06 August 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : माणसं, सांभाळलेली आणि दुखावलेली

घरात पाळलेल्या कुत्र्यालाही भाकरीचा तुकडा टाकावा लागतो. भाकरीच्या त्या तुकडय़ापायी ते कधी आपला इमान सोडत नाही. अशीच लालूच दाखवून इमानदार नसली, तरी रखवाली करणारी माणसं

| August 11, 2014 01:15 am

तिथं बसलेली मंडळी अण्णासाहेबांना चांगलंच ओळखून होती. ते आपल्या पद्धतीने दगडूला समजावून सांगणार याचीही त्यांना कल्पना होती. तरीसुद्धा विद्यामुळे अण्णासाहेबांची भूमिका बदलते की काय? याचीच या मंडळीला उत्सुकता होती. पण इतकी वर्षे सत्ता गाजविणाऱया अण्णासाहेबांनी अशा कौटुंबिक प्रकरणातही राजकारण नाही केलं तरच नवल!

दुसऱया दिवशी सकाळीच दगडूने सुमनला तिच्या मनाविरुद्ध जांभुळवाडीला पोहोचवली.
न्यायनिवाडा करण्यासाठी जामगावात चार गावची माणसं जमण्याइतकं तापलेलं हे प्रकरण. पण सुमनला परत पाठवण्याची खबर दगडूने कोणालाही कळून दिली नाही. सगळा गाव आणि ज्यांच्याकडे अपेक्षेने पाहावं ते अण्णासाहेबही आपल्या विरोधात आहे म्हटल्यावर त्यानेही सुमनच्या मनाचा विचार न करता कमीपणा घेऊन स्वत: तडजोड केली आणि सुमनलाही करायला लावली.
पण उशिरा का होईना, गावात या गोष्टीची चर्चा सुरू झाली.
विद्यालाही कळलं. तिनं लगेच सुमनला मोबाइलवर फोन लावला. मात्र, जसं  सुमनचं तोंड बंद केलं गेलं तसाच तिचा मोबाइलही बंद केलेला दिसत होता. बराच वेळ प्रयत्न करूनही सुमनचा स्विच ऑफ मोबाइल सुरू होत नव्हता.
आपल्याकडे अपेक्षेने पाहाणाऱया सुमनसाठी आपण काहीच करू शकलो नाही याची विद्याला खंत वाटली. सुमनच्या मनाविरुद्ध दगडू अण्णासाहेबांना भेटला. त्यातून निष्पन्न काहीच झालं नाही. उलट तिलाच जांभुळवाडीला जावं लागलं. आणि याला कारणीभूत असलेल्या अण्णासाहेबांवरचा तिचा राग अधिकच वाढत गेला.

