06 August 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : स्त्री मनाची घालमेल

कांबळेसरांनी आदर्श शिक्षकाचा पुरस्कार कसा मिळवलाय हे साऱया गावाला माहीत आहे. त्यामुळे नुकतेच साक्षर होऊन जागरुक झालेलं जामगाव कोणाला निवडेल हे सांगता येणं कठीणच आहे.

| August 13, 2014 01:15 am

पण रोहिदासने आपल्यालाच गुंड म्हटलंय ही मानसिकता चेअरमन, पुढाऱयाची! त्यामुळे भडकल्यासारखे दोघंही बोलायला लागले. चेअरमन म्हणाला,
‘‘गुंडांना पाठीशी घालण्याच्या तुमच्यावरच्या आरोपाचा जाब त्याला विचारला पाहिजे.’’
मग पुढाऱयाकडे बघत रोहिदासलाच समोरासमोर बोलल्यासारखा म्हणाला,
‘‘अण्णासाहेब मोहिते एका दिवसात घडले नाहीत. त्यामागं पन्नास वर्षांची तपस्या आहे. आरोप करण्याआधी स्वत:च्या वयाचा आणि अण्णासाहेबांच्या वयाचा तरी विचार करायचा होता.’’
चेअरमनला शांत करत मग अण्णासाहेब समजून सांगण्याच्या सुरात म्हणाले,
‘‘चेअरमन, परिस्थिती त्यांना असं बोलण्यास अनुकूल आहे. मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दुसरी चांगली बाई असतानाही अंत्याने नंदालाच सरपंच करण्याचा हट्ट धरला. आपण तो पुरवला. तेव्हा अंत्याने सतूच्या मदतीने किती सदस्य पळवून नेले होते?’’
‘‘दोन’’
आठवल्यासारखं करून पुढाऱयाने उत्तर दिलं. तेव्हा अण्णासाहेब पुढं म्हणाले,  
‘‘तो खेळ गुंडगिरीच्याच जोरावर खेळला नंदाच्या नवऱयाने… आता अशी माणसं आपल्या पदरी असल्यावर शंकेला जागा राहणारच की. पण त्याने आपलं काही वाकडं होणार नाही. पंचायतीची निवडणूक तोंडावर आलेली नसती आणि राज्यातल्या अस्थिर सरकारमुळे आमची ही जागा डळमळीत नसती तर त्याला याचं उत्तर लगेच दिलं असतं… पण सांगता येत नाही, सरकारचा पाठिंबा गेला, तर मलासुद्धा मध्येच निवडणुकीला सामोरं जावं लागेन. त्यामुळं कोणतही पाऊल उचलताना विचार केला पाहिजे.’’
 ‘‘मंग कांबळेसरांना…’’
पुढाऱयाच्या मनात अजूनही कांबळेसरांबद्दलचं गूढ होतंच. ते एकदाचं काढून टाकावं म्हणून अण्णासाहेबांनीच स्पष्टपणे खुलासा केला. म्हणाले,
‘‘पुढारी, सतूला उभा केला असता, तर गावच्या युवक मंडळाच्या पोरांचा राग आपण ओढून घेतला असता. आणि तो सध्यातरी नको आहे आपल्याला. राहिला रोहिदास. तो आदर्शवादी. त्यामुळे हानिकारकच. अशावेळी दोन्ही बाजू सांभाळण्यासाठी मी कांबळेसरांना उभं करायचं ठरवलंय. ते वरून आदर्श शिक्षक वाटत असले तरी आतून कसे आहेत ते तुम्हाला सांगायला नको. आदर्श शिक्षकाचा पुरस्कार देऊन आपण त्यांना मिंधे करून ठेवलंय. कधी गद्दारी करतील असं वाटत नाही. आणि हरिजनांचा उमेदवार दिला म्हणून गणातले महारवाडेही मागे उभे राहतील आपल्या. आरक्षण दिलं समजा माझ्याकडून. आता त्याबदल्यात काय मिळवायचं ते मिळवू आपण.’’
अण्णासाहेबांचा हा खुलासा चेअरमन पुढाऱयाला पटण्यासारखा नव्हता. कारण कांबळेसरांनी आदर्श शिक्षकाचा पुरस्कार कसा मिळवलाय हे साऱया गावाला माहीत आहे. त्यामुळे नुकतेच साक्षर होऊन जागरुक झालेलं जामगाव कोणाला निवडेल हे सांगता येणं कठीणच आहे.
पण तरीही अण्णासाहेबांचा कांबळेसरांविषयीचा लोभ पाहता कांबळेसरांना विरोध करणं म्हणजे पाण्यात राहून माशाशी वैर केल्यासारखं होईल. त्यामुळे काहीच न बोलता जामगावाविषयीचा अण्णासाहेबांचा निर्णय त्यांनी मान्य केला.

