सुमनचा नवरा फणसीच्या आणि ढोरवाडीच्या गडय़ांकडे साशंक नजरेने पाहायला लागला. ते गडीसुद्धा चांगलेच चपापलेले दिसत होते.
नंदाचा नवरा तर पार गार पडून आता एका बाजूला जाऊन बसला होता.
विद्याने सर्वाच्या मध्ये बाहुलीसारखी उभ्या असलेल्या नंदाकडे पाहिलं. तिची अवस्था पाहून ती काही बोलेल असं वाटत नव्हतं. आणि ती नाही बोलली तर पुढाऱयाचं अजूनच फावणार होतं. म्हणून तीच लागली बोलायला. म्हणाली,
‘‘पुढारी, अशा न्यायनिवाडाच्या प्रसंगी बोलण्याचा अधिकार गावाने सरपंचाला दिला आहे. तुम्ही नाही बोलला तर बरं होईल.’’
‘‘म्हणजे मला गावात काहीच किंमत नाही का?’’
‘‘माझ्या बोलण्याचा उद्देश तसा नाही. पण कोणत्या व्यक्तीला कोणते अधिकार द्यायचे ते गावाने ठरवलं आहे. गावातल्या लोकांच्या त्या मतांना काहीच अर्थ नाही का? गावची सरपंच नंदा आहे. तिला बोलू द्या.’’
विद्याने नंदा बोलणार म्हटल्यावर पुढारी बळंच हसला. हसत हसतच बोलला. म्हणाला,
‘‘तिला बोलता आलं असतं, तर आम्हाला कशाला बोलावं लागलं असतं,’’
पुढाऱयाच्या या छद्मी बोलण्यावर परगावची माणसंसुद्धा हसली.
विद्याला मस्तक हलल्यासारखं झालं. त्वेषाने ती म्हणाली,
‘‘पुढारी, नंदाला बोलता येत नाही असं नाही, पण तुम्ही तिचं तोंड दाबून धरलंय.’’
विद्याने पुढाऱयावर सरळसरळ आरोपच केला. पुढाऱयालाही तो सहन होणारा नव्हता. पण प्रकरण भलत्याच दिशेने जाईल आणि येणाऱया निवडणुकीच्या दृष्टीने त्याला कसल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता. म्हणून तो सौम्य भाषेत, पण विद्याचं तोंड बंद होईल असं बोलला. म्हणाला,
‘‘विद्या, तुझ्या या आरोपाचं आम्ही चोख उत्तर दिलं असतं. पण… पण तो आम्ही कायम लक्षात ठेवू. आणि दोन दिवसांनी अण्णासाहेब गावात परत आले, की त्यांच्या कानावरही घालू.’’
पुढारी शांतपणे बोलत होता. पण त्याच्या चेहऱयावरचा राग विद्याला दिसत होता. अजून त्याला डिवचायला नको म्हणून ती सुद्धा गप बसली.
आता चर्चा याच्यापुढे जात नाही, असं वाटून गावातल्या युवक मंडळाचा नेता रोहिदास उठून बोलायला लागला. म्हणाला,
‘‘पुढारी, खरं तर तुम्ही आपल्या गावातल्या मुलीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, पण तुम्ही परगावच्या लोकांना साथ देताय. पाव्हण्यांना बाजू मांडायला सांगताय, पण सुमनला बोलायची संधी देताय का?’’
‘‘आता हिच्यापाठोपाठ तुला जोर आला का?’’
पुढाऱयाला आता चांगलंच कात्रीत सापडल्यासारखं झालं. हा युवक मंडळाचा नेता अलीकडे खूपच मान वर करायला लागला आहे. एक दिवस डोक्यावर बसून मिऱया वाटील तो. असं चेअरमन एकदा पुढाऱयाला म्हणालाही होता. रोहिदासच्या आजच्या वागण्याने पुढाऱयाला चेअरमनचं ते वाक्य आठवलं. आणि आतापर्यंत एका बाजूला तमाशा बघत बसलेल्या चेअरमनकडे त्याचं लक्ष गेलं. त्याने चेअरमनकडे काहीतरी बोलण्याच्या अपेक्षेने पाहिलं. चेअरमननेही त्याचं मन जाणलं. आणि बसल्याबसल्याच बोलायला लागला. म्हणाला,
‘‘हे बघ रोहिदास, हा दगडूच्या घरातला प्रश्न आहे. सगळ्यांनी कालवाकालव करून तो अजूनच चिघळून ठेवायला नको.’’
