या विद्याला पुढाऱयाचं हे जुलमी वागणं सहन झालं नाही. ती जागेवरची उठून सुमनजवळ आली. विद्याला बघताच नंदाच्या जीवात जीव आला. सुमनच्या शेजारीच ती येऊन उभी राहिल्याने सुमनलाही हायसं वाटलं. जमलेल्या सर्व लोकांच्या नजरा पुढाऱयाकडून विद्याकडे वळल्या. विद्याला बघताच पुढाऱयाची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. तिच्या जागी दुसरी कोणी असती, तर आपल्या आवाजाने त्याने तिलाही इथंच दाबली असती. पण ती पडली अण्णासाहेबांची भाची. त्यामुळे तोही थोडा नरमला.

(क्रमश:)

– बबन मिंडे