विद्याला मात्र अण्णासाहेबांचा पक्षपातीपणा पटला नाही. गावाच्या विकासासाठी मनापासून झटणाऱयाकडे अण्णासाहेब दुर्लक्ष करतात, हे तिला तिच्या सत्काराच्या वेळेसच समजले होते. आपल्यापुढं लाळ घोटणाऱयालाच घास टाकण्याची त्यांची रीत तिला मानवणारी नव्हती. पण ते पडले तिचे मामा! तिच्या दृष्टीने ते केवळ एक राजकीय नेते असते तर कदाचित तिनं या अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाही असता, पण घरच्या नात्याने तिचं तोंड बंद केलं! आणि त्यातच अण्णासाहेबांनी घडवून आणलेल्या सत्काराच्या बोजाखाली ती पार दबून गेली आहे.
तरीसुद्धा तिचं मन तिला खात होतं. गावाला साक्षर करून, आपण त्यांना अंधारातच टेवतोय याची टोचणी तिला अस्वस्थ करीत होती. गावातल्या सामान्य लोकांचं जाऊ द्या. ती लोकं पहिली कशात नव्हती आणि आताही कशात नाहीत. गावात काही उलथापालथ झाली तरी त्यांच्या दिवसभराच्या राबण्यात काहीच फरक पडत नाही.
पण गावात काय घडतंय ते आपल्याला कळतंय. त्याचे परिणामही दिसताहेत, तरी आपण काहीच करू शकत नाही. हाती असलेल्या सत्तेचा वाट्टेल तसा वापर करणाऱया या पुरुषी नेतृत्वाला विरोध करण्याची ताकद आपल्यात नाही.
आपण किती दुबळ्या आहोत याची सर्वप्रथम जाणीव विद्याला याच क्षणी झाली. मग पुरुषांचं वर्चस्व का? याचं उत्तर मिळायला तिला वेळ लागला नाही.
याला उपाय म्हणजे आपण कणखर होणं. त्याशिवाय या गोष्टींना आळा बसणार नाही. मनाची ताकद फार मोठी आहे. त्या ताकदीला कोंडून न ठेवता तिचा चांगला उपयोग केला तर दिवस निश्चित बदलतील.
धारिष्टय़ मोठं आहे, पण ते कोणीतरी केलंच पाहिजे.
विद्याने विचारपूर्वक अलकाला कांबळेसरांच्या विरुद्ध उभी करायचं ठरवलं. निवडणूकच लढवायची आहे तर मग केवळ पक्ष कशाला पाहिजे? अपक्ष म्हणूनही उभं राहू शकतो. निवडून येणं न येणं लोकांच्या हातात आहे. आपण खरंच काही चांगलं काम केलं आहे, असं लोकांना वाटत असेल तर देतीलही लोक निवडून, असा विचार करून विद्याने आपला निर्धार पक्का केला.
सुरुवातीला अलकाची हिम्मत होत नव्हती. अण्णासाहेबांची माणसं विरोधी उमेदवाराला कसं सळो की पळो करून सोडतात, हे तिनं अनेकदा पाहिलंय. त्यात तिच्या विरोधात कांबळेसर काय करतील त्याचा नेम नाही. आपण पडलो बाई माणूस. पुरुषी आरोप सहन होणार आहेत का आपल्याला? बाईच्या जातीने आपल्या पायरीनेच राहिलेलं बरं. नाहीतर तिची इज्जत चव्हाटय़ावर यायला वेळ लागत नाही. पुरुषांनी काय, ढुंगणाचं सोडून डोक्याला गुंडाळून चाललं तरी कोण बघतंय त्यांच्याकडे. पण स्त्रियांचं पाऊल थोडं जरी वाकडं पडलं तरी गिधाडासारखे तुटून पडतात तिच्यावर. असे अनेक विचार अलकाच्या मनात येऊ लागले. शिवाय घरातल्या माणसांचा तिच्यावर विश्वास असला आणि ती करील ते योग्यच करील म्हणून त्यांची परवानगी असली तरी, निवडणूक लढवायची म्हणजे पैशाचा प्रश्न आला. अपक्ष लढायचं म्हणजे सगळा खर्च आपणच करायचा… या सगळ्याच गोष्टी अलकाला निवडणुकीला उभं राहण्यापासून दूर लोटत होत्या. पण विद्याने आग्रह सोडला नाही. तुला गावासाठी खरंच काही करायचं असेल, तर तुझ्या हातात सत्ता पाहिजे. अधिकार असतील तर तू पाहिजे ते करू शकशील. असं बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला विद्याने तिला.