‘‘म्हणजे तुम्ही बोलताय तेवढं बरोबर आणि आमची मात्र कालवाकालव.’’
‘‘तुला काय म्हणायचं आहे?’’ मध्येच पुढाऱयाने प्रश्न केला.
‘‘सुमनला काय सांगायचं आहे ते तिला सांगून द्या, एवढंच म्हणायचं आहे मला.’’
मग विद्यानेही रोहिदासच्या बोलण्याला पाठिंबा दिला. म्हणाली,
‘‘बरोबर आहे. सुमन जर स्वत: होऊन निघून आली असेल तर ती त्याचं कारण सांगेन. न्यायनिवाडा होईल न होईल, पण पाव्हणी मंडळी आपल्या गावात येऊन सुमनच्या निघून येण्याचं कारण मागत आहेत, त्यांना त्याचं कारण तरी मिळेल.’’
विद्याच्या बोलण्याने नंदाला थोडा धीर आल्यासारखं झालं. तिला वाटलं आपल्याला हेच बोलायचं होतं. न्यायनिवाडा करणं आपल्या आवाक्यापलीकडचं आहे, पण कमीतकमी सुमनला आपलं म्हणनं लोकांपर्यंत पोचविण्यासाठी तरी आपण आपला अधिकार वापरू. आपल्या सरपंच होण्याने तेवढं जमलं तरी खूप झालं.
तिनं सुमनकडे पाहिलं, बोलण्याची हिम्मत नव्हती. पण तिचा चेहरा सुमनला सांगत होता. सुमन आता बोल. आता तुला सांग काय सांगायचं आहे ते. ऐकू दे सगळ्या गावाला. कळू दे या राजघराण्यांच्या काळ्या करण्या. त्यातून एखाद्या जरी घराणेशाहीला तडा गेला, तरी सार्थक होईल तुझं बोलणं.
सुमन चवताळलेलीच होती. तिनं तिच्या नवऱयाकडे पाहिलं, तेव्हा त्याचंही लक्ष तिच्याकडेच होतं.
त्याला वाटलं सुमन या गावासमोर आपल्या घराण्याची चिरफाड करती. आपला डाव आपल्याच अंगाशी आल्यासारखं झालं. तसं झालं तर विरोधकांचं फावल्याशिवाय राहाणार नाही. म्हणून त्याने नंदाच्या नवऱयाच्या कानात काहीतरी सांगितलं.
शांत बसलेला नंदाचा नवरा पुन्हा जागेवरून उठला. विद्या आणि रोहिदास या प्रकरणाला वेगळी दिशा देतील, सुमनची चाल त्यांना फायदेशीर ठरेल. म्हणून त्याने सगळं इथंच थांबविण्याचा निर्णय घेतला. म्हणाला,
‘‘हे बघा, दगडूच्या घराचं हे प्रकरण असंच चिघळत असेल, तर बोलण्यात काहीच अर्थ नाही. परगावच्या पाव्हण्यांची जबाबदारी मी घेतली होती. त्यांचा अपमान हा माझा अपमान आहे. तेव्हा मला इथं अजून थांबून अपमान करून घ्यायचा नाही.’’
नंदाचा नवरा बैठक सोडून चालायला लागला. पाठोपाठ सुमनचा नवरा, फणसीचे, ढोरवाडीचे गडीही गेले. आता बैठक मोडल्याने पुढाऱयाच्याही जिवात जीव आला.
बैठकीत विद्या आणि रोहिदास येऊन काही बोलतील असं त्यांना वाटलं नव्हतं. नाहीतर त्यांनी बैठकच घेतली नसती. पण शेवटी सुमनची चलती असताना पळपुटा करून डाव पुढाऱयानेच साधला.
सुमनने निराशेने विद्याकडे पाहिलं. आपण काहीच करू शकलो नाही. याची रुखरुख मात्र विद्याला लागून राहिली.

(क्रमश:)

– बबन मिंडे