हजारोंची  मर्जी  सांभाळण्यासाठी कधी एखाद्याचा राग सहन करावा लागतो. पण खरी चतुराई असते ती दुखावलेल्या व्यक्तीलाही शांत बसायला लावण्यात. अण्णासाहेबांना हे तंत्र चांगलं अवगत आहे. खरं तर राजकारणात आपले हितसंबंध ज्यांच्याशी गुंतले आहेत, त्यांना दुखवणं घातकच, पण कधी कधी तसं वागावं लागतं. अशा वेळी दुखवली जाणारी व्यक्ती कोण आहे याचा ते फार बारकाईने विचार करतात. सुमनच्या जागी त्यांच्यासाठी राबणारा एखादा कार्यकर्ता असता, तर त्यांनी सुमनचा हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने मिटवला असता.
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक माणूस जरी अण्णासाहेबांना जपता आलेला नसला, तरी माणसांचे काही गट त्यांनी निश्चितच जपलेत. खरं तर जपलेत म्हणण्यापेक्षा त्यांनी ते गट पोसलेत. कारण पोसले तरच ते जपले जातात. घरात पाळलेल्या कुत्र्यालाही भाकरीचा तुकडा टाकावा लागतो. भाकरीच्या त्या तुकडय़ापायी ते कधी आपला इमान सोडत नाही. अशीच लालूच दाखवून इमानदार नसली, तरी रखवाली करणारी माणसं अण्णासाहेबांसारख्यांना सांभाळावी लागतात.
असं असताना आपल्याच तालमीत तयार झालेल्या चेअरमन पुढाऱयासारख्या कार्यकर्त्यांना दुखवून कसं चालेलं.
पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून अण्णासाहेबांचं गावात येणं वाढलंय. उभ्या राहाणाऱया उमेदवारांसंबंधी ते कार्यकर्त्यांशी सारखे चर्चा करतात. आपल्याशी एकनिष्ठ राहाणारे उमेदवार कसे निवडून आणता येतील आणि आपला दबदबा कायम कसा राहील. याच विचारात ते सद्या गढून गेले आहेत.
राज्यातील अस्थिर सरकार बघता, त्यांनाही कोणत्या क्षणी निवडणुकीला सामोरं जावं लागेल ते सांगता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना कायम खूश ठेवण्याचं अवघड काम त्यांना सतत करावं लागत आहे.
चेअरमन, पुढारी, कांबळेसर ही तर त्यांची खास माणसं. मोठय़ा निवडणुकीत बाजी मारण्यासाठी अशा लहान सहान निवडणुकीत कधी त्यांच्या बाजूने कौल द्यावे लागतात. अशा वेळेस पुढाऱयासारखे कार्यकर्ते चांगलीच संधी साधून घेतात. थोडी जरी जागा मऊ दिसली तरी पाय रोवण्याचा प्रयत्न करतात.
जांभुळवाडीत आपला उमेदवार निश्चित करताना पुढाऱयाने स्वत:च्या बहिणीचं नाव सुचवलं. तिथं सुमनच्या दिराचा दबदबा आहे, तेव्हा अण्णासाहेब त्याचाच विचार करतील हे त्यांना माहीत होतं. पण सध्या स्त्रियांना राजकारणात आलेलं महत्त्व आणि तिचं गावातील  काम  बघता तीच निवडून कशी येईल हे त्यांनी अण्णासाहेबांना पटवून दिलं.
पुढाऱयाला नाराज करून भागणार नव्हतं.
पण ज्याच्यासाठी दगडूचा आणि सुमनचा राग ओढवून घेतला त्या सुमनच्या दिरालाही नाराज करून चालणार नव्हतं, तेव्हा मधला मार्ग म्हणून त्यांनी सुमनच्या दिराला समजावून सांगायचं ठरवलं.
एक दिवस बोलवून घेऊन पुढाऱयासमोरच त्याला सांगितलं. म्हणाले,
‘‘या वेळेस जांभूळवाडीत पंचायत समितीसाठी आम्ही आपल्या पुढाऱयाची बहीण…’’
‘‘काशी… काशीबाई.’’
पुढाऱयाने नाव सांगितलं.
‘‘हां. काशीबाईला उभी करायचं ठरवलंय.’’
अण्णासाहेबांच्या या निर्णयाने सुमनच्या दिराच्या चेहऱयावर एकदम नाराजी उमटली. त्यांच्या निर्णयापुढे जाणं त्याला अवघड होतं, पण तरीही त्यांनी दिलेल्या शब्दाची त्यांना आठवण करून द्यावी म्हणून तो म्हणाला,
‘‘पण मागच्या वेळेस  आपण म्हणाला होतात, की पुढच्या वेळेस तुम्हाला संधी देऊ म्हणून.’’
 ‘‘ते त्या वेळेसची परिस्थिती पाहून बोललो होतो मी. आणि मी म्हणजे काय ब्रह्मदेव नाही, बोलण ते होण्याला! मधल्या काळात बऱयाच गोष्टी घडत असतात. त्याचाही विचार करावा लागतो. मागच्या वेळेस मला आश्वासन मिळालं होतं, पुढच्या वेळेस आपलं सरकार आलं तर तुम्हाला समाजकल्याण खातं देऊ. मिळालं का? नाही. पण आशा सोडून चालत नाही. वाट पाहावी थोडी. धीर धरायला शिकलं पाहिजे. गेली अनेक वर्षे तुमचं काम बघतोय मी. चांगले सरपंच आहात तुम्ही. काढा अजून पाच-सहा वर्षे इथं. बघू पुढच्या वेळेस! जरा बायकांना संधी देऊन त्यांना खूश करू! शेवटी काय बाई खूश तर बाप्या खूश!’’
अण्णासाहेबांच्या या बोलण्यापुढं सुमनच्या दिराला काही बोलणंच शक्य नव्हतं. कारण त्याचं सरपंच पद टिकून आहे तेही त्यांच्याच कृपेने. त्यांच्या पुढच्या बोलण्याने तर त्यांनी सपशेल माघारच घेतली. ते म्हणाले,
‘‘सरपंचालाही तुम्ही काही कमी लेखू नका. मनात आणलं, तर बरंच काही करता येतं. ते काय तुम्हाला सांगायला नको. ग्रामविकास योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आल्यात, अर्ज आलेत माझ्याकडं. काही नावानिशी, काही निनावी. पडलेत माझ्याकडं रद्दीत. पण कधी विचारपूस तरी झाली का तुमची? नाही. होणार पण नाही. आम्ही आहोत तोपर्यंत तुमच्या सरपंचीला कोणी धक्का लावणार नाही. त्याबाबतीत आमचं सहकार्य कायम राहील. तेव्हा तुम्ही सुद्धा थोडं सहकार्य करा आम्हाला.’’
सुमनच्या दिराला आपली माघार मान्य करण्याशिवाय आता पर्यायच नव्हता. पुढाऱयाचा दुष्टपणा मात्र आता त्यांच्या चांगलाच लक्षात आला. पाच वर्षे उराशी बाळगलेलं जांभूळवाडी गणातून पंचायत समितीवर जाण्याचं स्वप्न पुढाऱयाने आज पायदळी तुडवलं.

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 16 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : एक आवाज दाबलेला
2 ऑनलाईन मालिका : पुरुष विरुद्ध स्त्री
3 ऑनलाईन मालिका : कसलं स्त्री स्वातंत्र्य?
Just Now!
X