‘‘या पुरुषांपेक्षा काय वेगळं करणार आहे आपण?’’
अलकाने विद्यासमोर उपस्थित केलेली शंका तिच्या दृष्टीने रास्त होती. पुरुषांच्या जागी स्त्री आल्याने काय बदल होणार आहे?
या बाबतीत विद्याची मनस्थितीही काहीशी अलकासारखीच होती. कारण आजपर्यंत तिच्या अनुभवास जे आलं त्यातून तिला स्त्रियांच्या मर्यादाच जाणवल्या. तिची झेप कुठपर्यंत आहे हे सुद्धा तिला कळून चुकलंय. म्हणजे उंच भरारी घेण्याची क्षमता तिच्यात नाही असं नाही. पण ती घेण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास अजून तिच्यात नाही. स्त्री म्हणजे ‘चूल आणि मूल’ ही अनंत काळापासून चालत आलेली मानसिकता समाज अजून बदलायला तयार नाही. संस्कृतीच्या गोंडस नावाखाली उलट त्या मानसिकतेला खतपाणी घालण्याचं काम हा समाज अजूनही नेटाने करतो आहे.
चार-दोन स्त्रिया या समाजप्रवाहाच्या विरोधात जातात आणि त्या बंडखोर ठरतात.
नवीन बदल घडवून आणायचा असेल तर अशा बंडखोरीची गरजच आहे. पण हा बदल चार-दोन स्त्रियांच्या बदलण्याने होणार नाही, हे सुद्धा ती जाणते. आज प्रत्येक क्षेत्रात एखादी तरी स्त्री चमकताना दिसते. पण अशा एखादअर्ध्या स्त्रीवरून संपूर्ण समाजाची कल्पना करणे चुकीचे आहे. खेडय़ापाडय़ात राहणाऱया लाखो स्त्रियांच्या पायात अजूनही पुरुषांच्या बेडय़ा आहेत. आणि त्या बेडय़ा तोडून टाकण्याची हिम्मत अजून त्यांच्यात नाही. त्या स्वत: मनात आणत नाहीत तोपर्यंत ती हिम्मत त्यांच्यात येणार नाही. म्हणजे खऱया अर्थाने स्त्रीच अजून मनाने स्वतंत्र होत नाही.
जोपर्यंत ती मनाने स्वतंत्र होत नाही, तो पर्यंत तिच्या हाती सत्ता, संपत्ती आली तरी ती पुरुषांच्या वर्चस्वाखालीच राहणार यात शंका नाही.
आणि जोपर्यंत ती पुरुषांच्या वर्चस्वाखाली आहे, तोपर्यंत ती पुरुषांपेक्षा काही वेगळं करील असं वाटत नाही.
मग अलकाच्या हाती सत्ता आली, तरी ती कांबळेसरांपेक्षा वेगळं असं काय करणार आहे?
अशाने सत्तेमध्ये बदल होण्यापलीकडे दुसरं काहीच होणार नाही. मग केवळ सत्तांतरासाठी एवढा अट्टहास कशाला?
जामगावचं राजकारण स्त्रीने केलं काय आणि पुरुषांनी केलं काय, त्यात काही सुधारणा होणार नसेल तर अलकाला उभी करून अण्णासाहेबांची दुश्मनी कशाला ओढवून घ्यायची? असं बरंच काही अलकाच्या मनात येत होतं.

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 18 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : राजकारणातील आदर्श
2 ऑनलाईन मालिका : माणसं, सांभाळलेली आणि दुखावलेली
3 ऑनलाईन मालिका : एक आवाज दाबलेला
Just Now!
X